অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॅलॅमाइटेलीझ

कॅलॅमाइटेलीझ

कॅलॅमाइटेलीझ पुराजीव महाकल्पात (सु. ६०-२४.५ कोटी वर्षांपूर्वी) अस्तित्वात असलेल्या पण आता फक्त जीवाश्मरूपात (अवशेषरूपात) आढळणार्‍या वाहिनीवंत (पाणी वा अन्नाची ने-आण करणारी शरीरघटक असणार्‍या) अबीजी वनस्पतींचा [ → टेरिडोफायटा] एक विलुप्त गण. मुख्यतः उत्तर गोलार्धातील डेव्होनियन (सु. ४२-३६.५ कोटी वर्षांपूर्वी) व कार्‌बॉनिफेरस (सु.३५ - ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत ह्या वनस्पतींच्या पानांचे, खोडांचे व शंकूचे (काहीशा लांबट अक्षावरील बीजुक म्हणजे लाक्षणिक प्रजोत्पादक भाग किंवा परागधारक खवल्यांचे वा छदांचे म्हणजे फुले किंवा फुलोरे ज्याच्या बगलेत येतात अशा पानांचे) जीवाश्म सापडतात. त्या ओषधीय [→ ओषधि] किंवा लहानमोठ्या वृक्षाप्रमाणे असून दलदलीत वाढत होत्या.

वृक्षांची उंची सु. २०-३० मी. व व्यास एक मी. पंर्यत असून त्यावर बहुधा फांद्यांची व सदैव लहान आणि साध्या, सुट्या किंवा तळाशी जुळलेल्या पानांची मंडले होती. प्रत्येक मंडलात सु. ६-४० पाने असून प्रत्येक पान १० सेंमी. पर्यंत लाबं व अरुंद होते. जमिनीत वाढणार्‍या जाडजूड व शाखायुक्त मूलक्षोडापासून [→ खोड] जमिनीवर हवेत वाढणारे खोड व अनेक आंगतुक मुळे होती. विद्यमान ⇨एक्‍विसीटम वंशाशी ह्या वनस्पतींचे बाह्यस्वरूप व अंतर्रचना या बाबतींत साम्य आहे. मात्र आकाराने कित्येक जाती फार मोठ्या असून त्यांमध्ये द्वितीयक वृद्धी (लांबी वाढावयाची थांबून व आद्य पेशी समूहाचे विभेदन झाल्यावर खोड किंवा मुळाचा व्यास वाढणे) आढळते.

कॅलॅमाइटस हा प्रमुख वंश असून खोड त्या नावाने पाने अ‍ॅन्युलॅरिया आणि शंकू कॅलॅमोस्टॅचीस पॅलिओस्टॅकिया व कॅलॅमोकार्‌पॉन या वंशनामांनी ओळखली जातात. शंकूमध्ये एका अक्षावर अनेक वंध्य (वांझ) छदे व बीजुककोशदंड (बीजुके धारण करणार्‍या पिशवीसारख्या भागाचा देठ) यांची मंडले एकाआड एक असतात; क्वचित छदे नसतात. काही जातींत समान व काहींत असमान बीजुके पण कॅलॅमोकार्‌पॉन मध्ये असम बीजुकत्व (एकापेक्षा जास्त प्रकारची बीजुके तयार होणे) व बीजानुकरण आढळते.

विद्यमान एक्‍विसीटमसारख्या वनस्पती आणि कॅलॅमाइटेलीझ समान पूर्वजापासून अवतरल्या असाव्या असे हल्ली मानतात. भूवैज्ञानिक पुराव्यावरून मात्र कॅलॅमाइटेलीझ हेच पूर्वज असावेत असे दिसते.

कॅलॅमाइटेलीझ : (१) शंकू, फांद्या व पानांसह संधियुक्त खोड, (२) खोडातील भेंडावरचा ससीता (खाचयुक्त) पृष्ठभाग, (३) व (४) शंकूच्या उभ्या छेदाचा काही पुनःस्थापित भाग, (३ -कॅलॅमोस्टॅचीस व ४ - पॅलिओस्टॅकिया).

 

 

लेखक: द. गो. वर्‍हाडपांडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate