पहा : रोझेसी
या वृक्षाला थंड हवामान लागते व सुपीक, दुमट, निचऱ्याची जमीन लागते. प्रकाराप्रमाणे व जमिनीच्या मगदुराप्रमाणे कलमांची लागण ९–१२ मी. अंतरावर करतात. जंगली चेरीवर गोड चेरीचे कलम करून ते दोन वर्षांनी लागवडीसाठी घेतात. लागवड जानेवारीत करतात. कडक उन्हाचा चटका झाडांना बसणार नाही, अशी व्यवस्था करतात. फारशी छाटणी न करताही झाडे चांगला आकार घेतात, पण विस्तार फार होऊन दाट झाल्यास छाटणी करून तो विरळ करतात. झाडे फार उंच वाढू देत नाहीत. चेरीच्या बागेत गवते लावून त्यांच्यावर मेंढरे चारतात. मेंढरांच्या लेंड्यांमधून झाडांना खत मिळते त्याशिवाय फॉस्फरसयुक्त वरखतही या झाडांना घालतात. चौथ्या-पाचव्या वर्षापासून फळे येऊ लागतात. बहुतेक जागी गोड फळेच खातात. थोड्या प्रमाणात ती हवाबंद डब्यांत भरतात. दर झाडापासून सरासरी ९ ते १८ किग्रॅ. फळे मिळतात. ४० ते ६० वर्षांपर्यंत चांगले उत्पादन चालू राहते.
चौधरी, रा. मो.
चेरीवर कीटक उपद्रव फारसे आढळत नाहीत. या वृक्षाला होणाऱ्या रोगांत पानावर तांबूस जांभळट ठिपके पडणे आणिस्पूडोमोनस मॉर्सप्रूनोरम या सूक्ष्मजंतूंमुळे पानांवर व फळांवर लहान डाग आणि फांद्यांवर व्रण पडणे या दोन रोगांचा समावेश होतो. या दोन्ही रोगांच्या निवारणार्थ ३ : ३ : ५० कसाचे बोर्डो मिश्रण झाडांवर फवारतात.
रुईकर, स. के.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020