অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॉनिफेरेलीझ

कॉनिफेरेलीझ : (कॉनिफेरी)


बीजी वनस्पतींपैकी प्रकटबीज वनस्पतींत या शंकुमंत (शंकूच्या आकाराचे प्रजोत्पादक इंद्रिय असलेल्या) गणातील वनस्पतींचा फार मोठा भरणा आहे व त्यांचे व्यावहारिक महत्त्वही बरेच आहे.

यात पाइन, रेडवुड, स्प्रूस, देवदार, फर, सायप्रस, लार्च, जूनिपर, अ‍ॅरॉकॅरिया इ. नावांनी ओळखली जाणारी इमारती लाकडासाठी प्रसिद्ध असलेली अनेक झाडे येतात. जीवाश्मांच्या (खडकातील पुरातन अवशेषांच्या) अभ्यासाने यांचे पूर्वज पुराजीव महाकल्पात (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वी) होते असे आढळते.

समशीतोष्ण कटिबंधातील (विशेषतः उत्तर गोलार्धातील) भागात ही झाडे सामान्यपणे ओलसर जागी आढळतात. परंतु उष्णकटिबंधात त्यांचा प्रसार समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचीवर (सु. १,२०० मी. व त्यापेक्षा अधिक उंचीवर) असतो; त्यांची मोठी जंगले असून इतर बीजी वनस्पतींच्या जंगलांपेक्षा ती निराळी दिसतात. भारतात उत्तरेस व हिमालय पर्वताच्या रांगांवर, तसेच पूर्वेस काही भागांत (आसाम, सिक्कीम, भूतान, खासी आणि नागा टेकड्या इ.) ही झाडे आहेत. निलगिरीपासून खाली दक्षिणेकडे फक्त एक जाती (पोडोकार्पस वालिचिआनुस) आढळते. अनुकूल प्रदेशात बागांतून शोभेकरिता ही झाडे लावतात.

या गणात औषधी नसून क्षुपे (झुडपे) व लहान मोठे वृक्ष आहेत; एकूण वंश ४८ व जाती सु. ५४० आहेत. काही वृक्ष उंचीत व आयुःकालात जगात दुसरे ठरतात. खोडाची उंची सु. ९५ मी. व व्यास १० मी. (उदा. कॅलिफोर्नियातील रेडवुड) किंवा थोडाफार अधिक असू शकतो. यांपैकी काहींचे वय ३,५००–४,००० वर्षे असावे असे मानतात.

खोडावरच्या फांद्या काही जातींत साऱ्या अंतरावर झुबक्यांनी उगवल्याने व क्रमाने तळापासून टोकाकडे लांबी कमी होत गेल्याने सर्व वृक्षास त्रिकोणी (पिरॅमिडसारखा) आकार येतो (आ. १) बहुधा ही आ. १. शंकमंत वृक्ष : (पाइन, हेमलाँक,स्प्रूस,फर,सीडार इ. वृक्षांचे सामान्य स्वरूप).झाडे सदापर्णी असून पाने सूच्याकृती (सुईसारखी), रेषाकृती किंवा लहान मोठ्या खवल्यांसारखी असतात. यांना सूचिपर्णी वृक्ष म्हणतात, पण ते तितकेसे योग्य नाही कारण सर्वांची पाने सुईसारखी नसतात.

ही पाने कधी (उदा., पाइन) छोट्या फांद्यांवर (ऱ्हस्वप्ररोहांवर) झुबक्यांनी येतात. या झाडांमध्ये राळ-नलिका असून वाहक कोशिकांवर (पेशींवर) ‘अनुलिप्त खाचा’ (दोन वाहक कोशिकांमधील भित्तीतील पातळ व भोवताली भित्तीच्या जाड झालेल्या भागापासून तयार झालेली लोंबकळती कडी असलेले भाग) असतात. वाहिन्यांचा अभाव असतो. द्वितीयक वाढीमुळे काष्ठनिर्मिती सतत चालू राहून व्यास वाढत राहतो. या वनस्पतीत शंकू नावाची प्रजोत्पादक इंद्रिये एका किंवा दोन स्वतंत्र झाडांवर असतात. या शंकूंना फुले म्हणावे असे काहींचे मत आहे. ती एकलिंगी व बहुधा परिदलहीन (बाह्यावरणरहित) असतात व त्यांची पूर्ण वाढ होण्यास बराच काळ लागतो.

प्रत्येक शंकूत एक मुख्य अक्ष असून त्यावर अनेक शुष्क व लहान मोठी छदे (ज्यांच्या बगलेत शंकू येतात अशी पाने) व शल्कपर्णे (खवली पाने) यांची सर्पिल (मळसूत्री) मांडणी असते. पुं-शंकूमध्ये परागकोश शल्कपर्णाच्या खालच्या बाजूस असतात, तर स्त्री-शंकूवर बीजके (बीजाची पूर्वावस्था) वरच्या बाजूस असून शल्के छदांच्या बगलेत असतात. परागकण हलके, बारीक, असंख्य व कधी सपक्ष (उदा., पाइन) असतात व परागण (परागसिंचन) वाऱ्याने होते; शिवाय यांच्या अनेक लहान पुं-शंकूंचे घोस असल्याने परागसंख्या आणखीच वाढते; त्या मानाने यांच्या मोठ्या स्त्री-शंकूवर बीजके फार मोजकी असून ती उघडीच असल्याने परागणात अडचण येत नाही.

परागण व त्यानंतरची परागनलिकेद्वारे होणारी फलनक्रिया यांमध्ये कमीजास्त अवधी असतो; रेतुके (चल पुं-जनन कोशिका) नसतात, त्याऐवजी फक्त पुं-प्रकल (केंद्रक) असतात. फलनानंतर स्त्री-शंकू वाढून ते कालष्ठमय (उदा., पाइन) किंवा मांसल (उदा. जूनिपर) बनतात. एका बीजात अनेक गर्भ आढळतात (बहुगर्भत्व). दलिका २–१६; बीजांना बहुधा पंख असल्याने ती वाऱ्याने दूरवर नेली जातात. बीजचोल (बीजावरण) राठ किंवा कडक असते; कधी खारीसारखे प्राणी बीजांचा प्रसार करतात. बीजहीन शंकू झाडावर बरेच दिवस राहतात व पुढे तुटून पडतात.

या गणामध्ये सहा फुले आहेत : (१) पाइनेसी, (२) टॅक्सोडिएसी, (३) क्युप्रेसेसी, (४) पोडोकार्पेसी (५) सेफॅलोटॅक्सेसी, (६) अ‍ॅरॉकॅरिएसी. टॅक्सेसी या नावाने आणखी एक कुल आहे व त्याचा समावेश टॅक्सेलीझ या निराळ्या गणात केला आहे. काही खाद्य बिया (चिलगोझा; पाइन), राळ, व्हार्निश,टर्पेंटाइन, धूप, बर्गंडी पिच, अंबर, डांबर, कॅनडा बाल्सम, उत्तम लाकूड, कागदाचा लगडा इ. उपयुक्त पदार्थ या वनस्पतींपासून मिळत असल्याने ह्या वनस्पतींना फार महत्त्व आले आहे व हे पदार्थ तयार करणारे कारखाने त्यांच्या जंगलांच्या आसपास काढलेले आहेत.

केळकर, शकुंतला

आ .३ वाल्विओस्ट्राँबस बीजक न्हस्व प्ररोह.(अ) अद्योमुख बीजके, (आ) ऊर्ध्वमुख बीजके.

वाल्चिया

पुराजीव महाकल्पात (कार्‌बॉनिफेरस कल्पातील म्हणजे सु. ३५ ते ३१ कोटीवर्षांपूर्वीच्या वरच्या खडकांपासून ते पर्मियन
कल्पाच्या म्हणजे सु. २७·५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या खालच्या खडकांपर्यंत) आढळलेल्या शंकुमंत (कॉनिफेरेलीझ) वनस्पतींच्या पर्णयुक्त फांद्यांच्या जीवाश्मांचा एक रूप-वंश. अलीकडे आ .२ वाल्चिया जरमँनिका अद्योमुख बीजकांचा न्हस्व प्ररोह.फ्लोरीन यांनी उपत्वचेची संरचना व बीजधारी शंकू यांच्या आधारे ह्या वंशातील चौदा जातींचा अंतर्भाव लेबॅचिया या वंशामध्ये व एका जातीचा समावेश अनेंस्टिओडेंड्रॉनमध्ये केला आहे, याशिवाय अकरा जातींपैकी बहुतेकांचा अंतर्भाव वाल्चियातच करावा लागेल असे ते मानतात, कारण त्यांच्या त्वग्रंध्रांबाबत (त्वचेवरील सूक्ष्म छिद्रांबाबत) निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही. लेबॅचियात त्वग्रंध्रांच्या चार पट्ट्यांपैकी दोन दीर्घ पट्टे खालच्या बाजूस व दोन आखूड पट्टे वरच्या बाजूस असून ह्या पट्ट्यात त्वग्रंध्रांची इतस्ततः विखुरलेली असतात. अनेंस्टिओडेंड्रॉनमध्ये प्रत्येक पट्ट्यात त्वग्रंध्रांची एकच रांग असते. लेबॅचियाची बारीक व सुईसारखी पाने खोडाच्या पृष्ठानजीक वाढतात, तर अनेंस्टिओडेंड्रॉनची पाने ताठर व जाडजूड असून खोडाशी काटकोनात वाढतात.

या वनस्पतींच्या दुभंगलेल्या पानांच्या व छदांच्या जीवाश्मास गॉफोस्ट्रॉबस म्हणतात.उत्तर अमेरिकेच्या मध्य व उत्तर पेनसिल्व्हेनिया येथील खडकांत लेबॅचिया व वाल्चिया ह्यांचे जीवाश्म तुरळकपणे आढळतात, परंतु पर्मियन कल्पाच्या सुरुवातीच्या थरात ते अनेक ठिकाणी भरपूर आहेत. लेबॅचिया व वॉल्टझिएसीतील काही वंश पर्मियन कल्पात बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरले होते. तिन्ही वंशातील वृक्ष विद्यमान अ‍ॅरॉकॅरिया एक्सेल्सासारखे दिसत असावे . शंकूंचा आकार चित्तीय किंवा अंडाकृती फुलोऱ्यासारख असून ते अंतिम फांद्यांवर टोकाशी असतात. पुं-केसर व बीजके भिन्न शंकूवर असतात.

वाल्चिया (अनेंस्टिओडेंड्रॉन?) जर्‌मॅनिकाची बीजके उलटी (अधोमुख) असतात. बीजधारी शंकू,केसरदलाचे शंकू, बीजे व पराग यांना अनुक्रमेवाल्चिओस्ट्रॉबस, वाल्चिअँथस, कॉर्डांइकार्पस व पोलेनाईटस ही नावे वापरतात. शंकूंच्या व छदांच्या अंडाकृती आकारावरून ‘अंडशल्काश्म’ हे नाव दिलेले आढळते. बी सपाट व कॉर्डाइकार्पसप्रमाणे असते.

वॉल्टझिया

आ .४ वाँल्टझिया

पुराजीव महाकल्पातील पर्मियन कल्पापासून अलीकडे मध्यजीव महाकल्पातील (सु. २३–९ कोटी वर्षांपूर्वीच्या कालातील) ट्रायसिक कल्पाच्या (सु. २३–२० कोटी वर्षांपूर्वीच्या कालाच्या) शेवटापर्यंत आढळणारा एक विलुप्त शंकुमंत वंश.

कॉनिफेरेलीझ गणातील अ‍ॅरॉकॅरिएसी (अ‍ॅरॉकॅरिया) व पायनेसी (पाइन) या दोन्ही कुलांतील जातींशी या वंशाचे साम्य आढळते, तथापि यांचा समावेश वॉल्टझिएसी या स्वतंत्र कुलात करण्यात आला आहे. शरीराकृती, पानांचा आकार व सर्पिल मांडणी आणि काष्ठरचना इ. लक्षणांत अ‍ॅरॉकॅरिएसीशी साम्य आहे.

मध्यजीव महाकल्पात हे कुल दोन्ही गोलार्धात भरपूर पसरलेले होते. पण हल्ली फक्त दक्षिण गोलार्धात आढळते. वॉल्टझियाच्या शंकूतील शल्क पायनेसी कुलातल्या काही जातींप्रमाणे असतात. परंतु शंकु-शल्कावर तीन बीजे धारण करण्याचे वॉल्टझियाचे लक्षण सर्व विद्यमान शंकुमतांत कोणत्याही जातीत आढळत नाही. ब्रिटिश ट्रायासिक वनस्पतींची माहिती १९१० मध्ये एल्. जे. विल्सन यांनी प्रसिद्ध केली; तीमध्ये ब्रोम्सग्रोव्ह खालच्या क्यूपर थरात वॉल्टझिया हेटेरोफिलाचा व एक्किसीटाइट्स यांच्या दोन जातींचा  उल्लेख आहे.

 

लेखक - शं. आ. परांडेकर

संदर्भ : 1. Andrews, H. N. Studies in Palaeobotany, New York, 1967.

2. Arnold, C. A. An Introduction to Palaeobotony, New York, 1947.

3. Neaverson, E. Stratigraphical Palaeobotny, Oxford, 1962.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate