অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चोपचिनी

चोपचिनी

(हिं. चोबचिनी; लॅ.स्मायलॅक्स चायना; कुल-लिलिएसी). प्रतानांच्या (तणाव्यांच्या) साहाय्याने वर चढणारी ही झुडुपवजा वेल चीन, जपान,कोचीन चायना व भारत ह्या प्रदेशांत साधारण उबदार हवामानात आढळते. मुळे भक्कम व ग्रंथिल असून भूमिस्थित खोड मूलक्षोड प्रकारचे असते. वायवी फांद्या गोल व काटेरी आणि उपशाखा बिनकाटेरी असतात. उपपर्णे प्रतानरूप; पानाचा देठ पेरेदार व तळ त्रिकोनी; पात्यातील मुख्य शिरा तीन ते सात आणि मांडणी जाळीदार व हस्ताकृती; पाने साधी व एकांतरित (एका आड एक) असतात. फुलोरा चामरकल्प (चवरीसारखा) व सच्छद[ → पुष्पबंध] असून त्यावर लहान एकलिंगी फुले पावसाळ्याच्या शेवटी येऊ लागतात. मृदुफळात एकदोन बिया असून पुष्क (बीजातील गर्भाबाहेरील अन्नांश) कठीण असतो. इतर सामान्य लक्षणे ⇨लिलिएसी अथवा पलांडू कुलात वर्णिल्याप्रमाणे. मुळे वाजीकर (कामोत्तेजक), स्वेदक (घाम आणणारी) आणि शामक असून जुनाट संधिवात, उपदंश व चर्मरोग यांवर उपयुक्त असतात.

बडी चोपचिनी

(सं. शुकचीना; लॅ. स्मायलॅक्स ग्लॅब्रा ). ही त्याच वंशातील बिनकाटेरी जाती आसाम, सिल्हेट व खासी टेकड्या येथे आढळते. हिची मुळे ग्रंथिल असतात. पानांत फक्त तीन शिरा, पर्णतल गोलसर, पाने खालून पांढरट व देठ तळाशी आवरक (खोड वेढणारा) असतो. फुलोरा चामरकल्प; फुले लहान, पांढरी शुभ्र असून इतर लक्षणे वरच्याप्रमाणे. ताज्या मुळांचा काढा जखमा व गुप्तरोग यांवर उपयुक्त आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate