অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जायफळ

जायफळ

(क. जाजीकाई; सं. मालतीफलम्, जातिफलम्; इं. नटमेग; लॅ. मिरिस्टिका फ्रॅग्रॅन्स, कुल-मिरिस्टिकेसी). आशियाच्या पूर्वेस असलेल्या मोल्यूका बेटात फार पूर्वीपासून ही झाडे असून ते त्यांचे मूलस्थान आहे. आता दोन्ही गोलार्धांतील उष्ण कटिबंधीय देशांत त्यांची लागवड करतात. मलायात मोठी लागवड आहे. भारतात तमिळनाडू राज्यात (निलगिरी, कोईमतूर, सालेम, तिनेवेल्ली, मदुराई, कन्याकुमारी इ. जिल्ह्यांत) लागवड केलेली आहे. गरम व ओलसर हवा त्यांना मानवते म्हणून अशा ठिकाणी शास्त्रीय उद्यानात आणि कोकण, कारवार, केरळ व आसाम येथे ही झाडे लावलेली आढळतात. आंध्र प्रदेशांत (अराकूदरी) व केरळात (वायनाड) याची वाढ चांगली होते, असे प्रयोगान्ती आढळले आहे. बियांपासून लागवड करतात रोपांना सावलीकरिता केळी, ग्लिरीसीडिया वगैरे झाडे लावतात. कॉफी, चहा, नारळ, सुपारी व रबर यांच्या मळ्यांत जायफळ मिश्रपीक म्हणूनही लावतात. कलमे लावून वाढविण्याचे प्रयोग वेस्ट इंडीजमध्ये यशस्वी झाले आहेत.

संस्कृत वाङ्‌मयात इ. स. ६०० पासून जायफळाचा उल्लेख सापडतो. भारतातील व ब्रह्मदेशातील जायफळाची सर्व नावे मूळच्या संस्कृत नावाशी फार साम्य दर्शवितात, त्यावरून ते झाड पहिल्याने मलायातून भारतात फार पूर्वी आले असावे. जायफळाच्या वंशात (मिरिस्टिका) एकूण ८० जाती असून ⇨मिरिस्टिकेसी कुलात त्याचा अंतर्भाव केला जातो; यात पूर्वी एकाच वंशाचा समावेश असे; परंतु वॉरबर्ग यांच्या मते हल्ली त्यांत पंधरा वंश असून भारतात त्यांपैकी फक्त चारच आढळतात (मिरिस्टिका, नीमा, हॉर्सफील्डिया, जिम्नॅक्रँथीरा). ⇨रॅनेलीझ अथवा मोरवेल गणात या कुलाचा अंतर्भाव केला आहे; हचिन्सन यांनी याचा लॉरेलीझ गणात अंतर्भाव केला आहे.

हा वृक्ष बहुधा नऊ ते बारा मी. (क्वचित वीस मी. ) उंच, सदापर्णी, विभक्तलिंगी (क्वचित एकत्रलिंगी) व सुगंधी असतो. साल गर्द  उदी, काळसर, भेगाळ असते. पाने चिवट, एकांतरित (एकाआड एक), साधी, पारदर्शक ठिपकेदार, लंबगोल किंवा भाल्यासारखी असतात. फुले सुगंधी, फिकट पिवळट, चामरकल्प (चवरीसारख्या) वल्लरीवर डिसेंबरच्या सुमारास येतात. फुलात फक्त तीन संदले व एकसंध केसरदले किंवा ऊर्ध्वस्थ किंजपुट असतो [→ फूल]. कधी नरवृक्षावर अनेक वर्षांनंतर स्त्री-पुष्पे येऊ लागतात. जायफळाचे झाड सहा ते सात वर्षांचे होईपर्यंत ते नर आहे की मादी हे कळत नाही. बहुधा नर जास्त असतात.

ते फलधारण करीत नसल्याने त्यांपैकी काही काढून थोडे राखावे लागतात. मादी वृक्षाच्या फांदीचे त्यावर कलम करण्याचीही पद्धत आहे. मृदुफळे प्रथम पिवळी पण पुढे तांबूस, ६–९ सेंमी., गोलाकार किंवा पेरूसारखी मांसल, एकाकी, जोडीने किंवा ४–५ च्या झुबक्यांनी येतात. ती लोंबत राहतात व पुढे तडकून दुभंगतात. बी लंबगोल, सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नाने युक्त) असून बाह्याकवच गर्द पिंगट व शेंदरी जाळीदार अध्यावरणाने (पत्रीने) आच्छादलेले असते; यालाच 'जायपत्री' म्हणतात.

बाजारात आलेले ‘जायफळ’ बीवरील कवच काढून पाठविलेले असते. ते फळ नसते, तो बहुतांशी रेषाभेदित पुष्क असतो. साधारणपणे सात वर्षे वयापासून झाडाला फुले येण्यास सुरुवात होते व पंधरा–वीस वर्षापर्यंत फळे सामान्यतः वर्षभर (पण जून ते ऑक्टोबरमध्ये अधिक) येत राहतात. सत्तर ते ऐंशी वर्षे वयाच्या वृक्षांनाही फळे येत राहिल्याची उदाहरणे आहेत. प्रत्येक झाडाला दरवर्षी सु. १,२०० फळे येतात, परंतु चार हजार फळे देणारी झाडेही बरीच आढळतात.

परदेशांत जास्तीत जास्त वीस हजार फळांचा विक्रम नमुद आहे. ईस्ट इंडीयन (इंडोनेशिया) जायफळ व जायपत्री विशेष प्रसिद्ध आहे, कारण ती अधिक चांगली असतात. जायफळाला उग्र वास व तिखट चव असते. जायपत्री तिखट, कडवट, तोंड स्वच्छ करणारी, रुचिकर व उष्ण असते. जायफळ तुपात ठेवल्यास फार वर्षे टिकते. ते विड्यात (तांबूलात) व पक्वानांत वास व चव यांकरिता घालतात ते वाजीकर (कामोत्तेजक), उत्तेजक, स्तंभक (आतड्याचे आकुंचन करमारे) व वायुनाशी असते.

डोकेदुखी, निर्दानाश, अतिसार, वांत्या, उचकी, पोटफुगी, बद्धकोष्टता इत्यादींवर गुणकारी आहे. जायफळातील तेलही औषधी आहे जायफळाच्या इतर जातींतील बियांचे तेल दिव्यात जाळण्यास वापरतात. लांबट व अरुंद जायफळे दुसऱ्या जातीची (मिरीस्टिका मॅलबॅरिका) व कमी दर्जाची असल्याने त्यांची भेसळ केली जाते. मसाल्यात व औषधांत त्यांचे बी व पत्री यांचे उपयोग सारखेच आहेत. जायफळात सहा ते सोळा टक्के बाष्पनशिल (उडून जाणारे) तेल असते व औषधी गुण या तेलामुळेच असतात. शिवाय त्यातील ‘मिरिस्टिसीन’ हे विषारी द्रव्य अधिक प्रमाणात घेतल्यास त्याचा यकृतावर दुष्परिणाम होतो.

बिघडलेल्या जायफळांपासून चरबीयुक्त पदार्थ काढतात, त्यास जायफळाचे ‘लोणी’ म्हणतात; त्याचा उपयोग साबणास सुवास आणण्यासाठी करतात; शिवाय मलमाकरिता आणि संधिवात, पक्षाघात, मुरगळणे इत्यादींवर लावण्याकरिता करतात. पत्रीची चव व वास बियांप्रमाणेच असतात. सालीपासून ‘कीनो’ नावाचा डिंक मिळतो. पाने, फुले आणि साल यांपासूनही बाष्पनशील तेल मिळते. बियांच्या किंवा पत्रीच्या तेलाचा उपयोग अन्नपदार्थ, पेये, साबण, तंबाखू, दंतमंजने व सुगंधी प्रसाधने, मर्दनाची किंवा केसांची तेले यांत करतात. पक्व फळांच्या सालीचे लोणचे, मुरंबे वगैरे बनवितात.

जायफळाच्या लागवडीकरीता सकस निचऱ्याची जमीन, उष्ण, सर्द हवा व सु. १५०–१७५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमान लागते. ताज्या बियांपासून प्रथम रोपे तयार करून ती पन्हेरीत वाढवितात. नंतर सु. ६०–९० सेंमी. उंच झाल्यावर ती योग्य ठिकाणी ८–१० मी. अंतरावर लावतात. जवळपास वाढणाऱ्या तणांपासून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असते.

जंगली जायफळ

(हिं. रामपत्री, पथिरी; क. कणगी; सं. कामुका; इ. फॉल्स नटमेग, मलबार नटमेग, बाँबे मेस ट्री; लॅ. मिरिस्टिका मॅलबॅरिका.) हा मध्यम आकाराचा (सु. १५·५० मी. उंच व घेर ०·४६ मी.), विभक्तलिंगी व सदापर्णी वृक्ष सह्याद्री घाटावरील सदापर्णी जंगलात व कोकण, कारवार, मलबार (३१० मी. उंचीपर्यंत) इ. भागांत आढळतो. हा जायफळाच्याच वंशातील असल्याने याची अनेक शारीरिक लक्षणे त्यासारखी आहे. साल गुळगुळीत व हिरवट काळी असून आतील भागात तांबूस रस असतो.

पाने साधी, आयतकुंतसम (भाल्यासारखी) व चिवट असतात. एकलिंगी फुले नोहेंबर ते मार्चमध्ये येतात. फळ लांबट, आयत (५–६·३ X २·५–३·२ सेंमी.), लोमश (केसाळ); बी काळे, चकचकीत, सुरकुतलेले आणि अध्यावरण तांबूस पिवळे, खंडित व जाळीदीर असते. बी एका बाजूस चपटे असते व काळे बाह्यकवच काढून नंतर ते व पत्री चांगल्या जायफळ–जायपत्रीत भेसळ करून बाजारात विकतात.

जंगली जायफळाला व जायपत्रीला रुची आणि वास जवळजवळ नसतात. बियांत १५–१६ टक्के चरबी असते व तिचे संपूर्ण रासायनिक संश्लेषण झाले आहे. जायपत्रीत चरबी व राळ ६३·२६ टक्के असते; ही चरबी वर वर्णिलेल्या जायफळातल्याप्रमाणे असते. बिया कुटून पाण्यात उकळल्यास पिवळसर घट्ट तेल निघते; इतर कोणत्याही तेलात मिसळून ते पातळ करून औषधी उपयोगात येते. ते जखमांवर लावतात; ते वेदनाहारक असून जुनाट संधिवातावर चोळण्यास चांगले व दिव्यातही जाळण्यास उपयुक्त असते. झाडाच्या सालीपासून ‘कीनो’ मिळतो. याचे लालसर तपकिरी लाकूड फारसे टिकाऊ नसल्याने चहाची खोकी, आगपेट्या व आगकाड्या, साधे सजावटी सामान व घरबांधणी इत्यादींकरिता ते उपयुक्त असते.

 

 

लेखक: राजे, य. बा., परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate