অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नीरब्राह्मी

नीरब्राह्मी

(बाम; हिं. जलनीम, सफेद कम्मी; गु. जलनेवरी, कडवीलुणी; क. नीरू ब्रह्मी; सं. नीरब्राह्मी; इं. थाइम लीव्हड ग्रॅटिओला; लॅ. बॅकोपा मोनिएरा, हर्पेस्टिस मोनिएरा; कुल-स्क्रोफ्यूलॅरिएसी). ह्या सरपटत वाढणाऱ्या मांसल व नाजूक वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ⇨ ओषधीचा प्रसार महाराष्ट्रात (कोकणात) व दख्खनमध्ये शिवाय भारतात इतरत्र ओलसर व पाणथळ जागी आहे. श्रीलंकेत व इतर उष्ण देशांतही ती कोठे कोठे आढळते. खोडापासून खाली मुळ्या व वर फांद्या फुटतात. पाने साधी, बिनदेठाची, समोरासमोर, लहान, आयत-चमसाकृती (चमच्यासारखी), मांसल असून त्यांवर काळसर ठिपके असतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ स्क्रोफ्यूलॅरिएसी कुलात (नीरब्राह्मी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फुले लहान, निळी किंवा पांढरी, पानांच्या बगलेत, सच्छदक, एकाकी व जानेवारी ते मे पर्यंत येतात [→ फूल]. बोंड (फळ) गोलसर व टोकदार; बीजे अनेक, रेषांकित व लांबट असतात.

तंत्रिका तंत्राची (मज्जासंस्थेची) शक्ती वाढविण्यात आणि दमा, अपस्मार, वेडेपणा, घोगरेपणा इत्यादींवर ही वनस्पती उपयुक्त असते. या वनस्पतीपासून बनविलेले औषधी तूप (ब्राह्मीधृत) अपस्मार व उन्मादवायूवर देतात. ती मूत्रल (लघवी साफ करणारी) व रेचक असते. तिच्यापासून ‘ब्रह्माइन’ हे विषारी अल्कलॉइड मिळते; त्याची क्रिया स्ट्रिक्निनासारखी (कुचल्यातील अल्कलॉइडासारखी) असते; परंतु हे कमी विषारी आहे. पानांचा रस खनिज तेलाबरोबर संधिवातावर लावतात. हा रस मुलांना खोकल्यावर देतात व वनस्पती उकळून त्याचे पोटीस मुलांच्या छातीवर बांधतात. ती हृदयास पौष्टिक असते. पाँडिचेरीत ही वनस्पती वाजीकर (कामोत्तेजक) समजतात. अभिधान मंजरि (भिषगार्य) मध्ये या वनस्पतीचा उल्लेख आढळतो.

 

 

संदर्भ : Mooss, N. S. Ayurvedic Flora Indica, Part I, Kottayam, 1953.

लेखक -जमदाडे, ज. वि.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate