অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गेलार्डिया पल्चेला

गेलार्डिया पल्चेला

गेलार्डिया पल्चेला

(इं. ब्लँकेट फ्लॉवर; कुल-कंपॉझिटी). ही मूळची उत्तर अमेरिकेतील शोभेची ओषधी [→ ओषधि]. भारतात व इतरत्र बागेत लोकप्रियतेमुळे लागवडीत आहे. एम्.गेलार्ड (गायार), या फ्रेंच वनस्पतिविज्ञानाच्या पुरस्कर्त्याचे नांव हिच्या नावात अंतर्भूत केले आहे. हिची उंची ४५ — ६० सेंमी. असून ती वर्षायू (एक वर्ष जगणारी) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) व शाखायुक्त असते. पाने बिनदेठाची, एकाआड एक लंबगोल किंवा कुंताकृती, खंडित वा अखंड, खालची अल्पपिच्छाकृती (पिसासारखी) व ठिपकेदार असतात; स्तबके मोठी, ५ — ७ सेंमी. व्यासाची, लांब देठाची, विविधरंगी व एकेरी किंवा दुहेरी असतात. किरण-पुष्पके जिव्हाकृती, टोकास पिवळी, मागे लाल व वंध्य; बिंब-पुष्पके लालसर जांभळी व फलनक्षम; छदमंडल रुंद [→ पुष्पबंध; फूल]. फुले मार्च-जुलैमध्ये येतात परंतु अधिक काळही येत रहातात. हारतुरे, फुलदाण्या वगैरेंकरिता विशेष वापरतात. गेलार्डिया लोरेंझियाना ही नवीन दुहेरी जाती फार सुंदर दिसते. मोठ्या एकेरी फुलाच्या जातीत गे पल्चेला-पिक्टा म्हणतात. त्यात अनेक रंगांचे प्रकार आहेत. एका प्रकारात पुष्पके नलिकाकृती असतात. वाफ्याच्या कडेने आणि मधे लावतात. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये बी पेरल्यास उन्हाळ्यात फुले मिळतात. मे-जूनमध्ये पेरणी केल्यास पावसाळ्यात फुले येतात. हिवाळ्यात फुले मिळण्यास सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बी पेरतात. डोंगराळ भागात मार्च-एप्रिलमध्ये बी पेरतात. पेरणीनंतर महिन्याने रोपे काढून दुसरीकडे लावतात. भरपूर सूर्यप्रकाश व मध्यम दुमट जमीन आवश्यक असते; त्यानंतर ३१/२ – ४१/२ महिन्यांनी फुले येतात. ही वनस्पती अतिशय काटक असल्याने संवर्धन सोपे असते. फुलांना बाजारात सदैव मागणी असते. (चित्रपत्र).

 

 

लेखक: सिंधु अ. पराडकर

गेलार्डिया पल्चेला : दोन प्रकार

 

 

 

 

 

 

 

 

स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate