অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चहा, गवती

चहा, गवती

चहा, गवती : (पातीचा चहा; हिं, गंधतृण; गु. लिलिचा; क. मज्जिगे हुळू; सं. भूस्तृण, सुगंधी; इं. वेस्ट इंडियन लेमन ग्रास; लॅ. सिंबोपोगॉन सिट्रेटस; कुल-ग्रॅमिनी). ही सु. १.५ मी. उंच व झुबक्यांनी वाढणारी सुगंधी व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) गवताची जाती मूळची भारतीय असावी, तथापि आता उष्ण व उपोष्ण कटिबंधांत सर्वत्र आढळते. भारतात कोठेकोठे जंगली अवस्थेत आढळली, तरी बहुतेक सर्वत्र (महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ येथे) लागवड केली जाते. खोड (मूलक्षोड) आखूड व जमिनीत वाढते व काही भाग जमिनीवर (संधिक्षोड) येतो. पाने साधी, रेषाकृती, टोकास निमुळती (सु. ९० सेंमी. लांब), निळसर हिरवी व खरबरीत असतात. जिव्हिका (पानाच्या देठापाशी असणारी लहान वाढ) फार लहान व आवरक (खोडास वेढणारा पानाच्या देठाचा भाग) शूलाकृती असतो. फुले ३०-६० सेंमी. लांबीच्या महाछदयुक्त परिमंजरीवर येतात [→ फूल]. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ग्रॅमिनी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

पानांचा काढा (चहा) उत्तेजक, ज्वरनाशक व घाम आणणारा असल्याने सर्दीवर घेतात. ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून) पानांपासून सुगंधी बाष्पनशील (उडून जाणारे) तेल (इंडियन मोलिसा तेल) काढतात. त्यात सिट्रॉल असते. तेलात सारक, उत्तेजक इ. गुणधर्म असून पटकीवर देतात. ते नायट्यावर लावतात, अत्तरे व सुगंधी द्रव्यांत आणि औषधांत वापरतात.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate