অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुचला

कुचला

(काजरा; हिं. काजरा, कुचला, निर्मल; गु. कुचला; क. हेमुष्टी, इट्टांगी, काजवरा; सं. विष-द्रुम, काकतिंडुक; इं. क्रो-फिग, कॅचिटा, नक्स-व्होमिका, स्ट्रिक्नीन ट्री, पॉइझन नट; लॅ.स्ट्रिक्नॉस नक्स-व्होमिका कुल—लोगॅनिएसी). सु. १२—१५ मी. उंचीचा हा पानझडी वृक्ष दमट मॉन्सून जंगलात सामान्यपणे आढळतो. त्याचा प्रसार कोकणात व कारवारात आणि समुद्रकिनाऱ्यावरच्या जांभ्याच्या जमिनीत विपुल आहे; उत्तर आंध्र, कर्नाटक, तामिळनाडूचा किनारा, त्रावणकोर इ. भारतातील उष्ण प्रदेश, शिवाय ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंडोचायना, लाओस इ. प्रदेशात याचा प्रसार आहे.

अनुकूल परिस्थितीत हा ३० मी. पर्यंत उंच वाढतो. याला आखूड, तीक्ष्ण, बळकट व कक्षास्थ (बगलेत) काटे असतात. साल पातळ, करडी, गुळगुळीत किंवा खरबरीत असून त्यावर वल्करंध्रे (सालीतील छिद्रे) असतात. पाने साधी, समोरासमोर, अंडाकृती किंवा वर्तुळाकृती, लघुकोनी किंवा गोलसर टोकांची, चिवट आणि चकचकीत असतात.

उन्हाळ्यात फारच थोडे दिवस हा वृक्ष संपूर्ण पर्णहीन असतो. फुले हिरवट पांढरी व लोमश (लवदार) असून शेंड्याकडे त्रिशाखी गुलुच्छीय वल्लरीत [→पुष्पबंध] मार्च एप्रिलमध्ये येतात. त्यांना हळदीसारखा वास येतो. पुष्पमुकुट अरुंद नळीसारखा असतो; बीजके अनेक [→ फूल]; मृदुफळ गोलसर, रंगाने व आकाराने लहान संत्र्याएवढे असते; त्यात अनेक चमकदार, लवदार, पसरट, वाटोळ्या, करड्या व ३—५ बिया असतात. बियांत २.६ – ३ % अल्कलॉइड असते; त्यापैकी १.२५ – १.५०% स्ट्रिक्नीन व १.७% ब्रूसीन असते; लाकूड, साल व पाने यांत ब्रूसीन असते परंतु स्ट्रिक्नीन नसते. दुसऱ्या जातींच्या बियांची भेसळ होत असल्याने अल्कलॉइडाच्या प्रमाणात फरक पडतो. कुचल्याइतके अल्कलॉइडाचे प्रमाण इतर जातींच्या बियांत नसते. बियांत तेल व रंगद्रव्य असते. या रंगद्रव्याने कापसाचे सूत पिंगट होते. गावठी दारू बनविताना या बिया वापरल्याने ती अधिक कडक होते. बिया कठीण, कडू, उग्र, उष्ण, भूक वाढविणाऱ्या, उत्तेजक, स्तंभक (आकुंचन करणाऱ्या), ज्वरनाशी, शामक व अधिक प्रमाणात विषारी असून शूलावर (तीव्र वेदनांवर) गुणकारी असतात. मुळांच्या सालीची पूड पटकीवर देतात. जखमांवर (विशेषत: त्यांत अळ्या पडल्या असताना) पानांचे पोटीस बांधतात.

लाकूड आमांश, ताप व अग्निमांद्यावर उपयुक्त असते. फळांच्या गरात बियांप्रमाणे अल्कलॉइडे शिवाय लोगॅनीन हे ग्लुकोसाइड असते. तंत्रिका तंत्रावर (मज्जासंस्थेवर) व स्नायू तंत्रावर विषारी बियांची क्रिया होऊन झटके येतात; रक्तदाब वाढतो; नाडी मंद चालते. ‘शूलहरण योग’ व ‘समीरगज केसरी’ या भारतीय औषधांत कुचल्यातील द्रव्ये असतात.लाकूड कठीण, टिकाऊ व वाळवीपासून सुरक्षित असते; साधी घरबांधणी, सजावटी सामान, शेतीची अवजारे, गाड्या, कपाटे, हत्यारांचे दांडे इत्यांदीकरिता ते उपयुक्त असते. भारतातून बियांची निर्यात होते. कुचल्याचा औषधी उपयोग प्रथम सोळाव्या शतकात करण्यात आला.

 

 

लेखक-जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate