অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिनोपोडिएसी

चिनोपोडिएसी

चिनोपोडिएसी

(चक्रवर्त अथवा चाकवत कुल). एंग्लर आणि प्रांट्‌ल यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीप्रमाणे सेंट्रोस्पर्मी या गणामध्ये ह्या द्विदलिकित (बियांत दोन दलिका असणाऱ्या) वनस्पतींच्या कुलात अंतर्भाव होतो. ⇨अ‍ॅमरँटेसी, ⇨निक्टॅजिनेसी, बॅसेलेसी [→ मयाळ] इत्यादींचाही त्याच गणात समावेश आहे, हचिन्सन यांनी चिनोपोडिएलीझमध्ये (चक्रवर्त गणात) हे कुल घातले आहे. बेंथॅम व हुकर यांच्या पद्धतीत कर्व्हेम्ब्रिई या श्रेणीत याचा समावेश केला आहे. चिनोपोडिएसी कुलात सु. १०२ वंश व १,४०० जाती येतात. (रेंडल : १०१ वंश व १,२०० जाती). त्यांचा प्रसार जगात सर्वत्र, मुख्यतः कोरड्या व लवणयुक्त जमिनीत आहे.

या वनस्पती लहान, ⇨ओषधी, क्षुपे (झुडपे) क्वचित लहान वृक्ष असून विशेषेकरून लवणयुक्त जमिनीत वाढणाऱ्या वनस्पतींची पाने जाड, काहीशी रसाळ व लहान असतात. कधी पाने नसतात; असल्यास ती एकाआड एक, क्वचित समोरासमोर व बदकाच्या पायाच्या तळाप्रमाणे असल्याने कुलवाचक लॅटिन नाव पडले आहे. फुलोरा कुंठित [→ पुष्पबंध] व फुले लहान, हिरवट, बहुधा द्विलींगी, केव्हा एकलिंगी असतात.

परिदले पाच, क्वचित तीन किंवा चार, सुटी व दीर्घस्थायी (दीर्घकाल राहणारी) असतात. पुं-पुष्पात कधी परिदले नसतात. केसरदले पाच किंवा परिदलांइतकी, त्यांच्यासमोर व सुटी; किंजदले बहुधा दोन, किंजपुट ऊर्ध्वस्थ, क्वचित अर्धवट अधःस्थ [→ फूल]; फळे लहान, गोल, शुष्क, एकबीजी (क्लोम; काष्ठफल) व परिदलवेष्टीत [→ फळ]. वायुपरागित किंवा स्वपरागित (वायूच्या साहाय्याने किंवा स्वतःच घडविलेला परागांचा प्रसार) बी सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेले) व गर्भ वक्र असतो. बीट (चुकंदर), चंदनबटवा, पालक, चाकवत इ. भाजीसाठी उपयुक्त वनस्पतींचा अंतर्भाव याच कुलात होतो. बीटपासून (जर्मनी व फ्रान्स येथे) साखर बनवितात. औषधी व इतर प्रकारे उपयुक्त वनस्पतीही या कुलात समाविष्ट आहेत. ⇨माचुरा समुद्रकिनारी वाढते; ⇨मयाळाचा समावेश हल्ली बॅसेलेसी अथवा मयाळ कुलात करतात; पूर्वी या कुलात केला जात असे.

 

 

लेखक: पाटील, शा. दा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate