অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोहळा, भुई

कोहळा, भुई

कोहळा, भुई

(हिं. बिलाइकंद; गु. भोंय कोहळू; क. निळकुंबळा; सं. भूमिकुष्मांड, स्वादु विदारीकंद; लॅ. आयपोमिया डिजिटॅटा; कुल-कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). ही वेल जमिनीवर वर्षानुवर्षे राहते. मुळ्या लांबट व ग्रंथिल (गाठाळ) असून जमिनीत लांब व खोलवर जातात. प्रसार उष्ण कटिबंधातील आशिया, आफ्रिका, अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथील ओलसर हवामानाच्या प्रदेशांत आहे. भारतात समुद्रकिनाऱ्याच्या आसपासचा जंगल प्रदेश, विशेषतः कोकण आणि कारवार, ठाणे, वेंगुर्ले इ. ठिकाणी आहे. पाने मोठी, साधी, बहुधा लांबीपेक्षा रुंदीला अधिक व हस्ताकृती; ५ – ७ खंड; शिरा ठळकपणे दिसतात.

फुले मोठी व पानांच्या बगलेत लांब देठाच्या मिश्रपरिमंजऱ्यांवर जुलै ते सप्टेंबरात येतात. पुष्पमुकुट जांभळा व साधारण घंटेसारखा  [→ कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी];  किंजपुट चार कप्प्यांचा [→फूल] व बोंडात पिंगट लहान केस असलेल्या अनेक बिया असतात. या वेलाची ग्रंथिल मुळे, पाने व फुले औषधी आहेत.

मूळ पौष्टिक, वाजीकर (कामोत्तेजक), शामक व आरोग्य पुनःस्थापक आहे. मद्याबरोबर चूर्ण दिल्यास दुग्धवर्धक असते. मुलांची दुर्बलता आणि पचनशक्तीची क्षीणता यांवर चूर्ण उपयुक्त आहे; प्लीहा-रोगात (पानथरीच्या रोगात) रेचक व यकृताच्या तक्रारीवर गुणकारी आहे.


लेखक: टिळक, शा. त्रिं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate