অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नार्सिसस

नार्सिसस

(कुल-ॲमारिलिडेसी). एकदलिकित फुलझाडांपैकी ॲमारिलिडेसी कुलातील (मुसली कुलातील) सुंदर फुलांकरिता प्रसिद्ध असलेला एक वंश; यात सु. साठ जातींचा समावेश असून त्या सर्व शोभेच्या ⇨ औषधी आहेत. भारतातील बागांत ना. जोंक्विला व ना. टॅझेटा सामान्यपणे लावलेल्या आढळतात; शिवाय अनेक संकरजे (संकराने तयार झालेली प्रजा) व प्रकारही आहेत. नार्सिससच्या जाती मध्य यूरोप, भूमध्य सामुद्रिक प्रदेश आणि पूर्वेकडे आशियातून चीन व जपानपर्यंतचा प्रदेश येथे निसर्गतः आढळतात. मूळच्या बहुधा २५–३० जातींपासून निघालेल्या अनेक नवीन जाती, प्रकार व संकरजे सध्या मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहेत; त्यांच्या फुलांतील परिदलांशी (सर्वांत बाहेरील मंडलाशी) संलग्न असलेल्या तोरणांतील भेद लक्षात घेऊन त्यांचे तीन प्रमुख गट केले आहेत :

(१) खरे डॅफोडिल अथवा तुताऱ्या(ट्रंपेट्स); यामध्ये तोरण (उपांगांचे मंडल) पुष्पमुकुटाइतके अथवा त्यापेक्षा लांब असते; उदा., ना. स्यूडोनार्सिसस (डॅफोडिल) आणि ना. बल्बोकोडियम. (२) स्टारनार्सिसस (चॅलिस-फ्लॉवर्स); यामध्ये तोरणाची लांबी पुष्प मुकुटाच्या निम्म्याइतकी असते; उदा., ना. ट्रायँड्रस व ना. इन्कम्पॅरॅबिलिस; अनेक संकरजे. (३) खरे नार्सिसस; यांच्या फुलांतील तोरण आखूड आणि कधी फक्त वर्तुळाकार कंगोऱ्यांसारखे असते; उदा., ना. पोएटिकस, ना जोंक्विला आणि ना. टॅझेटा.

नार्सिसस वंशातील सर्व वनस्पती आवृत-कंदयुक्त [⟶ खोड] असून त्यांच्या कंदांपासून जमिनीवर रेषाकृती किंवा आरीसारखी पाने आणि फुलांचा दांडा येतो; फुलोरा एकपुष्पी किंवा चवरीसारखा अनेक फुलांचा असून त्याखाली पातळ महाछद असतो [⟶ पुष्पबंध]; फुले पांढरी, पिवळी, क्वचित हिरवी आणि आडवी, उभी किंवा लोंबती; फुलांतील परिदलमंडल अपछत्राकृती (समईसारखे) असून त्याची नलिका विविध आकारांची व खंड सहा, बहुधा सारखे, उभट, पसरट किंवा बाहेरच्या बाजूस झुकलेले असतात. या नलिकेच्या कंठातून कमीजास्त लांबीचे नळीसारखे, पेल्यासारखे, तुतारीसारखे किंवा फक्त वाटोळ्या कंगोऱ्यासारखे तोरण येते. परिदलमंडलाच्या तळातून सहा केसरदले येतात; तीन किंजदलांच्या संयुक्त अधःस्थ किंजपुटात तीन कप्पे व अनेक अधोमुखी बीजके असतात [⟶ फूल]. फळ (बोंड) पुटकभिदुर (कप्प्यांच्या वाजूवर तडकणारे) व बिया गोलसर किंवा कोनयुक्त. नार्सिससची लागवड ⇨ डॅफोडिल या नोंदीत वर्णिल्याप्रमाणे करतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे मुसली कुलात [⟶ ॲमारिलिडेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.नार्सिसस जोंक्विला (इं. जोंक्विल) ही सु. ४५ सेमीं. उंचीची द. यूरोप व अल्जेरिया येथील जाती भारतातील बागांत शोभेकरिता लावलेली आढळते.

या जातीला २–६ पिवळ्या सुगंधी फुलांचा फुलोरा येतो; फुलात पेल्यासारखे दातेरी तोरण असते; फ्रान्समध्ये हिच्या फुलांपासून बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल काढतात; त्याचा सुगंधी द्रव्यांत उपयोग करतात. ना. टॅझेटा (इं.पॉलिअँथस नार्सिसस; हिं. नर्गिस, इरिसा) ही जाती कॅनरी बेटे ते जपान या प्रदेशात आढळते व तीही भारतात बागेत शोभेकरिता लावतात; सु. ३०–५० सेंमी उंचीच्या दांड्यावर हिला पेल्यासारखे पिवळे तोरण असलेल्या अनेक सुगंधी पांढऱ्या फुलांचा फुलोरा येतो. या फुलांपासून उग्र सुगंधी वासाचे बाष्पनशील तेल काढतात;

जॅस्मिनच्या अत्तराशी नार्सिसस अत्तराचे उत्तम मिश्रण होते; उच्च प्रतीची फ्रेंच अत्तरे नार्सिससपासून बनविली जातात. नार्सिससचे कंद मुंबईत आयात करतात; ते सुकवून, काप करून बाजारात विकले जातात व त्यांचा उपयोग कॉल्चिसीन या औषधिद्रव्याऐवजी करतात [⟶ कॉल्चिकम ऑटम्नेल]; ते काप विषारी, वांतिकारक (ओकाऱ्या करणारे), रेचक, मूत्रल (लघवी साफ करणारे) व शोषक असतात (चित्रपत्र ५३).

 

 

लेखक-परांडेकर, शं. आ.

स्त्रोत -मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate