অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नरक्या ऊद

नरक्या ऊद

नरक्या ऊद

(लॅ. गिरोनीरा रेटिक्युलॅटा, गि. कस्पिडॅटा; कुल – उल्मेसी). सु. तीस मी. पर्यंत उंच वाढणारा हा सदापर्णी व विभक्तलिंगी प्रचंड वृक्ष ब्रह्मदेश, श्रीलंका, जावा व भारत (सिक्कीम, हिमालय, आसाम, प. द्वीपकल्प, उ. कारवार) इ. प्रदेशांत आढळतो.याच्या तळाशी अनेक आधारमुळे आणि खोडावर पिंगट लालसर साल असते व तिचे पातळ तुकडे खालून वर अशा क्रमाने सुटतात. अंतर्सालीत बळकट व लांब धागे असतात. याची पाने साधी, एकाआड एक, लांबट वाटोळी (७·५–१२·५ X ४-५·५ सेंमी.) व गुळगुळीत असतात.

उपपर्णे जुळलेली, केसाळ व शीघ्रपाती (लवकर गळणारी); फुले एकलिंगी, कक्षास्थ (पानांच्या बगलेत), पाच परिदलांची असून स्त्री-पुष्पे एकएकटी आणि पुं-पुष्पे शाखित वल्लरीवर [→ पुष्पबंध] नोव्हेंबर–जानेवारीत येतात; केसरदले पाच व वंध्य किंज केसांच्या पुंजासारखा; किंजपुट गुळगुळीत [→ फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ खाद्य, गोलसर, लहान (१·८ सेंमी.), गुळगुळीत व चंचुयुक्त असते. या वृक्षाचे लाकूड पिंगट आणि बळकट असून ते तासल्यावर व रंधल्यावर गुळगुळीत व झिलईदार होते. सिक्कीममध्ये ते फळ्या आणि वासे यांकरिता वापरतात. श्रीलंकेत त्याची भुकटी लिंबाच्या रसातून खरूज व पुरळ या त्वचारोगांवर लावतात आणि लाकूड लिंबाच्या रसात उगाळून पोटात देतात त्यामुळे रक्तशुद्धी होते; भुकटीची धुरीही देतात. पाने गुरांना खाऊ घालतात.

 

 

लेखक -ज्ञानसागर, वि. रा.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate