অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जास्वंद

जास्वंद

(जास्वंदी; हिं. जासुम, गुऱ्हाल; गु. जसुंद, जसुबा; क. दसवला, दाशाळ; सं. जपा, अरुणा, पद्मचारिणी; इं. शू-फ्लॉवर, चायना रोझ; लॅ. हिबिस्कस रोझा-सायनेन्सिस; कुल-माल्व्हेसी). हे बारमहा फुले देणारे, सदापर्णी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे), १–२·५ मी. उंच झुडूप मूळचे चीनमधील असून त्याचा प्रसार जगातील सर्व लहानमोठ्या उद्यानांतून झाला आहे. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), अंडाकृती, दंतुर व उपपर्णयुक्त (सोपपर्ण); फुले मोठी, लांब देठाची, एकाकी, लाल व कक्षास्थ (पानांच्या बगलेत) असून संरचना व इतर सामान्य लक्षणे भेंडी कुलात [→ माल्व्हेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. अपिसंवर्त (संवर्ताखालील छदांचे वर्तुळ) संदलापेक्षा लहान, प्रदले (पाकळ्या) संदलापेक्षा तिप्पट मोठी, केसरदले एकसंध (एकत्र जुळलेली), पुष्पमुकुट साधारण घंटेसारखा वा नसराळ्यासारखा (१०–२० सेंमी.) व तळाशी केसरनलिकेशी जुळलेला असतो [→ फूल].

नवीन लागवड कलमांनी करतात कारण भारतातील हवामानात फलधारणा होत नाही. एकेरी व दुहेरी पुष्पमुकुट असलेले आणि पांढऱ्या, पिवळ्या व नारंगी फुलांचे संकरज प्रकार बागेतून आढळतात. लालरंगी फुले हिंदू गणपतीच्या पूजेकरिता वापरतात. बागेत ही झाडे शोभेकरिता कुंपणाच्या कडेने लावतात. काळ्या बुटाला लाल फुले चुरडून लावल्यास चांगली चकाकी येते, त्यावरून 'शू-फ्लॉवर' हे इंग्रजी नाव प्रचारात आले. फुलांपासून मिळणारा लाल रंग खाद्यपदार्थांत वापरतात. कफविकारांवर मूळ देतात. पाने सौम्य रेचक व वेदनाहारक असतात; पाकळ्यांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) शामक असून ज्वरात प्रशीतक (विशेष प्रकारचा थंडावा देणारा) म्हणून देतात. सालीपासून धागा मिळतो.

गोंड्याची जास्वंद : (इं. कोरल हिबिस्कस, लॅ. हिबिस्कस शायझोपेटॅलस ). जास्वंदाच्या वंशातील ही जाती मूळची पूर्व आफ्रिकेतील असून हल्ली बागेतून आढळते. हे क्षुप (झुडूप) आकर्षक असून त्यास अपिसंवर्त नसतो. फुले लोबंती, पाकळ्या लाल नारिंगी व शेंड्याकडे झालरीप्रमाणे कातरलेल्या असतात. किंजल लांब व केसरनलिकेतून खाली लोंबतो [→ फूल]. नवीन लागवड कलमांनी करतात.

निळी जास्वंद

(इं. रोझ ऑफ शॅरॉन; लॅ. हिबिस्कस सिरियाकस ). ही जाती मूळची चीनमधील असून आता सर्वत्र बागेत लोकप्रिय झाली आहे. क्षुप १·३–३·८ मी. उंच असून पाने साधी, लहान, अल्पवृंत (लहान देठाची), खालची त्रिखंडी, गोल दंतुर व वरची अखंड; छदे ६–७; फुले एकाकी, कक्षास्थ, घंटाकृती, गुलाबी किंवा जाभंळी, तळाशी गडदरंगी; फळ (बोंड) पाच शकलांनी तडकते; नवीन लागवड बिया व कलमे लावून करतात. याचे अनेक संकरज प्रकार उपलब्ध आहेत.

 

चिनी कंदील

(इं. चायनीज लँटर्न; लॅ. माल्व्हाव्हिस्कस आर्बोरियस, अ‍ॅकानिया माल्व्हाव्हिस्कस ) काहीशी जास्वंदीसारखी दिसणारी, तिच्याशी कित्येक लक्षणांत साम्य असणारी व भेंडी कुलातील ही सदापर्णी जाती बागेत लोकप्रिय झाली आहे. ही मूळची द. अमेरिकेतील असून सु. तीन मी.पर्यंत उंच वाढते. हे झुडूप जवळजवळ वर्षभर फुले देते. फुले बहुधा एकेकटी पानांच्या बगलेत येतात. अपिसंवर्त पाच छदांचा असून संवर्त नलिकाकृती आणि एका बाजूस चिरलेला असतो. पाकळ्या लाल अथवा शेंदरट, परिवलित (पिळवटल्यासारख्या) असून फूल बव्हंशी बंदच आणि लोंबत राहते. केसरनलिका पुष्पमुकुटाबाहेर डोकावते व तीतून दहा किंजले बाहेर पडलेली आढळतात. मृदुफळ फार क्वचित आढळते. ते प्रथम पांढरे व नंतर शेंदरी दिसते. नवीन लागवड कलमांनी करतात. चांगल्या हलक्या जमिनीत आणि भरपूर सूर्यप्रकाशात हिची वाढ चांगली होती. छाटणी केल्याने अधिक फुले येतात. हे झुडूप वेलीसारखे चढलेलेही आढळते. शिंपीपक्षी आपली अणकुचीदार चोच फुलाच्या तळात बाहेरून खुपसून मध शोषण करतो.

 

 

लेखक: जोशी, गो. वी.,परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate