অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुतुंडी

दुतुंडी

दुतुंडी

 

(दुतोंडी, शंकेश्वर; हिं. शंखाहुली, छोटा गोखरू; गु. गाड्रियुं; सं. अरिष्ट, सर्पाक्षी; इं. बरवीड, कॉकलबर; लॅ. झँथियम स्ट्रुमॅरियम; कुल–कंपॉझिटी; अ‍ॅस्टरेसी). ही एक वर्ष जगणारी ⇨ ओषधि तणाप्रमाणे ओसाड जागी आणि नद्या व ओढे यांच्या काठाने वाढलेली आढळते. भारतात, श्रीलंकेत व जगातील कित्येक उष्ण प्रदेशांत तिचा प्रसार झाला आहे; तसेच हिमालयातही सु. १,८६० मी. उंचीपर्यंत ही आढळते; परंतु ती मूळची अमेरिकेतील असावी. हिचे खोड आखूड, बळकट, खरबरीत व केसाळ असून पाने अनेक, साधी, एकाआड एक, लांबट देठाची सु. ५–७ सेंमी. लांब व तितकीच रुंद काहीशी त्रिकोणी, थोडीफार त्रिखंडी, दातेरी व केसाळ असतात. फुले लहान, द्विलिंगी (वंध्य) व स्त्रीलिंगी (जननक्षम) अशी दोन प्रकारची असून ती एकाच झाडावर पण भिन्न स्तबक [→ पुष्पबंध] फुलोऱ्यावर जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये येतात. अनेक द्विलिंगी फुलांचे फुलोरे फांद्यांच्या व खोडाच्या टोकास बहुसंख्येने येतात आणि त्यांपासून वंध्य फळे बनतात.

पण फक्त दोनच स्त्री–पुष्पे असणारे थोडे फुलोरे पानांच्या बगलेत सापेक्षतः खाली येतात; द्विलिंगी फुलांत पिवळट आणि नळीसारखा पुष्पमुकुट असतो; परंतु स्त्री–पुष्पात तो मुळीच नसतो. स्त्री–पुष्पांभोवती छदांचे आवरण (छदमंडल) वाढून खरी फळे त्यांमध्ये वेढली जातात; ह्या छदांवर राठ, जाड अंकुशासरखे केस वाढतात व पुढे ते बीजप्रसारास साहाय्यक होतात; प्रत्येक छदमंडलाच्या (१·६ सेंमी.) वेष्टनात दोन कप्पे व टोकास दोन चोचीसारखे आकडे असून त्या प्रत्येक कप्प्यात एकेक खरे, शुष्क, एकबीजी, न तडकणारे, १·३ सेंमी. आणि गुळगुळीत फळ (कृत्स्नफळ) असते. फळावर टोकास दोन राठ केस असतात; बी एक. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कंपॉझिटी कुलात (सूर्यफूल कुलात) दिल्याप्रमाणे असतात.

ह्या वनस्पतीचा पाला केस रंगविण्यास वापरतात; काढा शामक (शांत करणारा), स्वेदजनक (घाम आणणारा) असल्याने जुनाट हिवतापावर देतात. भूक, आवाज व कांती सुधारण्याचा गुण या वनस्पतीत असून पाने स्तंभक (आकुंचन करणारी) व स्वेदजनक असतात; त्यांचे चूर्ण दुखऱ्या गाठी, पुरळ व गंडमाळ यांवर लेप करण्यास वापरतात. पानांचा काढा कुत्रे चावल्यास देतात; जुनाट परम्यावर वनस्पतीचा फांट (पाण्यात भिजवून काढलेला रस) उपयुक्त आहे.

कळ्या पौष्टिक, मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या), शामक व स्वेदजनक असून मूळही कडू व पौष्टिक असते; तेही गंडमाळावर उपयुक्त असते; काटेरी छदमंडलसह फळ शीतकर (थंडावा देणारे) व शामक असून देवीच्या आजारात देतात. बियांत झँथोस्ट्रुमॅरीन हे ग्लुकोसाइड आणि ऑक्झॅलिक अम्ल असते. गुरांना व डुकरांना ही वनस्पती मारक असते.

 

 

संदर्भ : 1. Desai, V. G. The Materia Medica and Therapeutics of Indian Medicinal Plants (Marathi), Bombay, 1927. 2. Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Medicinal Plants, Delhi , 1975.

लेखक: जमदाडे, ज. वि,परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate