অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टँरॅगॉन

टँरॅगॉन

टँरॅगॉन : (इं. एस्ट्रॅगॉन; लॅ. आर्टेमिसिया ड्रॅकुन्क्युलस; कुल–कंपॉझिटी). ही सु. अर्धा मी. उंचीची सुगंधी व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी किरमाणी ओवा [→ ओवा, किरमाणी]. दवणा व ⇨ गाठोणा यांच्या वंशातील असून यांची काही लक्षणे समान आहेत. प. तिबेट, प. हिमालय (४,३४०–४,९६० मी. उंचीपर्यंत) लाहूल अफगाणिस्तान, प. आशिया, द. व मध्य रशिया इ. प्रदेशांत ही आढळते; यूरोपात हिची लागवड केली आहे. भूमिगत खोडापासून आलेली पाने साधी, त्रिखंडित व जमिनीवरील खोडापासून आलेली अखंड, बिनदेठाची, अरुंद, लांब व एकाआड एक असतात. फुलोरा [→ पुष्पबंध] संयुक्त असून शाखित परिमंजरीवर अनेक अर्धगोलाकृती व फिकट हिरव्या रंगाची स्तबके येतात [→ कंपॉझिटी]. पुष्पके एकलिंगी, बाहेरची स्त्रीलिंगी आणि आतील द्विलिंगी असून छदमंडल रुंद व दीर्घवृत्ताकृती दलांचे असते. बिंब अरुंद आणि हिरवे असून त्यावर पुष्पक-छदके नसतात. बिंब-पुष्पके जिव्हिकावंत नसतात [→ फूल].

यूरोपात टॅरॅगॉनाच्या तिखट व उग्र वासाच्या पानांचा उपयोग सॅलड, सार व लोणचे यांकरिता करतात; तसेच व्हिनेगर (शिर्का) मध्ये थोडे तास भिजवून ठेवून ‘टॅरॅगॉन व्हिनेगर’ बनवितात. पानाचे सुगंधी तेल प्रसाधनांच्या वस्तूंत वापरतात. पाने दीपक (भूक वाढविणारी), उत्तेजक, ज्वरनाशी व सौम्य रेचक आहेत. हिची लागवड भूमिगत खोडाच्या तुकड्यांपासून करतात. हलकी व भुसभुशीत जमीन हिला चांगली मानवते.

 

लेखिका: पुष्पलता द. आफळे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate