অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तोरण

तोरण

तोरण

(हिं. चुरन, धौरा; क. महिगोट्टे; सं. तोदन; लॅ. झिझिफस रुगोजा; कुल-ऱ्हॅम्नेसी). ⇨बोराच्या वंशातील पण आधारावर चढत जाणारे हे काटेरी झुडूप श्रीलंकेत आणि भारतात बहुतेक सर्वत्र व विशेषतः डोंगराळ भागात आढळते. सामान्य शारीरिक लक्षणे बदरी [⟶ ऱ्हॅम्नेसी] कुलात वर्णिल्याप्रमाणे. पाने साधी व मध्यम आकारमानाची, पाच ते आठ सेंमी. लांब, साधारण दातेरी व लंबगोल असून वरचा पृष्ठभाग गुळगुळीत परंतु खालचा लवदार असतो. काटे (उपपर्णे) आखूड, वाकडे व एकेकटे असतात. परिमंजऱ्या लांब, शाखित व काटेरी असून फुलांना पाकळ्या नसतात; ती हिरवट लहान असून बिंब पंच–खंडी व किंजपुटात दोन कप्पे असतात [⟶ फूल]. एप्रिल ते मे मध्ये लहान, वाटोळी, पांढरी पिवळट, खाद्य, अश्वगर्भी (आठळीयुक्त) फळे येतात; ती गिरिजनांना विशेष आवडतात. बी कठीण व एकच असते. ⇨ नागवेलीच्या (पानवेलीच्या पानांचे देठ व तितकीच तोरणाची फुले व निम्मा चुना यांपासून केलेल्या सु. ०·२५ ग्रॅमच्या गोळ्या दिवसातून दोन वेळा घेतल्यास मासिक अतिस्रावावर गुणकारी असल्याचे आढळले आहे. तोरणाचा पाला बारीक कुटून त्याचा पाण्यात केलेला काढा चट्टे व जखमा धुण्यास वापरतात.

 

 

लेखक: जोशी, रा. ना.

स्त्रोत:मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate