অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुपकडी

तुपकडी

तुपकडी

(काटेरी तुकटी, कुतरी, खरेती; हिं. व म. जंगली मेथी; हिं. गुलसकरीस; गु. कंटाळो बळ; क. कल्लंगड्‍ॅले; सं. नागबला; इं. प्रिकली सिडा; लॅ. सिडा स्पायनोजा; कुल–माल्व्हेसी). एक केसाळ वर्षायू (वर्षभर जगणारे) शाखायुक्त झुडूप. हे भारतात सर्वत्र तणाप्रमाणे रूक्ष जागी उगवते आणि उष्ण व उपोष्ण कटिबंधांत सामान्यपणे आढळते. ⇨ चिकणा व तुपकडी एकाच वंशातील असल्याने त्यांची अनेक लक्षणे सारखी आहेत. तुपकडीची सामान्य शारीरिक लक्षणे भेंडी कुलात [→ माल्व्हेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. याची पाने साधी, एकाआड एक, लंबगोलाकृती, पाच सेंमी. लांब, स्थूलदंतुर (बोथट दाते असलेली) व तळाशी गोलसर असून देठांच्या खाली, तळाशी लहान दोन–तीन वाकडे काटे व खालचा पृष्ठभाग करडा असतो. याला ऑक्टोबर ते नोव्हेंबरात पानांच्या बगलेत पांढरी किंवा फिकट पिवळी व लहान फुले एकेकटी किंवा झुबक्यांनी येतात. पुष्पमुकुट संवर्तापेक्षा किंचित मोठा असून पाच किंजदलांपासून बनलेल्या पालिभेदी, केसाळ टोकाच्या शुष्क फळात गुळगुळीत, काळसर पिंगट बिया असतात [→ फूल; फळ]. फळाच्या प्रत्येक भागास (फलांशाला) दोन प्रशुके (लांबट राठ टोके) असतात.

या झुडपाची मुळे, पाने व मुळांची साल शामक (शांत करणारी), शीतक (थंडावा आणणारी) असून मूत्रमार्गदाह (मूत्रमार्गाची आग) व प्रमेह (परमा) यांवर गुणकारी असतात. मुळे पौष्टिक व स्वेदकारी (घाम आणणारी) असून दुर्बलता व ज्वर यांवर त्यांचा काढा देतात. पाने पाण्यात कुस्करून तो रस गाळून औषधाकरिता वापरतात किंवा पाने शिजवून खातात. फळे स्तंभक (आकुंचन करणारी) व शीतकर असतात. खोडापासून चांगला धागा मिळतो. गुलसकरी ह्या हिंदी नावाने या वनस्पतीचे वर्णन आयुर्वेदीय ग्रंथांत आढळते व तुपकडी हेच नाव चिकणा ह्या दुसऱ्या जातीला वापरलेले आढळते. आधुनिक इंग्रजी व शास्त्रीय ग्रंथांत ही दोन्ही नावे एकाच वनस्पतीला (सिडा कार्पिनिफोलिया ) लावलेली आढळतात.

 

लेखकल: जोशी, गो. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate