অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जाफरी गेंद

जाफरी गेंद

जाफरी गेंद

(जाफरी गुंडी; इं. ग्लोब अ‍ॅमरँथ, बॅचलर्स बटन; लॅ. गॉम्फ्रिना ग्लोबोजा कुल-अ‍ॅमरँटेसी). ही सु. ३०–९० सेंमी. उंच, सरळ, केसाळ, द्विशाखाक्रमी (पुनःपुन्हा दोनदा विभागलेल्या) खोडाची, वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी [→ ओषधि], मूळची अमेरिकेतील असून तिची शोभेकरिता बागेत लागवड करतात. तथापि बागेतून निसटून ती कोठेकोठे पडीत जागी उगवलेली आढळते.

पाने साधी दीर्घवृत्ताकृती किंवा मुकुलाकृती (कळीच्या आकाराची), लांबट, २·५ ते ४ सेंमी. व्यासाची असतात. पिवळट पांढऱ्या किंवा लाल रंगाची गोलसर स्तबके फांद्यांच्या टोकांस पावसाळ्यात वा हिवाळ्यात येतात.

छदे पानासारखी व छदके (फुलांच्या किंवा फुलोऱ्यांच्या तळाशी असलेली उपांगे) गुलाबी किरमिजी असून फुले फार सूक्ष्म व भिन्न रंगछटा असलेले अनेक प्रकार उपलब्ध आहेत; सुकल्यावरही स्तबकांचा आकार व रंग कायम राहतो [→ अ‍ॅमरँटेसी]. मोल्यूकसमध्ये या वनस्पतीची भाजी करतात; काही देशांत मुळे खोकल्यावर देतात.

पाळीव जनावरे गवतापेक्षा गॉम्फ्रिनाच्या इतर जाती जास्त आवडीने खातात. नवीन लागवड बियांपासून करतात. मे-जून मध्ये रोपे तयार करून लावल्यास सु. अडीच महिन्यांत फुले येऊ लागतात. खडकाळ जमिनीत विशेषेकरून लावतात; बागेत वाफ्याच्या कडेनेही लावतात. फुलदाणीत भिन्न रंगांची फुले एकाच वेळी ठेवल्यास अधिक शोभा येते.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

जाफरी गेंद

जाफरी गेंद

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate