অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोशी

कोशी

(कोष्ठ, पेंव; हिं. केऊ; गु. पकरमूल; क. चिक्के; सं. कुष्ठ, पुष्करमूल; लॅ. कॉस्टस स्पेसिओजस; कुल झिंजिबरेसी). ही सु. १.२ – २.७ मी. उंच सरळ वाढणारी ओषधी मूळची ईस्ट इंडीजमधील असून भारतात सर्वत्र व चीन, मलेशिया, श्रीलंका इ. देशांत आढळते.बंगाल व द. भारतात ही बागेत शोभेकरिता लावतात. मूलक्षोड (जमिनीत आडवे वाढणारे खोड) ग्रंथिल (गाठाळ); वायवी (हवेतील) खोड तळाशी काहीसे काष्ठयुक्त.

पाने एकाआड एक, साधारण बिनदेठाची, लांबट, खालून लवदार आणि तळाकडे चिवट असतात; छदे (फुले वा फुलोरा ज्यांच्या बगलेत येतात अशी पाने) लाल आणि पांढरी फुले मोठी व पुष्कळ असून दाटीने कणिशात ऑगस्ट व ऑक्टोबरात येतात.

केसरदलाची योजी पाकळीसारखी व त्यावर लांबट परागकोश; ओष्ठ अंतर्वक्र [→ फूल], पांढरा आणि त्यावर मधे पिवळा डाग असतो. बोंड त्रिधारी व लाल; बी काळे व त्यावर पांढरे अध्यावरण असते [→ फळ; सिटॅमनी (झिंजिबरेसी)].

मूळ, कडू, स्तंभक (आकुंचन करणारे), कृमिनाशक, वाजीकर (कामोत्तेजक), पाचक, उत्तेजक, रेचक, पौष्टिक असून कफज्वरावर व त्वचारोगांवर गुणकारी; त्यात स्टार्च भरपूर असतो. मूलक्षोड शिजवून साखरेच्या पाकात टाकतात; ते पथ्यकर खाद्य असते.

 

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate