অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पराग

पराग

फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] व प्रकटबीज वनस्पतींच्या अनुक्रमे फुलातील व शंकुतील [शंकूच्या आकाराच्या प्रजोत्पादक इंद्रियातील;⟶ कॉनिफेरेलीझ] केसरदलावर (पुं-केसरावर) असलेले परागकेश (प्रजोत्पादक सूक्ष्म घटक-बीजुके-पराग निर्माण करणारे भाग) पक्व झाल्यावर त्यांतून बाहेर पडणाऱ्या पांढरट किंवा पिवळट रंगाच्या भुकटीसारख्या सूक्ष्म कणांना पराग म्हणतात [⟶ फूल].

पराग हा मूळचा संस्कृत शब्द ‘धूळ’ या अर्थी वापरला जातो व परागाचे कण धुळीच्या कणांसारखेच सूक्ष्म आकारमानाचे असतात. श्रीशिवांनी श्रीविष्णूंना⇨ बाहव्याच्या परागांनी प्रथम स्नान घालून नंतर गंगाजलाने स्नान घातल्याचा उल्लेख पुराणात आला आहे. संस्कृत वाङ्मयात परागांचा (पुष्परेणुंचा) अनेकदा उल्लेख केलेला आढळतो.

बीजी वनस्पतींतील [⟶ वनस्पति, बीजी विभाग] परागकण वस्तुतः अबीजी वनस्पतींतील लघुबीजुकेच असून त्यांपासून पुं-गंतुकधारी (नर किंवा पुं-जननेंद्रिये धारण करणारी पिढी) व पुं-गंतुके (प्रजोत्पादक नर-कोशिका म्हणजे पेशी) तयार होतात; म्हणजेच ते प्रजोत्पादक घटक आहेत.

एका फुलातील (किंवा शंकूतील) पराग त्याच फुलातील (किंवा शंकूतील) अथवा त्याच जातीतील दुसऱ्या वनस्पतीच्या फुलातील (किंवा शंकूतील) स्त्री-केसरावर पडल्या शिवाय [⟶ परागण] प्रजोत्पादनाच्या कार्यास आरंभ होत नाही. फुलझाडांत पराग किंजदलाच्या (स्त्री-केसराच्या) टोकावर (किंजल्कावर) आणि प्रकटबीज वनस्पतींत (उदा., चीड, सायकस, गिंको, देवदार इ.) प्रत्यक्ष बीजकाच्या टोकावर (बीजकरंध्रावर) पडावे लागतात.

परागांचा प्रजोत्पादनातील महत्त्वाचा तपशील अलीकडेच पूर्णपणे माहीत झाला असला, तरी त्याची मोघम कल्पना सु. ५००० वर्षांपूर्वी अॅसिरियन पुरोहितांना होती, हे खात्रीलायक पुराव्याने सिद्ध झाले आहे. ते आपल्या हातांनी खजुराच्या नर-वृक्षावरील फुलोरे स्त्री-वृक्षा-वरच्या स्त्री-फुलोऱ्यांवर शिंपीत, कारण त्याशिवाय फळे धरत नाहीत हे त्यांना माहीत होते. आता अन्नोत्पादनाच्या प्रक्रियेत हे ‘हस्तपरागण’ महत्त्वाची कामगिरी बजावीत आहे [⟶ परागण] ; संकरज (दोन भिन्न वंश, जाती वा प्रकार यांपासू

न निर्माण झालेली) धान्ये, फळे, फुले ही सर्व या प्रक्रियेची आधुनिक देणगी आहे.

परागकण

प्रत्येक परागकण अतिसूक्ष्म असून त्याचा सरासरी ध्यास २४-५० μ (१μ= १ मायक्रॉन = १० -³ मिमी.) असतो; द्विदलिकित वनस्पतींता तो २-२५० μआणि एकदलिकितांत १५ - १५० μ असतो. विद्यमान प्रकटबीजींत १५-१८० μ व जीवाश्म (शिळाभूत झालेल्या पुरातन) जातींत ११-३०० μअसा व्यासांचा पल्ला आढळतो.

 

 

एखाद्या कुलातील वनस्पतींच्या जातींत परागकणांचे आकारमान सारखे असतेच असे नाही; त्यात अनेकदा बराच फरक आढळून येतो. पक्व परागकणाचे वजन ०.०००००३५ ते ०.००००७ मिग्रॅ. या पल्ल्यात असते.

प्रत्येक सामान्य फुलातून शेकडो परागकण बाहेर पडतात व कित्येक वनस्पतींतून बाहेर पडणाऱ्या अशा परागकणांची संख्या कित्येक सहस्र किंवा लक्ष इतकीसुद्धा भरते (उदा., सायकस, पाइन, खडशेरणी, गवते, पाणकणीस इ.). सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यावर असे कळून येते की, प्रत्येक परागकणाचा आतला भाग सूक्ष्म थेंबासारख्या (ठिपक्याएवढ्या) जीवद्रव्याचा ( सजीवाच्या कोशिकेतील जिवंत द्रव्याचा; प्राकलाचा) असून त्यात प्रकल (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज), संचित स्टार्च व तेल असतात. त्याभोवती दोन संरक्षक वेष्टने असतात; आतील पातळ वेष्टनाला ‘आलेप’ आणि बाहेरच्या जाड उपत्वचायुक्त किंवा मेणासारख्या पदार्थाने बनलेल्या वेष्टनाला ‘अधिलेप’ म्हणतात.

अधिलेपामुळे बहुतेक अम्ले व सु. ३००° से. पर्यंतचे तापमान यांपासून संरक्षण मिळते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे आलेप व अधिलेप यांची अतिसूक्ष्म रचना समजून येते व त्याचा उपयोग परागकणांची विविधता व त्यांतील सूक्ष्म फरक समजून घेण्यास करतात.

त्यांचे आकार, आकारमान व अधिलेपाचे स्वरूप यांत बरीच विविधता असते; परंतु कोणत्याही एकाच कुलातील, जातीतील किंवा वंशातील वनस्पतींचे परागकण मात्र वरील बाबतीत सारखेच असतात. उदा., गवताचे आणि सूर्यफुलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल व गुलाबाचे त्रिकोणी असतात.

चौरस, अर्धगोल इ. भिन्न आकारांचे परागकणही आढळतात. झोस्टेरा या पाण्यातील वनस्पतीचे परागकण लांब व बारीक केसासारखे (२,५५० x ३.७μ) असतात. परागकण सामान्यतः हलके असल्यामुळे वाऱ्याबरोबर वाहत दूर जातात; मूळ ठिकाणापासून सहाशे किमी. पेक्षा अधिक दूर गेलेल्या परागकणांची उदाहरणे आहेत. एफेड्रा व नोथोफॅगस यांचे पराग द. अमेरिकेहून पूर्वेकडे सु. ३,८५० किमी. (ट्रिस्टन द कुना) आणि सु. २,२५० किमी. (द. जॉर्जिया बेट) दूरच्या पीटयुक्त प्रदेशात गेलेले आढळतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate