অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कौरी

कौरी

कौरी

(इं. कौरी पाइन; लॅ. अ‍ॅगॅथीस ऑस्ट्रॅलिस ; कुल-अ‍ॅरॉकॅरिएसी). ह्या इंग्रजी नावाने ओळखला जाणारा हा भव्य वृक्ष ⇨ अ‍ॅरॉकॅरियाच्या कुलातील वअ‍ॅगॅथीस वंशातील शंकुमंत वृक्ष [→ चिली पाइन] आहे. या वंशातील सु. २० जाती उष्ण व उपोष्ण कटिबंधांत मलायापासून न्यूझीलंडपर्यंत आढळतात.

कौरीचा प्रसार न्यूझीलंडच्या उत्तरेच्या बेटावर असून त्याची विस्तीर्ण पण विरळ जंगले आहेत.

हा राळयुक्त वृक्ष सामान्यपणे २५ – ३० मी. (क्वचित ४५ मी.) उंच असून त्याच्या सरळ खोडावर गोलसर घुमटासारखा माथा असतो. व्यास सामान्यतः १ – ३ मी., क्वचित ४ – ६ मी., खोडावरची साल मोठ्या, सपाट खवल्यांनी सुटून जाते.

कोवळ्या वृक्षावरची पाने बिनदेठाची, विरळ, रेषाकृती, लांबट भाल्यासारखी, ५ -१० X १·५ सेंमी., जून वृक्षावर पाने अंडाकृती, पण लांबट (१·८ – ३·८ सेंमी. लांब) जाड व चिवट; सिराविन्यास (शिरांची मांडणी) समांतर; केसरदलांची लोंबती कणिशे एकाकी; पक्व शंकू ५ – ७ सेंमी. व्यासाचे, उभे व गोलसर; त्यांची रुंद, सपाट, पातळ शल्के (खवले) सुटून पडतात व प्रत्येकावर एकच चापट व सपक्ष बी असते.

याचे लाकूड मजबूत, टिकाऊ व सुतारकामास चांगले; जहाजबांधणी, डोलकाठ्या, सजावटी सामान इत्यादींसाठी वापरतात. कोपल रेझीन (कौरी गम) या नावाची राळ,पूर्वी या वृक्षांची जंगले असलेल्या जमिनीत, मोठ्या प्रमाणावर साठलेली, १ – २ मी. खोलीवर सापडते. ती गर्द पिंगट किंवा रंगहीन व अर्धवट पारदर्शक असून रोगणाकरिता उपयुक्त असते.

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate