অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धायटी

धायटी

धायटी

(धावशी; हिं. धाई, धवाई; गु. धावणी; क. बेला; सं. ताम्रपुष्पी धवनी, धातकी वन्हिशिखा; लॅ. वुडफोर्डिया फ्लोरिबंडा; कुल-लिथ्रेसी). सु. ३० सेमी. उंचीचे हे पानझडी झुडूप भारतात सर्वत्र (विशेषतः महाबळेश्वर, कोकण, कारवार इ. भागांत) मोसमी जंगलात व समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात आढळते. शिवाय ब्रह्मदेश,बलुचिस्तान, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, अतिपूर्व, जावा, सुमात्रा इ. प्रदेशांतही आढळते. हिची पाने साधी, संमुख (समोरासमोर), अंडाकृती–कुंतसम (भाल्यासारखी); ती वरून मखमली असून त्यांवर खालून काळे ठिपके असतात; लहान फांद्यांवर पांढरट लव असते.

पानांच्या खालील बाजूस अंतर्धारी (किनारीच्या कडेने जाणारी) सिरा (शीर) स्पष्ट दिसते; फुले असंख्य, लहान, गर्द शेंदरी, २–१५ च्या वल्लऱ्यांवर [→पुष्पबंध] पानांच्या बगलेत डिसेंबर–मेमध्ये येतात. संवर्त वक्रनलिकाकृती; संदले व प्रदले प्रत्येकी सहा; पाकळ्या अरुंद व लांबट टोकदार; केसरदले १२; किंजपुटात दोन कप्पे व मध्यवर्ती अक्षावर प्रत्येक कप्प्यात अनेक बीजके [→ फूल]. बोंडे लहान, लवंगेसारखी व लाल असून अनियमितपणे तडकतात.

बिया असंख्य, लांबट त्रिकोणासारख्या, तपकिरी आणि गुळगुळीत असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लिथ्रेसी कुलात (मेंदी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फुलांपासून लाल रंग मिळतो व तो इतर रंगद्रव्यांबरोबर बंधक (रंग धरून ठेवणारे द्रव्य) म्हणून वापरतात. काही ठिकाणी फुले खातात किंवा थंडाईकरिता वापरतात. पाने व फुले यांपासून टॅनीन द्रव्य काढतात व ते कातडी कमाविण्यासाठी बरेच उपयोगात आहे. सुक्या फुलांचे चूर्ण स्तंभक (आकुंचन करणारे) असून अतिसार, रक्तपित्त व्याधी (स्कर्व्ही), विषबाधा, आर्तव (मासिक पाळीचे) दोष, यकृत विकार, मूळव्याध इत्यादींवर गुणकारी असते. गरोदरपणीही निर्दोष व उत्तेजक असते. शोभेकरिता झाडे बागेत लावतात.

 

 

लेखक -कुलकर्णी, उ. के.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate