অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खाजकोलती

खाजकोलती

खाजकोलती

(कोळती; हिं. बरहंता; क. तुरची; सं. वृश्चिकाली; लॅ. ट्रॅजिया इन्व्होल्यूक्रॅटा कुल-यूफोर्बिएसी). ही दिसायला नाजूक पण कातडीला स्पर्श होताच खाज आणणारी ओषधीय [→ ओषधि] लहान वेल भारतातील पहाडी जंगलात, शिवाय श्रीलंका व ब्रह्मदेश ह्या देशांत आढळते. स‌र्वांगावर पांढरे राठ दाहक केस असतात.

पाने साधी, लहान, भिन्न आकाराची, प्रकुंचित (निमुळत्या टोकाची) व दंतुर असतात. एकलिंगी, पिवळी, स‌वृंत (देठयुक्त) फुले कक्षास्थ (बगलेतील) किंवा अग्रस्थ (शेंड्यावरील) मंजऱ्यांवर नोव्हेंबर-डिसेंबरात येतात. अनेक पुं-पुष्पे वरच्या भागात आणि थोडी स्त्री-पुष्पे खालच्या भागात अशी मंजऱ्यांवर असतात [→ यूफोर्बिएसी]. बोंड तीन कप्प्यांचे, लहान, पांढरट व केसाळ.

बिया गोल व गुळगुळीत असतात. ही वनस्पती नावाप्रमाणे कंडूत्पादक (खाज आणणारी) असते; तसेच ती घाम आणणारी व शरीरास जोम आणणारी आहे. कडक तापात हातपाय थंड पडतात किंवा दुखू लागतात तेव्हा हिच्या मुळांचा काढा देतात.

रक्तपितीवर मूळ उगाळून लेप देतात; नारू काढण्यासही लेप उपयुक्त; हिच्या पानांची पूड सुंठ व कायफळ यांसह डोकेदुखीवर देतात. टक्कल पडलेल्या डोक्याला पाण्यांतून फळे चोळतात.

 

लेखक: शां. द. पटवर्धन

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate