অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

थौका

थौका

थौका

(ब्रम्ही नाव–थक्का; इं. फ्लेम अम्हर्स्टिया, स्प्लेंडिड अ‍ॅम्हर्स्टिया; लॅ. अ‍ॅम्हर्स्टिया नोबिलीस; कुल–लेग्युमिनोजी; उपकुल–सीसॅल्पिनिऑइडी). सु. ९–१५ मी. पर्यंत उंच वाढणारा हा अतिशय सुंदर वृक्ष मूळचा तेनासरीम (द. ब्रह्मदेश) येथील असून जंगली अवस्थेत मोजक्या वेळीच आढळलेला आहे. ब्रह्मदेश, द. भारत, बंगाल, श्रीलंका व उष्ण कटिबंधातील इतर अनेक प्रदेशांत रस्स्यात्या दुतर्फा व लहानमोठ्या बागांतून शोभेकरिता आणि सावलीकरिता लावलेला आढळतो. भारतीय वनस्पतिविज्ञानाच्या प्रगतीसाठी झटलेल्या कौंटेस अ‍ॅम्हर्स्ट व त्यांची कन्या लेडी अ‍ॅम्हर्स्ट यांच्या नावे हा ओळखला जातो. तो भारतीय लाल अशोकाच्या [⟶ अशोक–१] उपकुलातील (लेग्युमिनोजी अथवा शिंबावंत कुल) असल्याने शारीरिक लक्षणांत दोन्हींत साम्य आढळते [⟶ लेग्युमिनोजी]. याला ‘ब्रह्मकुमारी’ असे अलीकडे म्हटलेले आढळते. त्याची साल राखी करडी व पाने एकांतरित (एकाआड एक), संयुक्त, मोठी, पिच्छाकृती (पिसासारखी), सोपपर्ण (उपपर्णयुक्त) व दले १२–१६ (समदली), कोवळेपणी पिंगट, निळसर, लाबंट भाल्यासारखी, टोकदार व मऊ सून सैलपणे खाली लोंबतात (उदा., आंबा, माधवलता इ.); जून पाने वरच्या बाजूस गर्दं हिरवी आणि खालच्या बाजूस फिकट व लवदार असतात.

पानांच्या बगलेतून लाल पिवळसर फुलांच्या सु. ०·९ मी. लांब व लोंबत्या मंजऱ्या कोरड्या ऋतूत विशेषतः जानेवारी ते मार्चमध्ये येतात; त्या वेळी हा वृक्ष फारच सुंदर दिसतो व त्यामुळे सर्वच वनश्री मनोहर दिसते; प्रत्येक मंजरीवर २०–२५ फुले येतात. त्यांचे देठ व देठाच्या मध्यावर असलेली छदकांची जोडी लालबुंद असते; संवर्त खाली नलिकाकृती व वर चार लालसर पसरट संदलांचा असून पुष्पमुकुटात पाच पाकळ्या असतात; त्यांपैकी तीन मोठ्या व दोन फार बारीक असतात. मोठ्या तिन्हींपैकी मधली सर्वांत जास्त मोठी व लाल असून तीवर पांढरा शिडकावा व टोकास पिवळा ठिपका असतो;

बाजूच्या दोन लहानसर पाकळ्या साधारण तशाच असून अरूंद, तळाशी निमुळत्या, टोकास पसरट व पिवळ्या असतात. दहा केसरदलांपैकी नऊ खाली एकत्र जुळलेली व दहावे सुटे; परागकोश हिरवे; किंजपुट ऊर्ध्वस्थ, चपटा व किंजल केसरदलाइतका लांब असतो [⟶ फूल]. शिंबा (शेंग) सपाट, १०–१८ सेंमी. लांब, २·५–४ सेंमी. रूंद व गर्दं पिंगट परंतु फुलांच्या मानाने त्यांची संख्या फार कमी असते; बिया पिंगट चपट्या व एक ते तीन असतात.

ह्या वृक्षाची लागवड काहींशी कठीण असते कारण साधारणतः फलनक्षम बियांची कमतरता; जास्तीत जास्त अभिवृद्धी (संवर्धन) उन्हाळ्यात दाबाची किंवा गुटीची कलमे करून ती पावसाळ्यात लागण केल्याने होते. कडक ऊन व जोरदार वारा यांपासून सदैव संरक्षण करावे लागते. खोल, निचऱ्याची, सकस जमीन व दमट समशीतोष्ण हवामान असल्यास वाढ चांगली होते. (चित्रपत्र ४८).

 

 

संदर्भ : Blatter, E.; Milliard, W. S. Some Beautiful Indian Trees, Bombay, 1954.

लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate