অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तरवड

तरवड

(तरवट; हिं, तरोदा, तरवर; गु. अवळ; क. अवरिके; सं, चर्मरंगा, आवर्तकी; इं, टॅनर्स कॅसिया; लॅ. कॅसिया ऑरिक्युलॅटा कुल–लेग्युमिनोजी). टाकळा, बाहवा, कासोदा इ. वनस्पतींच्या वंशातील (सीसॅल्पिनिऑइडी या उपकुलातील) हे उंच व शिंबावंत (शेंगा येणारे) झुडूप कोठेही साधारण रुक्ष ठिकाणी तणासारखे उगवते. याचा प्रसार ब्रह्मदेश, श्रीलंका, पाकिस्तान व भारत (मध्य आणि पश्चिम भाग) इ. ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर जांभ्या दगडाच्या जमिनीत आहे. याची अनेक शारीरिक लक्षणे वर उल्लेखिलेल्या वनस्पतींसारखी आहेत. संयुक्त पाने टाकळ्याएवढी पण दले लहान व त्यांच्या ८–१२ जोड्या असतात; उपपर्णे मोठी हिरवी व हृदयाकृती; फुले मोठी, ५–६ सेंमी. व्यासाची असून त्यांच्या गर्द पिवळ्या पाकळ्यांवर नारिंगी रेषा असतात; ती जानेवारी ते जुलैमध्ये येतात आणि त्यांच्या मंजिऱ्या पानांच्या बगलेत किंवा फांदीच्या टोकास येतात, फुलात सात जननक्षम केसरदले असतात;  खालची तीन बाजूंच्या चारींपेक्षा मोठी असून तीन वंध्य असतात [⟶  फूल]. शिंबा (शेंग) लहान (८–१३ सेंमी.) चपटी, पातळ, फिकट पिंगट, खाचदार व चुरमडल्यासारखी असून तीत १० ते २० बिया असतात. झाडाची साल कातडी कमावण्यास व पाने श्रीलंकेत चहाऐवजी वापरतात. झाडाचे मूळ, पाने, फुले व बिया औषधी आहेत. साल घसा धरल्यास गुळण्या करण्याकरिता, टरफले काढलेल्या बियांचे वस्त्रगाळ चूर्ण नेत्ररोगावर (श्लेष्मलाशोथ), फुलांच्या कळ्यांचा काढा मधुमेह व मूत्रतेवर उपयुक्त असल्याचे नमूद आहे. याच्या पानांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) चांगले शीत पेय आहे. मुळे स्तंभक (आकुंचन करणारी) असून काढा आरोग्यलाभ पुन्हा करून देणारा आहे. फांद्यांचे दातवण करतात. वीर्यस्खलनावर फुले देतात; मधुमेहात फक्त बियांचे चूर्णही उपयुक्त असते. ओसाड जागी लावण्यास ही झाडे चांगली असतात. शोभेकरिता कुंपणाच्या कडेने लावतात.

मोठी तरवड

(क. बेन्नदवरे, तैटे, अडवितंगेडी, लॅ. कॅसिया ग्लॉका ). अनेक फांद्यांचा हा लहान शिंबावंत वृक्ष आशियातील उष्ण प्रदेश, ऑस्ट्रेलिया व भारत (कोकण, कारवार आणि धारवाड येथील जंगले, द. महाराष्ट्र) येथे आढळतो. शारीरिक लक्षणांत याचे बाहवा, टाकळा व तरवड ह्या त्याच्या वंशातील वनस्पतींशी बरेच साम्य आहे. पाने पिसासारखी आणि संयुक्त; दले ४–६ जोड्या; लहान पिवळ्या फुलांच्या मंजऱ्या तरवडी प्रमाणे सप्टेंबर–मार्च मध्ये येतात. शिंबा (१६–२२ X २ सेंमी.) सरळ, चपटी, पातळ व दोन टोकांस निमुळती असून बिया २०–३०, गुळगुळीत, चपट्या व गडद पिंगट असतात. साल कातडी कमाविण्यास उपयुक्त; साल व पाने मधुमेहावर आणि प्रमेहावर गुणकारी. शोभेकरिता झाडे बागेत लावतात.

भुई तरवड

बाजारात गावठी सोनामुखी म्हणून ओळखली जाणारी ही अनेक वर्षे जगणारी ०·३–१ मी. उंच ओषधी अरबस्तान, बलुचिस्तान, सिंध, इथिओपिया व भारत (प. द्विपकल्प व पंजाब) येथे आढळते. ही मुसलमानांनी पहिल्याने युरोपात आणली कारण त्या वेळी खरी सोनामुखी (कॅसिया अंगुस्तिफोलिया ) माहीत नव्हती. सु. तीन शतकांपूर्वी भुई तरवड उ. इटलीत, स्पेनमध्ये व फ्रान्सच्या दक्षिणेस लागवडीत होती. हिच्या रेषांकित, गोलसर कोनयुक्त खोडावर अनेक विरळपणे पसरलेल्या फांद्या असून उपपर्णयुक्त संयुक्त पाने ५–१० सेंमी. लांब असून त्या प्रत्येकावर ३–६ (क्वचित ७) दलांच्या जोड्या असतात. उपपर्णे तिरपी व भाल्यासारखी असतात. पिवळ्या फुलांच्या मंजऱ्या नोव्हेंबर–फेब्रुवारीत पानांच्या बगलेत येतात. शिंबा लहान, चपटी, पातळ व वाकडी असते. बिया ६–१२, पाचरीसारख्या, लहान, गर्द तपकिरी व चकचकीत असतात. इतर सामान्य लक्षणे तरवडीप्रमाणे असतात. पाने रेचक आणि सोनामुखीऐवजी वापरतात किंवा खऱ्या सोनामुखीत भेसळ करतात. भुई तरवडीच्या बिया आणि बाहव्याच्या शिंबेतील मगज दह्यात वाटून गजकर्णावर लेप देतात. इतर औषधी गुणधर्म साधारणतः सोनामुखीप्रमाणे असतात. मॉरिन ह्यांनी दले व शिंबा यांपासून ऑक्सिमिथिलअँथ्रॅक्विनोन वेगळे केले. फॅसिया ऑब्युसा व कॅ. बर्‌मॅनी ही नावे याच वनस्पतीची आहेत. भारतात या तरवडीचे २५ लक्ष क्विंटल उत्पादन होते;  त्यापैकी ९३·५%  तामिळनाडूत होते. आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्येही उत्पादन होते. भारतातून हिची परदेशात निर्यात होते.

 


पहा : कासोदा; टाकळा; लेग्युमिनोजी.

लेखक-परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate