অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्रंपेट व्हाइन

ट्रंपेट व्हाइन

ट्रंपेट व्हाइन

(म. तुतारी वेल; लॅ. टेकोमा रॅडिकँस कुल बिग्नोनिएसी). मुळांच्या मदतीने जलद चढत जाणारी ही वेल मूळची उ. अमेरिकेतील असून हल्ली उष्ण प्रदेशांत सर्वत्र आढळते.

हिची पाने संयुक्त, विषमदली; दले नऊ ते अकरा व अंडाकृती-आयात, दंतुर व लांबट टोकाची असतात. नारिंगी किंवा शेंदरी फुले विशेषतः ऑगस्ट–नोव्हेंबरमध्ये फांद्याच्या टोकांस झुबक्यांनी येतात.

संवर्त नळीसारखा व संदले पाच असून पुष्पमुकुट तुतारीसारखा व द्व्‌योष्ठक असतो (त्यावरून इंग्रजी नाव पडले आहे). पाकळ्या पाच, टोकाशी पसरट व फणीप्रमाणे असतात. केसरदले चार व दीर्घद्वयी (दोन लांब व दोन आखूड) असतात. किंजपुट वलयाकृती बिंबावर [⟶ फूल] असून बोंड फुटीर व अनेकबीजी असते.

बिया सपक्ष (पंखासारखा विस्तारित भाग असलेल्या) असतात. ही वेल फुले व पान शोभिवंत असल्याने लोकप्रिय झाली आहे. हिची नवीन लागवड कलमांनी करतात.

 

लेखक: देशपांडे, सुधाकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate