অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोळसुंदा

कोळसुंदा

कोळसुंदा

(तालिमखाना, विखरा; गु. एखारो गोख्रण; हिं. गोक्षुर, ताल-मखाना; क. कळवंक बीज, कोलवलिके; सं. काक-कोकिलाक्ष, इक्षुरा, वज्रकंटक; लॅ.हायग्रोफिला स्पायनोजा, ॲस्टरकँथा लाँगिफोलिया; कुल ॲकँथेसी). दलदलीच्या ठिकाणी वाढणारी ही बळकट काटेरी ⇨ओषधी भारतात सर्वत्र, श्रीलंकेत आणि आफ्रिकेच्या उष्णभागात आढळते. खोड झुपकेदार, काहीसे चौकोनी, उभे, ०·६ १·५ मी. उंच,फुगीर, पर्वयुक्त (पेरी असलेले) व केसाळ असते.

पाने देठविहीन, प्रत्येक पेऱ्यावरच्या सहापैकी बाहेरची दोन मोठी, १८ X ३ सेंमी. व आतील चार लहान (३·८ सेंमी.लांब) असून प्रत्येकाच्या बगलेत एक तीक्ष्ण लांब पिवळा काटा असतो.

प्रत्येक पेऱ्‍यावर आठ फुलांच्या चार जोड्या जून-जानेवारीत येतात. छदे पानासारखी व केसाळ; पुष्पमुकुट द्व्योष्ठक, निळा व टोकास एकदम पसरट [→ फूल]; बोंड लांबट, टोकदार व बिया ४ – ८; इतर लक्षणे ⇨ॲकँथेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

मुळांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा); पाने व बिया शामक व मूत्रल असून कावीळ, संधिवात, शोफ (सूज) व जनन-मूत्रमार्गाचे दोष यांवर देतात. राख मूत्रल व जलोदरावर उपयुक्त. बिया परम्यावर व स्वप्नावस्थेवर दूधसाखरेबरोबर देतात. बी तोंडात धरल्यास ते बुळबुळीत व स्वादयुक्त होते.

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate