অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

थोर

थोर

थोर : (हिं. शकर पितन, सुली; लॅ. यूफोर्बिया रॉयलियाना; कुल–यूफोर्बिएसी). सु. ५ मी. उंचीचे काटेरी शाखायुक्त झुडूप किंवा लहान वृक्ष. याचा प्रसार हिमालयात सु. १,८६० मी. उंचूपर्यंत, सिंधू नदी ते कुमाऊँ या प्रदेशात आहे. उपहिमालयी पट्ट्यात व लगतच्या सखल भागात सामान्यपणे याची कुंपणासाठी लागवड करतात. फांद्या त्रिधारी निवडुंगाप्रमाणे,पण ५–७ कोनी, ५ सेंमी. व्यासाच्या मंडलित व काटेरी असतात. पाने एकाआड एक, बिनदेठाची (१०–१५ सेंमी. लांब), सपाट व चमच्यासारखी, मांसल, जाड व लवकर गळणारी; त्यांच्या तळाशी दोन काटे (उपपर्णे) असतात. फुलोरा तीन पुष्पांची वल्लरी; छदमंडले (१·५ सेंमी.) पिवळी [फूल]; १·५ सेंमी. व्यासाची बोंडे करडी व त्रिखंडी असून त्यांचे भाग (कुड्या) दबलेले असतात. इतर सामान्य लक्षणे एरंड कुलात [यूफोर्बिएसी] वर्णिल्याप्रमाणे. ह्या वनस्पतीच्या ताज्या चिकाला खूप गोड वास येतो; तो चीक कडू, विरेचक व कृमिनाशक आहे. त्याने कातडीवर फोड येतात व डोळ्यांत गेल्यास इजा होते. दुधी चिकात काउछुक (एक प्रकारचे रबर) १–५·४% आणि पाणी व त्यात विरघळणारे पदार्थ ६४·१–८०·५% असतात. ही वनस्पती मत्स्यविष आहे. अभिवृद्धी (संवर्धन) फांद्यांचे तुकडे लावून करतात.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate