অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डिकेमाली

डिकेमाली

डिकेमाली

(हिं. डिकामाली; गु. डिकामारी; सं. नाडिहिंगु, सुवीर्या; क. डिकमल्ली, बिके; इं. गमी केप जॅस्मिन; लॅ. गार्डेनिया गमिफेरा; कुल-रुबिएसी). हा लहान पानझडी वृक्ष श्रीलंकेत व भारतात (प. द्वीपकल्प, सातपुडा ते दक्षिण टोकापर्यंत, उ. कारवार, मलबार) आढळतो. उंची सु. दोन मी. व साल हिरवट तपकिरी व गुळगुळीत असते. आवरक (खोडास वेढणाऱ्या देठाची) उपपर्णे अंतर्वृंत्ती (देठामध्ये) असतात. पाने साधी, जवळजवळ बिनदेठाची, समोरासमोर, चिवट, अंडाकृती व चकचकीत असतात. फुले लहान देठाची, सुवासिक, सुरुवातीस पांढरी परंतु पुढे पिवळी, एक ते तीन एकत्र व फांद्यांच्या टोकांस फेब्रुवारी ते जूनमध्ये येतात. मृदूफळ बोराएवढे, लहान आणि लांबट असून त्यावर कंगोरे व टोकास चिरस्थायी (कायम राहणारा), संवर्त (पाकळ्यांखालचा भाग) असतो. बिया अनेक असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ रुबिएसी अथवा कदंब कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.याचे लाकूड पिवळट पांढरे, कठीण आणि कातीव व कोरीव कामास उपयुक्त असते.

खोडावर येणाऱ्या कळ्यांपासून राळेसारखा हिरवा पिवळा डिंक स्रवतो, तो जमा करून वाळवून त्याचे तुकडे किंवा वड्या करतात, बाजारात तोच डिकेमाली नावाने मिळतो. तो कामोत्तेजक, रक्तशुद्धीकारक, सारक, दीपक (भूक वाढविणारा), कृमिनाशक, जंतुनाशक, उत्तेजक व उद्वेष्टननाशक (आचके थांबविणारा) असतो. डिकेमालीला विशिष्ठ वास असून ती उष्ण व बेचव असते. भूक नसणे, आतडी दुखणे, खोकला, अजीर्ण, गर्भाशयोन्माद, मुलांचे दात येताना होणारे अपचनादी विकार, जंतविकार इत्यादींवर डिकेमाली गुणकारी असते. जनावरांच्या जखमेवर माश्या बसू नयेत म्हणून डिकेमालीची पूड लावतात.

बियांचे तेल अंकुशकृमींवर पोटात देतात. डिकेमाली हा पदार्थ गार्डेनिया ल्युसिडा (ब्रिलियंट गार्डेनिया) या दुसऱ्या क्षुपीय (झुडुपासारख्या) जातीपासूनही मिळतो. ही जाती रुक्ष पानझडी जंगलात आढळते. हिला सुवासिक पांढरी फुले येतात. कळ्या व कोवळे प्ररोह (कोंब) यांपासून डिकेमाली स्रवते, तेलात विरघळवून ती कपाळास चोळल्यास डोकेदुखी थांबते.

 

 

लेखक: हर्डीकर, कमला श्री.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate