অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डायलेनिएसी

डायलेनिएसी

डायलेनिएसी

(करंबळ कुल). फुलझाडांपैकी (आवृत्तबीज, द्विदलिकित) गटिफेरेलीझ गणात (एंग्लर पद्धतीत परायटेलीझ) अंतर्भूत केलेले एक कुल. वंश सु. ११ व जाती २७५ (विलिस : १० वंश व ४०० जाती). याचा प्रसार सर्व उष्ण कटिबंधीय देश व विशेषतः इंडोमलाया व ऑस्ट्रेलिया प्रदेशांत असून बहुतेक वनस्पती वृक्ष किंवा क्षुपे (झुडपे), काही ⇨ महालता, क्वचित उपक्षुप (लहान झुडूप) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ ओषधी आहेत.

पाने साधी, अखंड, कधी दातेरी, क्वचित कमीजास्त विभागलेली, एकाआड एक, क्वचित समोरासमोर, चिवट, कधीकधी केसाळ व खरबरीत असतात. फुले द्विलिंगी, क्वचित बहुयुतिक (एकलिंगी व द्विलिंगी एकत्र), एकलिंगी (विभक्त झाडांवर) अवकिंज असतात; फुलोरा कुंठित किंवा परिमंजरीय वल्लरी [⟶ पुष्पबंध], क्वचित फूल एकटे व कक्षास्थ (बगलेत) असते.

संदले पाच, सुटी, क्वचित तीन किंवा चार किंवा अधिक, सर्पिल व फुलाबरोबर वाढून सतत राहणारी; प्रदले सुटी, पाच, क्वचित दोन ते सात व बहुधा लवकर गळून पडणारी; केसरदले असंख्य सुटी किंवा तळाशी जुळलेली, किंजदले एक किंवा अनेक, सुटी किंवा कमीजास्त प्रमाणात जुळलेली [⟶ फूल]; बीजके एक किंवा अनेक असून पेटिकाफळे किंवा मृदुफळे असतात.

बीजे सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असणारी) बहुधा अध्यावरणयुक्त असतात. या कुलातील सामान्य उपयुक्त वनस्पती करंबळ व करमळ आहेत. इमारती लाकूड व टॅनीन यांकरिता महत्त्वाच्या अनेक वनस्पती या कुलात समाविष्ट आहेत.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate