অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तिरफळ

तिरफळ

तिरफळ

(त्रिफळ, चिरफळ, ठेसूळ; हिं. बद्रंग; क. जुग्मिना, जिग्मिमर; सं. तिक्ता; लॅ. झँथोझायलम ऱ्हेट्सा: कुल–रुटेसी). मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष पूर्व व पश्चिम भारतात विशेषकरून दाट सदापर्णी जंगलात आढळतो. याच्या जून सालीवरचे काटे शंकूप्रमाणे असून साल भेगाळ, त्वक्षीय (मूळ व खोडावरील मृत पेशींचा जाड व बुचासारखा थर असलेली) व मऊ असते, यामुळेच ही झाडे जंगलातील आगीपासून सुरक्षित राहतात.

फांद्या अनेक व पसरट असून त्यांच्या शेंड्याकडे अनेक एकाआड एक संयुक्त आणि पिसासारखी (समदली किंवा विषमदली) पाने झुबक्यांनी येतात; दलांच्या आठ ते वीस जोड्या असून प्रत्येक दलाचा तळ असमात्र (कोणत्याही पातळीत ज्याचे दोन सारखे भाग होत नाही असा) आणि पाते लंबगोल अथवा कुंतसम (भाल्यासारखे) व प्रकुंचित (निमुळते) असते.

फुले बहुयुतिक (एकलिंगी व द्विलिंगी), लहान, पिवळी व शाखायुक्त मंजरीवर जुलै–ऑक्टोबरात येतात [→ फूल]. फळे शुष्क, गोलसर, सुरकुतलेली, वाटाण्यासारखी, हिरवट पिवळसर असून बिया गोलसर, जांभळट काळ्या व चकचकीत असतात; इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रुटेसी अथवा सताप कुलात वर्णिल्याप्रमाणे. याचे लाकूड पिवळट असल्याने त्या अर्थाचे वंशवाचक नाव दिले आहे.

भेंड काढून टाकून पोकळ खोडाचा उपयोग पाण्याच्या नळाप्रमाणे आसामात करतात. लाकडापासून धोटे व काठ्या बनवितात. बियांना मिरीप्रमाणे चव व वास येतो; फळे व बी मसाल्यात व स्वयंपाकात वापरतात. फळांतील तेल औषधी आहे. कच्च्या फळांना संत्र्याच्या सालीसारखा वास येतो.

पक्व फळ सुगंधी, स्तंभक (आकुंचन करणारे), उत्तेजक व दीपक (भूक वाढविणारे) असून संधिवातावर मधाबरोबर देतात; मुळाची साल मूत्रपिंडाच्या विकारांवर उपयुक्त असते.

 

लेखक: ठोंबरे, म. वा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 


अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate