অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्यूलिप वृक्ष

ट्यूलिप वृक्ष

ट्यूलिप वृक्ष

(इ. व्हाइट वुड, यलो पॉप्लर, कॅनरी वुड; लॅ. लिरिओडेंड्रॉन ट्यूलिपिफेरा; कुल-मॅग्नोलिएसी). ह्या जास्तीत जास्त ७५ मी. उंच व ४·२ मी. व्यास असलेल्या भव्य, पानझडी आणि त्रिकोणाकृती वृक्षाचे मूलस्थान चीन आणि ईशान्य अमेरिका असून भारतात काही टेकड्यांवर याची लागवड केलेली आहे.

लहान वृक्षाची साल पातळ व खवलेदार असून जुन्या वृक्षाची साल जाड व भेगाळ असते. पाने साधी, उपपर्णयुक्त, एकाआड एक, लांब देठाची, त्रिखंडी, सात ते पंधरा सेंमी. लांब आणि तितकीच रुंद असतात.

फुले मोठी, घंटाकृती, हिरवट पिवळी, आत नारिंगी व सुवासिक आणि फळ भुरे व शंकूसारखे असते. इतर सामान्य लक्षणे चंपक कुलात [→ मॅग्नोलिएसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.

ट्यूलिप वृक्षाची पाने व फूलट्यूलिप वृक्षाची पाने व फूल

मुळे, खोड व फांद्यांची साल कडू, सुगंधी, ज्वरनाशी स्वेदकारी (घाम आणणारी) असतात. अग्निमांद्य, संधिवात व हिवताप यांवर देतात; मुळाच्या सालीत ट्यूलिपिफेरीन अल्कलॉइड, बाष्पनशील (उडून जाणारे) तेल, पिवळे रंगद्रव्य व टॅनीन असते.

लाकूड पिवळसर भुरे, चकमदार, मऊ, हलके व टिकाऊ असून त्याचा उपयोग चरक, तेलाची घाणी, सजावटी सामान, कोरीवकाम, वाद्ये, नावा, कपाटे, पेट्या, हलके बांधकाम, रेडिओ व ग्रामोफोनची खोकी व तक्ते इत्यादींसाठी होतो.

फुलांपासून भरपूर मध मिळतो. एका वृक्षापासून सु. एक किग्रॅ. मध मिळतो. तो तांबूस पिवळट व स्वादिष्ट असतो. हा वृक्ष सावलीकरिता व शोभेसाठी बागेत व कुंपणाच्या कडेने लावतात; रोपांपासून किंवा दाब कलमांनी नवीन लागवड करतात. निचऱ्याची जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाशात याची वाढ चांगली होते.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate