অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुती

तुती

(तूत, आंबट; हिं. तूत, तूल, तूत्री, चिन्नी, शहतूत; क. कोरिहण्णू, हिप्पली नरले; गु. सेतुर; सं. ब्रह्मदारू, तूत, तूल; इ. व्हाइट मलबेरी; लॅ. मोरस आल्बा; कुल–मोरेसी). खाद्य फळे व रेशीम निर्माण करणाऱ्या किड्यांना (अळ्यांना) खाद्य पाने ह्या संदर्भात ही वनस्पती (द्विदलिकित फुलझाड) सामान्यपणे सर्वत्र परिचित असून ती जंगलात आढळते व लागवडीतही आहे. हिच्या वंशातील झुडपे व लहानमोठे वृक्ष उ. गोलार्धातील समशीतोष्ण व उपोष्ण कटिबंधांत सामान्यपणे आढळतात.

भारतात चार–पाच जाती आहेत; त्या सर्वांना सामान्य इंग्रजी नाव मलबेरी असून मराठीत तुती किंवा तूत म्हणतात; खाद्य फळे ‘तुतू’ या नावाने बाजारात विकली जातात. तुतीच्या शास्त्रीय नावांबद्दल मतभेद आहेत. भारतातील मोरस आल्बा, मो. इंडिका व मो. अ‍ॅट्रोपुर्पुरिया ह्या तीन जाती (काही किरकोळ फरक वगळल्यास) सारख्याच असून मो. नायग्रामो. सेरॅटा आणि मो. लिव्हिगॅटा या जाती भिन्न आहेत, असे सर्वसाधारणपणे मानतात.

यांखेरीज मो. मल्टिकॉलिस व मो. लॅटिफोलिया या दोन जाती चीन व जपान येथून रेशमाच्या किड्यांच्या खाद्याकरिताच म्हणून भारतात आणून लावल्या आहेत; तथापि त्याही मो. आल्बाचे प्रकार असावेत, असे कित्येक शास्त्रज्ञांचे मत आहे. रेशमाचे उत्पादन करणाऱ्या अनेक देशांत हवामान, जमीन, रोगराई, रेशमाच्या किड्यांची आवड व कलमे बनविणे या दृष्टिंनी अनुकूलित झालेले असे तुतीचे असंख्य प्रकार ओळखले जातात. जपानसारख्या रेशीम–व्यापार उद्योगात पुढारलेल्या देशात तुतीचे सु. सातशे वाण असून सु. २१ वाणांची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्यांतील काही वाण थंड तर काही अतिथंड हवामानासाठी सोयीस्कर असून काही मध्यम प्रकाराच्या हवामानात चांगले वाढणारे आहेत; तसेच काही वाणांना लवकर फुले येतात, तर काहींना उशिरा येतात आणि काही मध्यम प्रकारचे आहेत.

भारतात रेशमाच्या किड्यांच्या खाद्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा मो. आल्बाच्या मल्टिकॉलिस प्रकाराची लागवड विशेषकरून आढळते; खाद्य फळांच्या दृष्टीने अ‍ॅट्रोपुर्पुरिया प्रकारची लागवड बरीच आहे. या दोन्ही प्रकारांत पाने मोठी व जाडसर असून झाडे जलद वाढणारी असतात. मल्टिकॉलिस प्रकार मूळचा चीन व फिलिपीन्समधील असून अ‍ॅट्रोपुर्पुरिया प्रकार मूळचा फक्त चीनमधलाच आहे. भारतात कर्नाटक, प. बंगाल, जम्मू व काश्मीर येथे मोठ्या प्रमाणावर पानांकरिता तुतीची लागवड केलेली असून त्यांशिवाय थोड्याफार प्रमाणात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, आसाम, मणिपूर आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथेही लागवड केलेली आढळते. शेतात कुंपणाच्या कडेने किंवा प्रमुख पीक म्हणून लावतात. स्थानिक परिस्थितीनुरूप नवीन संकरज प्रकार मिळवून त्यांची विशेष लागवड काही ठिकाणी केली आहे.

तुती (मोरस इंडिका) : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) पुं-पुष्प, (३) स्त्री-पुष्पाचा छेद, (४) स्त्री-पुष्पांचा फुलोरा, (५) संयुक्त फळ; (६) संयुक्त फळ (मोरस आल्बा).तुतीचा वृक्ष (मो. आल्बा) वर म्हटल्याप्रमाणे मूळचा चीनमधला असून भारतातील मैदानी प्रदेशात व हिमालयात सु. ३,३०० मी. उंचीपर्यंत लागवडीत आहे; शिवाय रस्त्यांच्या दुतर्फा आण इतरत्र मोकळ्या व सुरक्षित जागी लावतात. तुतीचा उल्लेख मदनपाल यांनी रचिलेल्या भारतीय निघंटू ग्रंथात (औषधी वनस्पतींच्या कोशात) फलवर्गात केलेला आढळतो; ती भारतीय जाती (मो. इंडिका) असावी. उपहिमालयात १,५५० मी. उंचीपर्यंत जंगली अवस्थेत सतलजपासून पूर्वेस तिचा प्रसार असल्याचा उल्लेख आहे. तुतीचा वृक्ष मध्यम आकारमानाचा, पानझडी व सु. ३–५ मी. उंच असून त्याच्या खोडाचा घेर १·८ मी. असतो; त्याची साल गर्द करडी तपकिरी, खरबरीत व भेगाळ असते. पाने साधी, विविध, अंडाकृती, दातेरी, कधीकधी काहीशी विभागलेली (खंडित) व एकाआड एक असतात.

फुले लहान, एकलिंगी, एका किंवा दोन स्वतंत्र झाडांवर व हिरवट असून प्रत्येक फुलात चार परिदले असतात.

पुं–फुलोरा लोंबता कणिश (नतकणिश) प्रकारचा, काहीसा रुंदट, दंडाकृती किंवा अंडाकृती; स्त्री–फुलोरा लांबट गोलाकार असून त्यापासून बनणारे संयुक्त फळ (फलपुंज) अनेक लहान आठळी फळांचे (अश्मगर्भी फळांचे) बनलेले असते; त्या प्रत्येकावर मांसल परिदले असतात. पुं–पुष्पात चार केसरदले, स्त्री–पुष्पात दोन किंजदले आणि ऊर्धस्थ किंजपुटात एक बीजक असते [→ फूल]. फळांचा रंग पांढरा, लालसर, जांभळा वा काळा असतो व संयुक्त फळ ५ सेंमी. पर्यंत लांब असते. फळे आंबटगोड व खाद्य असतात. साधारणपणे ती उन्हाळ्याच्या मध्यानंतर व पावसाळ्याच्या सुरुवातीस पक्व होतात. ह्या वनस्पतीची इतर लक्षणे वट कुलात [→ मोरेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. निसर्गतः पक्षी, कोल्हे आणि माणसे तुतीच्या बीजाच्या प्रसारास कारणीभूत होतात. बिया व फांद्यांची कलमे अभिवृद्धीस (संवर्धनासाठी) वापरतात. गर्दी करून अनेक झाडे वाढविल्यास प्रत्येकाचा सोट (फांद्या फार कमी असलेले सरळ खोड) बराच उंच वाढतो.

उपयोग : पाने : रेशीमनिर्मिती करणाऱ्या बाँबिक्स मोरी नावाच्या किड्यांना (त्यांच्या अळ्यांना किंवा डिंभांना) पोसण्याकरिता फार मोठ्या प्रमाणावर पूर्णपणे वाढलेली पाने खाऊ घालतात. जनावरांना त्यांचा चारा घालतात; रोज सकाळी व संध्याकाळी मिळून सहा किग्रॅ. तुतीची पाने गायींना व म्हशींना दिल्याने त्यांचे दूध वाढते, असा अनुभव आहे. पानांत प्रथिन १६–३९%, विरघळणारी शर्करा ७·६–२६%, राख ८–१७%, कॅल्शियम ०·७–२·७% आणि लोह ०·०५–०·१२% असतात.

फळे : पिकलेली ताजी फळे तशीच खातात किंवा त्यांचे सरबत करतात; तसेच स्ट्यू व टार्ट नावांचे खाद्यपदार्थ बनवितात, रसावर किण्वनाची (आंबविण्याची) प्रक्रिया करून मद्येही बनवितात. सुकविलेल्या फळांचे पीठ करून त्याचा पाव करतात. पक्व फळे मोठ्या प्रमाणावर विकली जातात व ती आवडीने खाल्ली जातात. फळात शेकडा जलांश ८७·५, प्रथिन १·५, मेद (स्निग्ध पदार्थ) ०·४, कार्बोहायड्रेट ८·३, धागे १·४ व खनिजे ०·९ असतात; दर १०० ग्रॅ. ला कॅल्शियम ८० मिग्रॅ., फॉस्फरस ४० मिग्रॅ, व लोह १·९ मिग्रॅ. असतात. यांशिवाय कॅरोटीन, थायामीन, निकोटिनिक अम्ल, रिबोफ्लाविन, अ‍ॅस्कॉर्बिक अम्ल इ. असतात. बियांत २५–३५% सुकणारे पिवळट तेल असते.

लाकूड

तन्यता व नम्यता (ताणले जाणे व लवचिकपणा) या गुणांमुळे तुतीचे लाकूड क्रीडासाधने बनविण्यासाठी फार उपयुक्त असते; मध्यकाष्ठ; [→ मध्यकाष्ठ] पिवळट किंवा सोनेरी तपकिरी आणि रसकाष्ठ (बाहेरचे) पांढरे किंवा सायीच्या रंगाचे असते; ते मध्यम कठीण व जड असते; उघड्या जागी फारसे टिकाऊ नसते. सुतारकामास ते चांगले असते. हॉकीच्या काठ्या, टेनिस व बॅडमिंग्टन रॅकेट्स, क्रिकेट बॅट्स व स्टंप्स, घरबांधणी, शेतीची अवजारे, सजावटी सामान, हत्यारांचे दांडे, सूतकांड्या (बॉबिन) इ. विविध वस्तूंकरिता फार उपयुक्त असते; गाड्यांच्या विविध भागांकरिता ते वापरतात. त्यात सु. ३२% टॅनीन असल्याने कातडी कमविण्यास व रंगविण्यास सोयीचे असते. झाडांच्या सालीत धागा भरपूर असल्याने चीन व यूरोपीय देशांत कागदाकरिता ती वापरतात. साल कुजवून अलग केलेला धागा पांढरा, नरम व स्पर्शाला रेशमाशी तुल्य असल्याने कापड उद्योगात उपयुक्त असतो; धाग्यांच्या दोऱ्या व टोपल्या बनवितात.

औषधी व इतर

पाने स्वेदकारी (घाम आणणारी) व वेदनाहारक असून घशातील दाह (आग) कमी करण्यास पानांचा काढा गुळण्या करण्यास वापरतात. फळे रुचकर, मधुर, सारक व शीतक (थंडावा देणारी) असून घसा धरल्यास, अग्निमांद्य (भूक मंद झाल्यास) व खिन्नताविकार यांवर गुणकारी असतात; तापात तहान भागविण्यास फळे खाण्यास देतात; मुळे स्तंभक (आकुंचन करणारी) व कृमिनाशक असतात; सालही कृमि–उत्सर्जक व रेचक असते.

काही जाती व प्रकार फक्त फळांकरिता व काही लाकडाकरिता विशेषकरून लागवडीत आहेत.

मोरस लिव्हिगॅटा

ही तुतीची जाती हिमालयात कुमाऊँ ते पूर्वेस आसामपर्यंत १,५०० मी. उंचीवर आणि अंदमानात आढळते. हे सु. ३० मी. उंचीचे वृक्ष असून त्यांचा घेर ४·५ मी. असतो; पूर्व हिमालयातील वृक्षांपेक्षा प. हिमालयातील वृक्ष बरेच लहान असतात. यांना १०–१२ सेंमी. लांब फुलोरे येतात आणि लांब दंडगोलाकृती, पिवळट व गोड किंवा पाणचट फळे येतात. याचे लाकूड मो. आल्बापेक्षा अधिक बळकट व टिकाऊ असल्याने विविध प्रकारे उपयोगात आणले जाते.

मोरस नायग्रा

(इं. ब्लॅक मलबेरी). ह्या जातीतील वृक्ष सु. ६–९ मी. उंच असून मूळचा तो प. आशियातील आहे व फळांकरिता इतरत्र विशेषकरून लावला जातो. संयुक्त फळे २–२·५ सेंमी. लांब, आयत, जांभळी किंवा काळी, रसाळ गोड व खाद्य असतात. काश्मीर व दार्जिलींग येथे विशेष लागवडीत असून फळांचे मुरंबे, जेली व सरबत बनवितात; यूरोपात त्यांचे मद्य बनवितात. रेशमाच्या किड्यांच्या खाद्याच्या दृष्टीने या जातीची पाने कमी प्रतीची असतात.

मोरस सेरॅटा

(इं. हिमालयन मलबेरी) हा वृक्ष सु. १८–२१ मी. उंच असून हिमालयाच्या आतील रांगांत सु. १,२००–२७०० मी. उंचीच्या प्रदेशात आढळतो. त्याची फळे लांब, जांभळी, गोड व खाद्य असतात. ही झाडे सावलीकरिता लावतात. यांचे लाकूड जड, कठीण व चिवट असते आणि ते कापीव व कातीव वस्तूंकरिता वापरतात; यापासून शेतीची अवजारे, बंदुकी, खेळणी इ. वस्तू करतात. रेशमाच्या किड्यांना व जनावरांना पाने खाऊ घालतात.

मोरस ऑस्ट्रॅलिस

(मो. अ‍ॅसिडोजा; इं. कॉमन मलबेरी). हा एक लहान पानझडी वृक्ष (अथवा झुडूप) असून तो आसाम आणि खासी टेकड्यांत आढळतो. इतरत्र रेशमाच्या किड्यांना पाने खाऊ घालण्याकरिता लागवडीत आहे; फळे लहान, काळी व खाद्य आहेत. यालाचमो. इंडिका असे नाव दिलेले आढळते.

लेखक: ज्ञानसागर, वि .रा. मुजुमदार, शां. ब. परांडेकर, शं. आ.

लागवड

तुतीची लागवड ही रेशीम उद्योगधंद्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कर्नाटकात आणि प. बंगालमध्ये तुती शेतपीक म्हणून घेतात आणि अनेकदा वीण करणाऱ्या रेशमाच्या किड्यांना चारण्याकरिता वर्षातून पुष्कळ वेळा पाने काढतात. जम्मू व काश्मीरमध्ये तुतीची मोठाली झाडे वाढवितात आणि एकदाच वीण करणाऱ्या रेशमाच्या किड्यांना चारण्याकरिता हंगामात एकदाच पाने काढतात. ठेंगणी कलमी झाडे अथवा उंच झुडपे लावण्याची पद्धत अलीकडेच प. बंगालमध्ये सुरू केली आहे.

भारतातील तुतीचे क्षेत्र व झाडांची संख्या (१९७०)

राज्य

कोरड वाहू

बागायत

एकूण

झाडांची संख्या

 

(हेक्टर)

(हेक्टर)

(हेक्टर)

(हजारात)

आंध्र प्रदेश

१८९

५३९

७२८

आसाम

७५०

७५०

६००

उत्तर प्रदेश

९३

१४५

२३८

१४९

कर्नाटक

७०,४७५

१७,४०३

८१,८७८

२२

जम्मू व काश्मीर

२,६२५

तमिळनाडू

२,४४५

६२

२,५०७

त्रिपुरा

पंजाब व हरियाणा

३८

३४

७२

९०

प. बंगाल

५,११२

१९०

५,३०२

३६२

बिहार

१००

१०

११०

मणिपूर

२००

१६०

३६०

१०७

मध्य प्रदेश

२२५

७५

३००

हिमाचल प्रदेश

१४७

१९

१६६

९५

एकूण

७९,६३०

१८,६१८

९८,२४८

३,९५९

जमीन व हवामान

रेताड, भारी दुमट आणि कापसाच्या काळ्या जमिनीत तुती चांगली जोमाने वाढते. त्याचप्रमाणे तिला वर्षभर सारखा विभागलेला १५० ते २५० सेंमी. पाऊस लागतो. झाडाभोवती साचलेले पाणी अथवा सावली तुतीला मानवत नाही.

मशागत

पावसाळा संपल्यावर जमीन ३० ते ४५ सेंमी. खोल नांगरून कुळवून भुसभुशीत करतात. नांगरताना हेक्टरी २० ते ३० टन शेणखत मिसळतात. पाणभरत्या पिकाला हेक्टरी ३०० किग्रॅ. भुईमुगाची पेंड आणि १४० किग्रॅ. अमोनियम सल्फेट देतात.

अभिवृद्धी

तुतीची अभिवृद्धी बी, छाट अगर फाटे कलमे यांनी करतात. बियांकरिता मुद्दाम लावलेल्या झाडांचे बी गोळा करून लगेच एक महिन्याच्या आत रोपे करण्याकरिता व रोपावरील रोग टाळण्याकरिता कापराच्या पाण्यात भिजवून पेरतात. बी अतिशय बारीक (एक ग्रॅ. वजनात ४२५ ते ४६०) असल्याने माती व राख यांनी काळजीपूर्वक झाकतात. वेळोवेळी पाणी देऊन वाफे ओले ठेवतात. ९ ते १४ दिवसांनी बी उगवू लागते. रोपे ७–८ सेंमी. उंच वाढल्यावर विरळणी करून तण काढतात. १० ते १५ सेंमी. उंचीची रोपे झुडपी पिकाकरिता आणि १·२२ मी. उंचीची वृक्षाकरिता शेतात लावण्यास पसंत करतात.

कर्नाटकमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर जुलैमध्ये ३० सेंमी. व्यासाच्या आणि २२ सेमी. खोलीच्या खड्ड्यात तुतीच्या फांद्यांच्या छाटाचे तीन डोळे असलेले २०–२२ सेंमी. लांबीचे तुकडे लावतात; ओळींत ७५ सेंमी. अंतर ठेवतात.

पं. बंगालमध्ये एक मी. हमचौरस अंतराने प्रत्येक ठिकाणी ९ ते १६ छाट तुकड्यांचा जुडगा कोरड्या भागात चांगल्या तयार केलेल्या जमिनीत तिरपा ठेवून पूर्णपणे गाडतात; ओलसर क्षेत्रात जुडग्याचा काही भाग जमिनीच्या वर ठेवून गाडतात आणि पावसाळ्यात केव्हाही लागण करतात.

छाट कलमांना लवकरच मुळ्या फुटू लागतात आणि नियमित मशागत व पाणी देत राहिल्याने ६ आठवड्यांत अंकुर ७५ सेंमी. पर्यंत उंच वाढतात. कोरडवाहू पीक एक ते दीड मी. उंच वाढल्यावर पाणी देण्याचे बंद करतात आणि पाणभरत्या पिकाला आठवड्यातून दोन वेळा पाणी देतात. पिकाची नियमित निंदणी व कोळपणी करतात.

रोपांपासून तुतीची झाडे तयार करणे खर्चाचे असते; परंतु त्यांपासून झुडपी पिकापेक्षा जास्त व दर्जेदार पानांचे उत्पादन होते.

छाटणी व पानखुडणी

तुतीचे कमीअधिक उंच झुडूप किंवा वृक्ष वगैरेंचे जरी पीक असले, तरी पाने तोडणीशिवाय त्यांना नियमित छाटणीचीही गरज असते. पाणभरते पीक १० आठवड्यांनी एक ते सव्वा मी. उंच वाढल्यावर पाने तोडणीला येतात. कोरडवाहू पिकाच्या पानांची खुडणी लागवडीनंतर १२ ते १७ आठवड्यांनी करतात. थोड्या थोड्या वेळानंतर प्रत्यक्ष झाडावरून वा काढलेल्या फांद्यांवरून पाने खुडतात. कर्नाटकमध्ये वर्षातून एकदा जमिनीसपाट झाडांची छाटणी करतात. पाणभरत्या पिकापासून साधारण १० व कोरडवाहू पिकापासून ६ ते ७ खुडण्या मिळतात. जम्मू व काश्मीरमध्ये हंगामात एकदाच झाडावरील पाने खुडतात

संध्याकाळ ही पाने खुडण्याची उत्तम वेळ असते. काढलेली पाने गरम होणार नाहीत, आंबणार नाहीत अगर वाळणार नाहीत अशा रीतीने थंड खोलीत लहान लहान विस्कळित ढिगारे करून ठेवतात. खोलीत ओले कापड किंवा पोती टांगून ठेवतात.

साधारण १५ वर्षांपर्यंत तुतीचे चांगले उत्पादन मिळते. त्यानंतर झाडे काढून टाकून त्या ठिकाणी नवीन लागण करतात.

उत्पादन

कर्नाटकमध्ये स्थानिक जिराईत तुतीचे हेक्टरी ४,४८५ ते ७,८५० किग्रॅ. व बागाईत पिकाचे ११,२१५ ते १४,७०० किग्रॅ. उत्पादन होते. प. बंगालमध्ये हेक्टरी ११,२१५ व सुधारलेल्या वाणाच्या बागायती पिकापासून २१,३०० ते २४,६७० किग्रॅ. उत्पादन मिळते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ गुरेघर आणि वाई येथे संशोधन व प्रदर्शनाकरिता तुतीचे मळे लावले आहेत.

रोग

भुरी : या कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे होणाऱ्या) रोगाने पानाच्या खालील भागावर कवकाचा पांढरा थर दिसतो. त्यामुळे पाने विरूप व लहान होतात आणि पिंगट होऊन वाळू लागतात. हेक्टरी २० किग्रॅ. गंधक पिस्कारल्याने रोग आटोक्यात येतो.

पानावरील ठिपके

कोवळ्या पानांवर तांबूस व मध्यभागी पिंगट ठिपके पडतात. पाने पूर्ण वाढ होण्यापूर्वीच गळून पडतात. यावर बोर्डो मिश्रण फवारतात.

याशिवाय कॉरीनियममोरी या कवक रोगाने पानांचे उत्पन्न फारच घटते. फांद्या छाटल्याने, मोडल्याने किंवा थंडीच्या कडाक्याने झालेल्या जखमेतून रोगाचा प्रवेश होतो. सर्व रोगट भाग कापून टाकून कापलेल्या भागावर रोग बीजनाशके लावतात.

पॉलिपोरस हिस्पिडस या कवकामुळे तुतीचे खोड व मोठ्या फांद्या सडून वाळून जातात. रोगट भाग कापून टाकल्याने रोग आटोक्यात येतो. केवडा आणि शिरा पिवळ्या होणे हे व्हायरसजन्य रोग आढळतात. प्रतिकारक जातींची लागवड किंवा निरोगी झाडांचे छाट अभिवृद्धीकरिता वापरणे चांगले.

कीड

फेनोकॉकस हर्सुटस : हा किडा फांदी, पाने व पानांचे देठ यांचा रस शोषून घेतो. त्यामुळे पाने वाळतात आणि मुरडतात. निकोटीन सल्फेट फवारल्याने ही कीड मरते.

लाँगीकॉर्न :हे भुंगेरे जमिनीपासून थोडे वर खोड पोखरून भोक पाडतात. त्यामुळे फांद्या वाळतात. यावर उपाय भुंगेरे पकडून नष्ट करणे व दूषित फांद्या तोडून टाकणे, हा होय.

खवले कीड : ही कीड झाडातील रस शोषून घेते, त्यामुळे झाडे वाळतात. त्यावर उपाय म्हणून साबण किंवा राळमिश्रित संयुगे यांचा फवारा मारतात [→ खवले किडे].

खोडकिडा

खोड पोखरून भोक पाडल्याने फांद्या वाळतात. पाडलेल्या भोकात रॉकेल किंवा कार्बन बायसल्फाइड घातल्याने कीड मरते [→ खोडकिडा]. लेखक: चौधरी, रा. मो.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The wealth of India, Raw Materials, Vol, VI, New Delhi, 1962.

2. Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Medicinal Plants, New Delhi, 1975.

3. Mitra, J. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate