অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोंडाळ

गोंडाळ

गोंडाळ

(गंगावती, शेर्वळ; हिं. जलकुंभी; सं. कुंभिका, वारिपर्णी, प्रश्नी; इं. वॉटर-लेट्युस, वॉटर-कॅबेज; लॅ. पिस्टिया स्ट्रॅटिओट्सकुल-ॲरॉइडी). या लहान शोभिवंत जलवनस्पतीचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधांत भरपूर आहे. सर्वत्र शांत व गोड्या पाण्यात ती आढळते. बागेतील लहान मोठ्या जलाशयात व खोलीतील जलपात्रात शोभेकरिता ठेवतात. ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी),तरंगणारी, एकत्रलिंगी,ओषधी असून पाण्यात आडव्या वाढणाऱ्या जाड खोडाने (तिरश्चर किंवा अपप्ररोह) तिची जलद वाढ व शाकीय प्रजोत्पादन (बियांऐवजी एरवी पोषणाचे कार्य करणाऱ्या इतर अवयवाने होणारे प्रजोत्पादन) होते.गोंडाळ : (अ) वनस्पती; (आ) फुलोरा (उभा छेद) : (१) महाछद, (२) पुं-पुष्प, (३) वंध्य-पुष्प, (४) स्त्री-पुष्प, (५) बीजके; (इ) बीचा उभा छेद : (१) गर्भ, (२) पुष्क.

तिची मुळे आगंतुक, सूत्रल (तंतुमय), पिसासारखी असून त्यांचे झुबके पाण्यात लोंबतात. पाने ४ — ९ सेंमी. लांब, एकांतरीत (एकाआड एक) परंतु झुबकेदार, बिनदेठाची, चमसाकृती (चमच्यासारखी), लवदार; तळातून अनेक शिरा निघून रुंदट टोकाकडे पसरत जातात.पुष्पबंध (फुलोरा) स्थूलकणिश [→ ॲरॉइडी], लहान, द्विलिंगी, महाछद हिरवट व कणिशास चिकटलेला, घंटाकृती, १·५ सेंमी.; सूक्ष्म, एकलिंगी, पांढरट व परिदलहीन फुले कणिशाच्या दांड्यावर टोकास येतात; प्रथम टोकास नर-पुष्पे (पुं-पुष्पे), त्याखाली वंध्य-पुष्पे व सर्वांत खाली तळाशी स्त्री-पुष्प; केसरदले दोन व तंतुहीन; परागकोश जुळलेले; स्त्री-पुष्प एकाकी; एका किंजदलाचा किंजपुट, लंबगोल व एक कप्प्याचा असून अनेक बीजके तटलग्न असतात [→फूल]. फळ लंबगोल, पातळ सालीचे (मृदुफळ) व कसेही तडकणारे; बिया बारीक, अनेक, लंबगोल,सुरकतलेल्या व सपुष्क (गर्भाला पोषणद्रव्ये पुरविणारा स्वतंत्र भाग असलेल्या) असतात. मुळे सारक, मूत्रल (लघवी साफ करणारी) आणि कफोत्सारक; पाने कफोत्सारक असून गुलाबपाणी व साखर यांसह दम्यावर व खोकल्यावर देतात; त्यांचे पोटीस मूळव्याधीवर लावतात; भात व नारळाच्या पाण्याबरोबर ती अतिसारावर गुणकारी असतात;वनस्पतीची राख डोक्यातील नायट्यावर लावतात. पानांचा रस खोबरेलातून उकळून कातडीच्या रोगास लावतात. ही वनस्पती ढेकूणनाशक आहे. जलजीवपात्रात शोभेकरिता वाढवितात; ती माशांचे खाद्य आहे.

गोंडाळ ही वनस्पती ज्या पाण्यात वाढते, त्यातील पोषक द्रव्ये बरीचशी कमी होतात, त्यामुळे तेथील माशांना पोषणद्रव्ये कमी पडतात. यावर एक उपाय सुचविण्यात आला आहे. एरॅस्ट्रॉइडिस स्ट्रॅटिऑइडिस या कीटकाचे डिंभ (अळीसारखी पिल्ले) गोंडाळाची पाने व खोडे अधाशीपणे खाऊन टाकतात, असे आढळल्यामुळे गोंडाळ फार वाढते तेथे या कीटकांच्या डिंभांचा प्रवेश (अगोदर प्रयोगशाळेत कृत्रिम पैदास करून) केल्यास गोंडाळाची बेसुमार वाढ थांबून माशांची पैदास वाढण्याची शक्यता आहे.

 

 

लेखक: शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate