অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तांदुळजा

तांदुळजा

तांदुळजा

(चवळाई; हिं. चवराई; गु. तांदुळजो; क. कीरेसोप्पु; सं. तंडुलीय, अल्पमारिष; इं. ॲमरँथ; लॅ. ॲमरँथस पॉलिगॅमस; कुल–अॅमरँटेसी). भारतात सर्वत्र आणि श्रीलंकेतील उष्ण देशांतील शेतांत तणासारखी व पसरट वाढणारी ही एक लहान, वर्षभर जगणारी व अनेक शाखांची ⇨ ओषधी आहे. ती पोकळा, माठ, राजगिरा यांच्या वंशातील (अॅमरँथस ) असल्यामुळे त्यांची अनेक शारीरिक लक्षणे सारखी आहेत. पाने साधी, एकाआड एक आणि गोलसर; फुले सच्छदक, लहान, हिरवट, एकलिंगी असून डिसेंबर ते मार्चमध्ये पानांच्या बगलेतील कणिशात किंवा गुच्छात येतात. परिदले तीन आणि केसरदले सुटी व तीन [→ फूल]. फळ शुष्क, बहुधा तडकणारे व करंडरूप असते. बी एक, बारीक व काळे. कोवळ्या फांद्या व पानांची भाजी करतात. रक्तपित्त, वात, ज्वर, कफ व प्रदर इत्यादींचे निवारण करणारे गुण या वनस्पतीत आहेत. तांदुळजा हेच नाव दुसऱ्या एका जातीस (ॲमरँथस ब्लायटम प्रकार ओलेरॅसिया ) दिलेले आढळते. हीच एक उंच, मांसल, सरळ वाढणारी ओषधी भारतात लागवडीत असून तिचे फळ तडकत नाही. तिची भाजी शीतक (थंडावा देणारी), दीपक (भूक वाढविणारी), वेदनाहारक व पथ्यकर असते. तिची इतर शारीरिक लक्षणे सामान्यपणे वर वर्णन केलेल्या जातीप्रमाणे आहेत.

 

पहा : अॅमरँटेसी.

लेखक- चौगुले, द. सी.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate