অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चाफा, नाग

चाफा, नाग

चाफा, नाग : (नागचंपा; हिं., सं., क., गु. नागशेकर;

क. नागसंपिगे; सं. नागपुष्प, सुवर्णा; इ. आसाम (सीलोन) आयर्नवुड; लॅ.मेसुआ फेरिया; कुल-गटिफेरी). हा सुंदर, सु. १५-१८ मी. उंच व सदापणी वृक्ष आसाम, पूर्व हिमालय, कारवार, द. कोकण, त्रावणकोर, कोचीन, अंदमान बेटे व श्रीलंका येथील व उष्ण कटिबंधातील सदापर्णी जंगलांत आढळतो. बौद्ध विहारांत व हिंदुच्या मंदिराच्या आसपास तो लावतात. ⇨गुलमोहराप्रमाणे याच्या तळाशी आधारमुळे असतात. याचा परीघ १.५-२ मी. असून खोडावरच्या लालसर तपकिरी सालीचे पातळ तुकडे सोलून निघतात. पाने साधी, समोरासमोर, चिवट, चकचकीत व टोकदार आणि खालच्या बाजूस लवदार असतात. पांढरी, सुवासिक, लहान फुले एकाकी किंवा जोडीने फेब्रुवारी ते मार्चमध्ये येतात. पाकळ्या चार व परागकोश सोनेरी. फळ (बोंड) खाद्य, जाड कवचाचे, टोकदार व मोठ्या बोराएवढे असून त्यात गडद तपकिरी व गुळगुळीत चार बिया असतात.

इतर सामान्य शारीरिक लक्षणे कोकम कुलात [गाटिफेरी] वर्णिल्याप्रमाणे. याचे लाकूड कठीण, लालसर, टिकाऊ असून ते लोहमार्गाखालील आडवे ओंडके (सिलिपाट), सजावटी सामान, गाड्या, नांगर, होडगी, शिडाचे खांब इत्यादींकरिता वापरतात. फुलांपासून अत्तर व सुगंधी तेले बनवितात; बियांतील तेल दिव्याकरिता वापरतात. कोवळ्या फळाजवळ येणारी राळ कॅनडा बाल्समाऐवजी उपयुक्त असते.साल व मुळे यांतील राळ तेल अथवा टर्पेंटाईन यामध्ये मिसळून रोगणाकरिता वापरतात. राळ शामक; साल व फुले स्तंभक (आतड्यांचे आंकुचन करणारी) व पाचक; फले कफनाशक; लोणी व फुलांचा लगदा आल्यासह मुळव्याध व तळव्यांची आग यांवर आणि बियांचे तेल संधिवातावर उपयुक्त असते. शोभेकरिता व सावलीकरिता हा वृक्ष बागेत लावतात.

 

नागचाफा : फुल व फळासह फांदी


 

लेखक: पाटील शा. दा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate