অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ताड

ताड

ताड

(हिं., गु. ताड; क. तालिमार, ताळेमर; सं. ताल; इं. पामिरा पाम; फॅन पाम; लॅ. बोरॅसस फ्लॅबेलिफर; कुल–पामी). हा उपयुक्त व खूप उंच (जास्तीत जास्त ३० मी., सामान्यतः १२–१८ मी.) वृक्ष नारळ, शिंदी, खजूर, सुपारी इत्यादींच्या कुलातील [⟶ पामी] असून मूलतः तो आफ्रिकेच्या उष्ण कटिबंध विभागातील आहे. त्याचा प्रसार भारतात (बंगाल, बिहार, पश्चिम व पूर्व द्वीपकल्पाच्या समुद्रकिनारी), श्रीलंकेत व ब्रह्मदेशात आहे. तो भारताच्या मैदानी प्रदेशात, उत्तर प्रदेशात, दक्षिण भारतात सहज बी पडून आलेला किंवा मुद्दाम लागवड केल्यामुळे वाढलेला आढळतो; महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी पडीत जमीनीवर त्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचे जंगल बनले आहे. रत्नागिरी, कुलाबा आणि ठाणे जिल्ह्यांत याची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे.

याच्या खोडाचा व्यास तळाशी १–१·५ मी. असतो. ते काळे, उंच व दंडगोलाकृती असून त्यावर लहानपणी वाळलेल्या पानांचे आच्छादन आणि मोठेपणी पडून गेलेल्या पानांचे वण व देठांचे खुंट असतात. खोडाला फांद्या नसतात; ते मध्यावर किंचित फुगीर असते. पाने मोठी, साधी, पंख्यासारखी (०·९–१·५ मी. रुंद व ०·४–०·८ मी. लांब), एकाआड एक उगवलेली परंतु खोडाच्या टोकावर झुबक्यात वाढलेली दिसतात, देठ ०·६–१·२४ मी. लांब असून त्याचा तळ रुंद व आवरक (वेढणारा) आणि इतर भाग अर्धशूलाकृती व कडांवर काटे असतात. पानाचे पाते चकचकीत, हस्ताकृती, थोडेफार विभागलेले असून ६०–८० खंड असतात. पानांची कळी उमलण्यापूर्वी पात्यास चुण्या पडून ते कळीत सामावलेले असते. फुलांच्या लिंगभेद प्रकाराप्रमाणे दोन प्रकारचे फुलोरे दोन स्वतंत्र झाडांवर मार्च–एप्रिलमध्ये येतात. त्यांना स्थूलकणिश [→ पुष्पबंध] म्हणतात. येथे हे कणिश मोठे व शाखित असून अनेक महाछदांनी संरक्षिलेले असते; त्यावर लहान, गुलाबी वा पिवळी व असंख्य पुं–पुष्पे असतात. त्यांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨ पामी (अथवा ताल) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात; स्त्री–पुष्पे मोठ्या, हिरव्या आणि अनेक शाखीय स्थूलकणिशावर येतात. किंजपुटात तीन कप्पे असून प्रत्येकात एक बीजक असते [→ फूल]. आठळीयुक्त फळ मोठे, सु. १५ सेंमी. व्यासाचे, गोल, गर्द भुरे व पिवळसर असून बिया १–३ असतात; प्रत्येकीस (अष्ठिका) स्वतंत्र अंतःकवच असते. पुष्क (बीजकातील गर्भाबाहेरचा अन्नांश) पांढरा, मऊ असून मध्ये पोकळी असते. फळ मेमध्ये तयार होते. कच्च्या बियांना ताडगोळे म्हणतात; यातील खाद्य भाग (पुष्क) लोक आवडीने खातात. उन्हाळ्यात त्यामुळे थंडपणा मिळतो.

नारळाप्रमाणे ताडही महत्त्वाचा व उपयुक्त वृक्ष आहे. त्यातील शर्करायुक्त रस ही मुख्य उत्पन्नाची बाब आहे. फुलोरे महाछदातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना खाचा पाडून त्याखाली बांधलेल्या मडक्यात पाझरणारा गोड रस जमा करतात. आंबवल्यावर या रसाची ताडी बनते; ती मादक पेय आहे. रसापासून गूळ व साखरही करतात. मादी–झाडापासून नर–झाडापेक्षा जवळजवळ दीडपट जास्त रसाचे उत्पादन होते. ताज्या रसाला ‘नीरा’ म्हणतात, त्यात १२ टक्के साखर असते. ताडी अनेक लोकांच्या आवडीचे उत्तेजक, स्वस्त व मादक पेय असून तीत थोडी साखर आणि ‘यीस्ट’ (किण्व) नावाची सूक्ष्म वनस्पती असते; त्यावरच ताडीचा पौष्टिकपणा अवलंबून असतो, कारण यीस्टमुळे ‘ब जटिल’ या जीवनसत्त्वांचा पुरवठा होतो; ताडी पिणाऱ्या लोकांत या जीवनसत्त्वाच्या उणीवांचे परिणाम दिसून येण्याचा संभव कमी असणे शक्य आहे. [→ नीरा].

हा रस आंबला जात असता पहिल्या ३–८ तासांत ३ टक्के एथिल अल्कोहॉल व १ टक्का अम्ले असतात; प्रक्रिया चालू ठेवल्यास ५ टक्के एथिल अल्कोहॉल बनते; त्यापेक्षा जास्त आंबल्यास ती मनुष्याला पिण्यास योग्य नसते. ताडीपासून कमी प्रतीचे व्हिनेगरही (शिर्काही) तयार करतात. ताजा रस उकळून त्यापासून गूळ बनवितात आणि त्यापासून काही गोड पदार्थ बनविता येतात. तमिळनाडूत या गुळाचे उत्पादन होते; तीही उत्पन्नाची बाब ठरते. ऊर्ध्वपातनाने बनविलेल्या ताडीच्या दारूस ‘अर्राक’म्हणतात. ग्रीक शास्त्रज्ञ हीरॉडोटस (ख्रि. पू. सु. ४२०) यांना ताडीची माहिती होती.

ताडाचे खोड भरीव, आतून फिकट तपकिरी रंगाचे व मऊ असते; त्याच्या उभ्या छेदात सुंदर रेषा दिसतात. पृष्टभाग कठीण आणि लांब धाग्यांचा बनलेला असतो. बाहेरचे कठीण लाकूड खांब, वासे, फळ्या इत्यादींकरिता वापरतात कारण ते मजबूत व टिकाऊ असते. तळभाग सुटा करून व पोखरून बादलीसारखा वापरतात. इतर सरळ भाग पोखरून त्यांचा पाणी वाहून नेण्यास पन्हळाप्रमाणे उपयोग होतो. पंखे, छपरे, चटया, छत्र्या, हॅट, होडगी, टोपल्या इत्यादींकरिता पानांचा उपयोग करतात. पूर्वी पाने लिहिण्याकरिता वापरीत. पानांच्या देठांपासून व मध्यशिरेपासून निघणाऱ्या राठ धाग्यांपासून झाडू, कुंचले, दोर, चुड्या इ. वस्तू बनविणे हा घरगुती धंदा बनला आहे. कच्च्या बियांतील मऊ गरापासून मुरंबे वगैरे बनवितात किंवा तो तसाच खातात. लहान रोपटी जमिनीतून काढून भाजीप्रमाणे खातात अथवा दळून त्यांचे पीठ करतात. बियांपासून तेल मिळते; त्या भाजूनही खातात. या झाडापासून मिळणारा डिंक काळा व चमकदार असतो.

मूळ शीतक (थंडावा देणारे) व झीज भरून काढणारे असून त्याचा रस मूत्रल (लघवी साफ करणारा), उत्तेजक, कफनाशक(कफ काढून टाकणारा) असून जलशोथात (पाणी साचून झालेल्या सूजेवर) आणि दाहक विकारात गुणकारी असतो. बियांतील गर शामक व पौष्टिक असतो. हिंदू व बौद्ध धर्मीय लोक ताडाला पूज्य मानतात.


पहा : खजूर; गूळ; पामी; शिंदी.

लेखक: देशपांडे, के. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate