অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

देवनळ

ह्या नावाने दोन वनस्पती ओळखल्या जातात. त्यांची वर्णने स्वतंत्रपणे खाली दिली आहेत.

 

(१) देवनळ

(हिं. बारनल, नरहळ; गु. देवनाल; इं. ग्रेट रीड, स्पॅनिश केन; लॅ. आरुंडो डोनॅक्स;कुल–ग्रॅमिनी). या अनेक वर्षे जगणाऱ्या गवताचे मूळ स्थान द. यूरोप व पॅलेस्टाइन असून त्याचा प्रसार उष्ण आणि उपोष्ण कटिबंधांत आहे. भारतात हे हिमालयाचा पायथा, काश्मीर ते नेपाळ, आसाम (२४०० मी. उंचीपर्यंत), नागालँड, निलगिरी, कूर्ग येथे असून शिवाय ते ब्रह्मदेशात, उ. आशियात व आफ्रिकेत आढळते. ते बळकट बोरूसारखे व बांबूशीही साम्य दर्शविणारे १·८०–३·६० मी. उंच क्षुप (झुडूप) आहे. फुलांचे तुरे मोठे, सरळ ३०–६० सेंमी. लांब असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ग्रॅमिनी कुलात (तृण कुलात) वर्णिल्याप्रमाणे. याचे काही शोभिवंत विविधवर्णी प्रकार बागेत लावतात. देवनळापासून छपरे, टोपल्या, चटया, खुर्च्या, वाद्यांच्या नळ्या इ. बनवितात. उत्तम प्रतीचा लिहिण्याचा कागद बनविण्यासाठी हे गवत फार उपयुक्त असल्याचे आढळले आहे. इटलीत त्यापासून रेयॉन बनवितात. स्फोटक पदार्थ बनविण्यासाठीही ते उपयुक्त आहे. या वनस्पतीतील ग्रॉमीन (डोनाक्झिन) व डोनाक्झरीन या रासायनिक द्रव्यांपैकी पहिले कुत्र्यांमध्ये रक्तदाबावर कमीजास्त परिणाम करते. ह्या वनस्पतीत ४२·८% सेल्युलोज, ९·४% लिग्निन असते; त्यामुळे ३४–३७% लगदा मिळतो.

(२) देवनळ

(नल, थोर देवनळ, धवल; हिं. नल; गु. नळी; क. कांडेले; सं. बिभीषण, नड, देवनल; इ. वाइल्ड टोबॅको; लॅ लोबेलिया निकोटिनीफोलिया; कुल–लोबेलिएसी). प. भारत व श्रीलंका येथे सु. २,१०० मी. उंचीपर्यंत भरपूर आढळणारी ही झुडूपवजा ⇨ ओषधी द्विवर्षायू (दोन वर्षे जगणारी) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) असून तिचे खोड जाड, पोकळ व मोठे (सु. १–२ मी. उंच) व टोकाजवळ शाखायुक्त असते. पाने साधी, अल्पवृंत (लहान देठाची), खोडाच्या खालच्या भागावर फार लांब व कमी रुंद परंतु वरच्या भागात जसजसे वर जावे तसतशी आखूड व शेवटी छदांप्रमाणे (खवल्यासारख्या पानांप्रमाणे) बनतात. ती सूक्ष्म दातेरी असून मध्यशीर पांढरी असते; फुलोरा सु. ३० सेंमी. लांब मंजरीसारखा असून त्यावर द्व्‌यष्ठोक (ओठासारखे दोन भाग असलेली) लांब, पांढरी फुले नोव्हेंबर ते मार्चमध्ये येतात. फळ (बोंड) सु. ८ मिमी. व्यासाचे असून तडकून त्याची दोन शकले होतात. बिया लहान, चपट्या, लंबगोल, विपुल आणि पिवळट पिंगट असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लोबेलिएसी कुलात (देवनळ कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. ही ओषधी जंगलात शोभिवंत दिसते.

पानांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला रस) आचके बंद करणारा असतो; पाने व बिया विषारी, कडू व मत्स्यविष असतात. या वनस्पतीत लोबेलीन हे अल्कलॉइड असते. लोबेलिया हर्बा हे औषध मुळाशिवाय ती वनस्पती प्रथम ऑक्टोबर–नोव्हेंबरात जमा करून व नंतर सावलीत वाळवून मिळवितात. ते कडू, तिखट, बिनवासाचे आणि किळसवाणे वाटते. सुकलेल्या वनस्पतीच्या सर्व भागांवर रेझीनयुक्त उत्सर्गाचे (बाहेर टाकलेल्या पदार्थाचे) लहान ठिपके असतात आणि ते कडू व तिखट असतात. हवेत वाढणाऱ्या सर्व भागांतून पांढरा ⇨ चीक येतो आणि त्यामुळे कातडीचा दाह होतो. सर्व वनस्पती विषारी असून जंतुनाशकाप्रमाणे तिचा उपयोग करतात. श्रीलंकेत तिचा कीटकनाशक म्हणून उपयोग करतात; बियांच्या अतिमादक विषाचा आणि पानांतील विषाचा परिणाम तंबाखूतील ⇨ निकोटिनाप्रमाणे होतो; पोटातील आग तीव्र होते; श्वसनमार्गात बिघाड (श्वसन–पक्षाघात) होऊन मृत्यू येतो.

 

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

लेखक -चौगले, द. सी.,दोंदे, वि. प.; परांडेकर, शं. आ.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate