অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

त्रिपंखी

त्रिपंखी

त्रिपंखी

(सं. त्रिपक्षी; हिं. त्रिपुंखी; इ. ट्रेलिंग कोल्डेनिया; लॅ. कोल्डेनिया प्रोकम्बेन्स; कुल–बोरॅजिनेसी). ओलसर जमिनीवर पसरून वाढणारी ही अनेक फांद्यांची व एक वर्षभर जगणारी ⇨ओषधी भारतात सर्वत्र, श्रीलंका व इतर अनेक उष्ण देशांत तणासारखी आढळते. कोवळे खोड व फांद्या लवदार असून पांढरट दिसतात. हीची पाने लहान (१·३–३·८ X ०·६ सेंमी.), एकाआड एक, तळाशी निमुळती असून पानांची किनार (कडा) काहीशी विभागलेली, बोथट दात्यांची व टोकास गोलसर असते;त्यांच्या दोन्ही बाजूंस दाट पांढरट लव असते. हिला सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये लहान, पांढरी किंवा फिकट पिवळी फार लहान देठांची फुले पानांच्या बगलेत एकेकटी येतात. संदले जुळलेली; प्रदले व केसरदले प्रत्येकी चार असून किंजपुट किंचित चतुष्खंडी (चार भागी) व त्यात चार बीजके असतात [⟶ फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) पण शुष्क फळ फार लहान (३ X ४ मिमी.) असून त्यावर दोन फुगीर रेषा व दोन खोलगट रेषा असतात; ते तडकल्यावर चार शकले होतात; बिया चार असतात.

इतर सामान्य शारीरिक लक्षणे भोकर कुलात [⟶ बोरॅजिनेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. ताजी पाने वाटून संधिवातातील सुजेवर लावतात. फोड व गळवे पिकण्यासाठी मेथीचे चूर्ण गरम करून या सुक्या वनस्पतीसह समभाग लावतात. या वनस्पतीचा अंतर्भाव एहरेशिएसी या कुलात काही वनस्पतीवैज्ञानिक (सांतापाव) करतात; तिच्या वंशातील २०–२४ जातींपैकी भारतात ही एकच आढळते.

 

लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत:मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate