অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॉल्चिकम ऑटम्नेल

कॉल्चिकम ऑटम्नेल

कॉल्चिकम ऑटम्नेल-(हिं. हिरण्यतुतिया; इं. मेडो सॅफ्रन, ऑटम क्रॉकस; कुल-लिलिएसी). ही दृढकंदधारी (कठीण कंद येणारी), औषधीय (→ औषधि) बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वनस्पती यूरोप, पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका इ. प्रदेशांत आढळते. हिचा दृढकंद जून-जुलैपर्यंत बनतो व सप्टेंबर-ऑक्टोबरात एक-तीन फिकट जांभळ्या फुलांचा फुलोरा व त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीत तीनचार पानांचा झुबका येतो.पाने सपाट, भाल्यासारखी, उभी व तळाशी आवरक (वेढणारी); फुले नरसाळ्यांसारखी व खालचा नळीसारखा भाग अंशत: जमिनीत राहते. त्यामुळे किंजपुट (ज्यात बीजांडे तयार होतात असा फूलाचा फुगीर भाग) संरक्षित असतो. फलनानंतर देठाची वाढ होऊन बोंड जमिनीवर येते. बिया मोहरीएवढ्या व लालसर तपकिरी. नवीन उत्पत्ती दृढकंद व बियांनी होते.

ही औषधी व तिच्या इतर जाती आणि प्रकार बागेत शोभेकरिता लावतात. दृढकंदात ⇨ कॉल्चिसीन हे अल्कलॉइड असून त्याचा वापर कृत्रिम रीत्या वनस्पतींत व प्राण्यांत बहुगुणन स्थिती (रंगसूत्रांच्या म्हणजे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणाऱ्या सुतारासारख्या सूक्ष्म घटकांच्या नेहमीच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त असण्याची स्थिती,→ बहुगुणन) आणण्यास करतात.

दृढकंद व बियांचा उपयोग संधिवात, गाऊट (रक्तात यूरिक अम्लाचे प्रमाण जादा झाल्यामुळे हाडे, सांधे व इतरत्र त्याची लवणे साठल्यामुळे होणारा रोग), इसब, श्वासनलिकादाह व मज्जातंतुदाह यांवर होतो. मात्र कातडीस लागल्यास वेदना होतात व हुंगल्यास जबर शिंका येतात.

पोटात जास्त घेतल्यास मूत्रपिंडशोथ (मूत्रपिंडाची दाहयुक्त सूज), आंत्रशोथ (आतड्याची दाहयुक्त सूज), वांत्या, जुलाब इ. होतात व प्रसंगी मृत्यूही येतो. भारतात (प. हिमालयात कागन व काश्मीर ते चंबापर्यंत) आढळणाऱ्या सामान्य जातीचे (सं. हिरण्यतुत्थ; लॅ. कॉ. ल्यूटियम) गुणधर्म वरच्या जातीपर्यंत असून तिच्याऐवजी ही जाती वापरतात.

 

लेखक: हेर्लेकर, न. द.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate