অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चंदनबटवा

चंदनबटवा

चंदनबटवा

(सुरका; इं. गार्डन ओरॅक, मौंटन स्पिनॅक, सी-पर्स्लेन; लॅ. ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस कुल-चिनोपोडिएसी). सु. अर्धा मी. उंचीची ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी हिरवी पिवळट किंवा लालसर असते; या झाडाला कापरासारखा वास येतो; खोडावर बारीक खोबणी असतात; पाने एकाआड एक व साधी; खालची किंचित त्रिकोणी व शेंड्याकडची लांबट; खालची बाजू जांभळट पिंगट आणि कडा साधारण दातेरी; फुलोरा माठाप्रमाणे कणिशांची परिमंजरी; फुले लहान द्विलिंगी व एकलिंगी प्रदलहीन, हिरवट किंवा लालसर असून ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये येतात. काहींत परिदले ३-५ व छदहीन, काहींत फक्त दोनच छदे. केसरदले ३-५ [⟶ फूल]; सर्वसाधारण लक्षणे चिनोपोडिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे; हिचे मूलस्थान आशिया आहे, पण यापेक्षा अधिक माहिती नाही. बियांतील पूड अ जीवनसत्त्वाभावी देतात. ही वनस्पती पालेभाजीकरिता उपयोगात आहे. संग्रहणी, मूळव्याध या विकारांवर व कृमिनाशक म्हणून उपयुक्त आहे.

भारतामध्ये ही काश्मीर, पं. बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात लावतात. या पिकाला मध्यम काळी जमीन मानवते. जमीन दोनदा नांगरून हेक्टरी २० — २५ टन शेणखत घालून, कुळवून ३·६ X १·८ मी. चे वाफे करतात आणि त्यांत हेक्टरी ४·५ किग्रॅ. बी फेकतात, मातीत मिसळतात व पाणी देतात. बी पेरल्यापासून ४ — ५ आठवड्यांत पीक विक्रीसाठी काढतात. हेक्टरी ४,००० ते ५,००० किग्रॅ. पालेभाजी मिळते.

 

पाटील, ह. चिं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate