অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गव्हला

गव्हला

गव्हला

( गहुला हिं. सं. प्रियंगू क. तोट्टिला लॅ. अ‍ॅग्‍लेया राक्सबर्घियाना; कुल-मेलिएसी). हा साधारण मोठा वृक्ष ( १२ मी. उंच ) सह्याद्रीच्या दाट जंगलात आढळतो व श्रीलंकेमध्ये १, ८६० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात सापडतो; शिवाय अबूचा पहाड ( राजस्थान); त्रावणकोर, तिनेवेल्ली इत्यादी द. भारतातील प्रदेशांत व मलेशियातही तो पसरला आहे.

कोवळ्या भागांवर लालसर लव असते. पाने संयुक्त, विषमदली, एकाआड एक, पिसासारखी; दले बहुधा सात, क्वचित तीन किंवा पाच; फुले एकलिंगी किंवा द्विलिंगी व गोलसर, सुगंधी, लहान, असंख्य, पिवळी, परिमंजरीय व काहीशा त्रिकोणी फुलोऱ्यावर पानांच्या बगलेत किंवा बगलेवरच्या भागावर नोव्हेंबर ते डिसेंबरात येतात.

मृदुफळे सुकी, फिकट पिवळट, एकबीजी व बोराएवढी असतात [→ मेलिएसी ]. ह्या वृक्षाची साल फिकट तपकिरी व लाकूड गर्द लाल, फार कठीण व चिवट असते.

फळ खाद्य, थंडावा देणारे, दाहात व कुष्ठात स्तंभक ( आकुंचन करणारे ) असते. ह्याचा एक सुगंधी प्रकार असून सुवासिक तेले, उदबत्त्या वगैरे करण्याकडे उपयोगात असल्याचा उल्लेख आढळतो. तसेच गव्हला तुरट, शीतल व केसांना हितकारक असून वांती, दाह, पित्त, ज्वर, तृषा ( तहानेमुळे होणारा शोष ) वगैरे व्याधी दूर करणारा असल्याचे वर्णन आढळते.

गव्हल्याचे ( फळाचे) चूर्ण अम्‍लपित्तावर साखरेबरोबर देतात. गव्हल्याची सुगंधी फुले अत्तरे, तेले वगैरेंत वापरतात. प्रियंगू ( गव्हला) याच नावाने अ‍ॅग्‍लेया वंशातील आणखी एक जाती (अ‍ॅ. ओडोरॅटिसिमा ) ओळखली जाते. ही मूळची मलायी जाती असून ती भारतात बागेत लावलेली आढळते.

 

लेखक - शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 5/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate