অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुच्छ

गुच्छ

गुच्छ

(हिं.गंज्नी; इं. सीलोन सिट्रोनेला ग्रास; लॅ. सिंबोपोगॉन नार्डस; कुल-ग्रॅमिनी). हे गुच्छाप्रमाणे वाढणारे उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत आहे. याचे मूलस्थान आग्नेय आशिया मानतात; तथापि भारतात सर्वसाधारणपणे रुक्ष प्रदेशांत रानटी स्थितीत आढळते. लागवडीत असलेला याचा प्रकार भारतात डेहराडूनमध्ये प्रयोगादाखल उपयोगात आणला असून श्रीलंका व जावा येथे मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली आहे, कारण त्यापासून व्यापारी महत्त्वाचे ‘सिट्रोनेला तेल’ काढले जाते. अलीकडे अमेरिकेत हाँडुरस व ग्वातेमाला येथेही याची मोठी लागवड केलेली आहे. याची पाने अरुंद व सु. एक मी. लांब असून मुख्यतः त्यांचा उपयोग तेल काढण्याकरिता होतो. या गवताची सर्वसामान्य शारीरिक लक्षणे ⇨ग्रॅमिनी कुलात व ⇨ग्रॅमिनेलीझ गणात वर्णिल्याप्रमाणे आहेत.

फुलोरा (परिमंजरी) लांबट व खोडाच्या टोकास व महाच्छदासारख्या (फुले वा फुलोरे ज्यांच्या बगलेत येतात अशा मोठ्या पानासारख्या) आवरकांच्या बगलेत येणाऱ्या मंजऱ्यांनी भरलेला असतो. भिन्नलिंगी कणिशके विषम प्रकारची, अनेक व प्रशूकयुक्त (कुसळयुक्त) असतात.

एक अवृंत्त (बिनदेठाचे) व दुसरे संवृत्त (देठ असलेले); पहिल्यात एक फूल पण संख्येने दुसऱ्यापेक्षा ती कणिशके अधिक असतात. लघुतुषे (लहान तुसे) दोनच असून संवृत्त कणिशके लहान असतात.हे गवत ओलसर व उष्ण हवेत आणि भरपूर सूर्यप्रकाशात चांगले वाढते; कसलीही जमीन चालते पण खत घातल्यास वाढ अधिक चांगली होते. बिया व भूमिस्थित (जमिनीतील) खोडाचे तुकडे लावून नवीन लागवड करतात; प्रथम ६-८ महिन्यांनी कापणी व मळणी करतात; पुढे दरवर्षी तीनदा कापणी होते.

दहा वर्षांनंतर लागवड पुन्हा करणे अधिक फायदेशीर असते. तीन वर्षांनी जास्तीत जास्त पीक मिळते; डेहराडूनमध्ये दर हेक्टरी हिरवे गवत ८४,००० किग्रॅ. मिळाले होते. हे पीक एक दोन दिवस सुकल्यावर त्यापासून वाफेच्या साहाय्याने (ऊर्ध्वपातनाने) तेल काढतात. दर हेक्टरी सु. ७६ — १०८ किग्रॅ. तेल दरवर्षी मिळते. हे तेल प्रथम पिवळट असते पण पुढे फिकट हिरवे होते; यात ४० टक्के जिरॅनिऑल व ७ —१५ टक्के सिट्रोनेलॉल असते. इंडोनेशिया, फॉर्मोसा व चीन येथे बनविले जाणारे सिट्रोनेला तेल (जावा प्रकार)सिंबोपोगॉन विंटरियानुस या दुसऱ्या जातीपासून काढलेले असते; यात वरील द्रव्ये अधिक प्रमाणात असतात.

ह्या सिट्रोनेला तेलाचा मुख्य उपयोग साबण, सुगंधी तेले, रोगणे, फवारे, जंतुनाशके, पॉलिश करण्याची द्रव्ये, कीटकनाशके ह्यांसाठी करतात; डासांविरुद्ध उपयोग करण्यास मोहरीच्या किंवा खोबऱ्याच्या तेलात हे तेल मिसळून वापरतात. सार व कढी व मासळीचे पदार्थ ह्यांना स्वाद येण्यास या गवताची पाने उपयोगात आणतात.

चहाच्या पत्तीप्रमाणेही ती वापरतात. भारतात सिट्रोनेला तेलाची वर्षाला सु. १,७७,००० — २,४३,००० किग्रॅ. आयात होते; यापैकी बराच भाग श्रीलंका-प्रकारचा व थोडा भाग जावा-प्रकारचा असतो. भारतात उत्तर प्रदेश व केरळ येथे सोईस्कर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड करून आयात कमी करणे शक्य आहे; असे आढळले आहे.

 

लेखक: ठोंबरे म. वा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate