অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गेवा

गेवा

गेवा

(फुंगली, सुरुंद; क.हर्स; सं. अगरु; इं. ब्लाइंडिंग ट्री; लॅ, एक्स्कोकॅरिया अगलोचा; कुल - यूफोर्बिएसी). या लहान, सु. ४·५ — ७·५ मी. उंच, सदापर्णी व विषारी वृक्षाचा प्रसार कोकण, गोवा, उ. कारवार इत्यादींतील कच्छ वनश्रीच्या जंगलात (समुद्रकिनाऱ्याजवळच्या भरतीमुळे बनलेल्या जंगलात) व तसेच. श्रीलंका, आशियातील उष्ण प्रदेश, अंदमान बेटे, उत्तर ऑस्ट्रेलिया इ. देशांतही आहे. साल करडी, गुळगुळीत, चकचकीत व अनेक गोल वल्करंध्रांनी (परित्वचेतील सूक्ष्म छिद्रांनी) भरलेली असते. पाने एकाआड एक, जाड, चिवट, साधी, दीर्घवृत्ताकृती, निमुळती व काहीशी दातेरी असतात; लहान सुगंधी, पिवळट हिरवी फुले मंजऱ्यांवर जुलै-ऑगस्टमध्ये येतात. छदे मांसल; पुं-पुष्पे बिनदेठाची आणि लोंबत्या कणिशावर येतात. स्त्री-पुष्पांना देठ असतात [→ फूल]. बोंड ०·६ — २·५ सेंमी. व बी गोलसर, गुळगुळीत असते [→ यूफोर्बिएसी].

पानांचा काढा अपस्मारावर देतात व व्रणावर लावतात. मुळांचा रस हातापायाच्या सुजेवर लावण्याच्या मर्दनलेपात घालतात. साल रेचक व वांतिकारक; झाडाचा रस तेलात उकळून संधिवात, महारोग व पक्षाघातावर लावतात. चीक फार कडू व विषारी असून रेचक व गर्भपातक असतो; तसेच तो मत्स्यविष आहे व बाणाला लावण्याच्या विषात घालतात. चीक डोळ्यात गेल्यास अंधत्व येते. सालीत १०% टॅनीन असते.

लाकूड पांढरट किंवा पिवळट व हलके, मऊ आणि टिकाऊ असते. खोकी, खेळणी, सजावटी सामान, आगकाड्या, कागदाचा लगदा,लोणारी कोळसा, सरपण इत्यादींकरिता उपयुक्त असते.

 

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate