অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दशमुळी

दशमुळी

दशमुळी

(हिं. गुलशमलॅ. एरँथीमम रोझियम, डीडॅलॅकँथस रोझियस कुल–ॲकँथेसी). या ओषधीय [ओषधि]वनस्पतीच्या वंशातील इतर सर्व जाती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ओषधी किंवा क्षुपे (झुडपे) असून आशियातील उष्ण व उपोष्ण प्रदेशात त्यांचा प्रसार आहे. ए. बायकलर ही जाती बागेत आकर्षक पाने व फुले यांकरिता लावतात हिची फुले पांढरी असून खालच्या पाकळीवर जांभळे ठिपके असतात. दशमुळी सु. २ मी. उंच वाढते व भारताच्या दक्षिण द्वीपकल्पाच्या पश्चिम आणि दक्षिण (कोकण, दख्खन, उत्तर व दक्षिण कारवार इ.) भागांत आढळते. हिची पाने साधी, मोठी, समोरासमोर, दातेरी व आयत–कुंतसम (भाल्यासारखी) असून त्यांच्या बगलेतून आलेल्या किंवा अग्रस्थ (टोकावरच्या) व लांबट कणिशावर प्रथम निळी अगर गुलाबी व नंतर जांभळी किंवा लाल, सच्छद (पानासारखी किंवा खवल्यासारखी फुलाच्या तळाशी असलेली उपांगे असणारी) व तीव्र दर्पाची फुले नोव्हेंबर ते जानेवारीस येतात. सामान्य शारीरिक लक्षणे अ‍ॅकँथेसी कुलात (वासक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

छदे पांढरी, केसाळ व त्यांवर हिरव्या शिरा असतात. पुष्पमुकुट खाली लांब नळीसारखा व वर पसरट असून पाच पाकळ्या असतात केसरदले दोन[फूल];फळे (बोंडे) लहान, गदेसारखी लांबट (१·३ सेंमी.) व टोकदार असून बिया (३–४ मिमी.) चार व केसाळ असतात. मुळे जाड, मध्ये फुगीर आणि दोन्हीकडे टोकदार असतात ती दुधात उकळून स्त्रियांना पांढऱ्या धुपणीवर आणि गुरांना गर्भाची वाढ चांगली होण्यास देतात.


लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate