অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॉपरपॉड

कॉपरपॉड

(इं. सोगा बार्क पेल्टोफोरम, रस्टी शील्ड बेअरर; लॅ. पेल्टोफोरम फेरूजिनियम, कुल-लेग्युमिनोजी). विशेषतः शोभेकरिता लावण्यात येणारा आणि सु. १२–२४ मी. उंचीचा हा सुंदर पानझडी शिंबावंत शेंगा (शेंगा येणारा) वृक्ष गुलमोहराच्या कुलातील (लेग्युमिनोजी, सीसॅल्पिनीऑइडी) व साधारण तसाच दिसणारा असून मूळचा श्रीलंका, अंदमान, मलेशिया व उत्तर ऑस्ट्रेलिया येथील आहे.हा भारतात सर्व मोठ्या शहरी रस्त्याच्या दुतर्फा व बागेत लावलेला आढळतो. साल गुळगुळीत व पांढरट करडी असते.

याची संयुक्त पिसासारखी व दोनदा विभागलेली (द्विगुण पिच्छाकृती) गर्द हिरवी पाने डिसेंबरात झडण्यास सुरुवात होऊन फेब्रुवारीत पुन्हा नवीन पालवी येऊ लागते. फांद्यांच्या टोकांकडे, पिवळ्या मध्यम आकाराच्या फुलांच्या परिमंजऱ्या मार्च – मे पर्यंत येतात; कधी सप्टेंबर ते नोव्हेंबरात पुन्हा बहर येतो. शेंगा चपट्या व दोन्हीकडे टोकदार व ५–१०X१·८–२·५ सेंमी. असतात. बिया पिंगट व एक ते चार असतात.‘कॉपर पॉड’ हे इंग्रजी नाव ताम्रवर्णी शेंगेवरून दिले आहे व काहींच्या मते तिचा आकार ढालीसारखा असल्याने लॅटिन पेल्टोफोरम व इंग्रजी नाव ‘रस्टी शील्ड बेअरर’ ही सार्थ आहेत.

याचे मध्यकाष्ठ (खोड किंवा फांद्या यांच्या आतील भागातील घन व बहुधा गर्द रंगाचे लाकूड) काळसर लाल, कठीण व मजबूत आणि रसकाष्ठ (अंतर्साल व मध्यकाष्ठ यांच्या मधला मऊ भाग) हलके, फिकट, धागेदार व जाडेभरडे असून कपाटे, पेट्या इत्यादींस वापरतात.साल कातडी कमावण्यास उपयुक्त असून तिच्यापासून पिवळा रंग काढतात. पानांत ५४·७ टक्के प्रथिन असते व गुरांना ती चारा म्हणून घालतात. जावामध्ये सालीचा उपयोग आमांश, गुळण्या करणे, दंतधावन इत्यादींकरिता व नेत्ररोगात डोळे धुण्यास करतात.

कॉपरपॉड : (१) संयुक्त पान,फुलेरा व शिंवा दर्शविणारी फांदी,

(२) फुलातील भाग

(अ) संदल,

(आ) प्रदल,

(इ) केसरदल,

(ई) किंजदल.


लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate