অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परागण

परागण

(परागसिंचन). फुलातील केसरदलातून (पुं-केसरातून) निघालेल्या परागकणांचा [सूक्ष्म कणांसारख्या प्रजोत्पादक घटकांचा; →पराग] त्याच फुलातील किंवा तशाच दुसऱ्या फुलातील किंजदलाच्या टोकावर म्हणजे किंजल्कावर (स्त्री-केसराच्या टोकावर) पडण्याच्या घटनेस (प्रक्रियेस) परागण (अथवा परागसिंचन) म्हणतात सायकस, पाइन (चीड), स्प्रूस, यू (बिर्मी), जूनिपर (आभाळ) इ. उघडी बीजे असणाऱ्या [→वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] वनस्पतींत त्यांच्या शंकूसारख्या प्रजोत्पादक इंद्रियांमध्येही परागांसारखे सूक्ष्म घटक (लघुबीजुके) बीजकांवर (बीजपूर्व अवयवांवर) पडण्याची प्रक्रिया घडून येते; तिलाही परागण हीच संज्ञा वापरतात.

वनस्पतींच्या प्रजोत्पादनाच्या तीन मुख्य प्रकारांपैकी लैंगीक पद्धतीत पुं-गंतुकाचा (प्रजोत्पादक नर-कोशिकेचा) स्त्री-गंतुकाशी (अंदुकाशी अथवा स्त्री-कोशिकेशी) संयोग होऊन रंदुक (संयुक्त प्रजोत्पादक कोशिका) बनते व त्याची पुढे वाढ होऊन नवीन वनस्पती बनते; याला अंदुकयुती म्हणतात. बीजे धारण करणा-या सर्व वनस्पतींमध्ये बीजोत्पादनापूर्वी ही लैगिंक प्रक्रिया अनिवार्य असते आणि तत्पूर्वी परागण व्हावे लागते. परागणानंतर पराग किंजल्कांवर किंवा बीजकांवर रुजतात, त्यातून परागनलिका निघून बीजकात शिरते व नलिकेतून पुं-गंतुक बीजकातील अंदुकाशी एकरूप होते; या क्रियेस फलन म्हणतात व यामुळेच बीजकाचे रुपांतर होते. फलनाशिवाय बाजोत्पत्ती अपवादात्मक असते [→प्रजोत्पादन]; यावरून पराग व बीजक यांचा निकट संबंध अपरिहार्य असतो, हे लक्षात येईल.

केसरदलाच्या परागकोशातील [→फूल] परागकण सहजपणे त्याच फुलातील (अथवा तत्सम इंद्रियातील) बीजकावर अथवा किंजल्कावर पडावेत अशी स्वावलंबी योजना अनेक द्विलिंगी (केसरदले व किंजदले एकत्र असलेल्या) फुलांत असते; तथापि ते परागकण दुसऱ्या फुलातील किंजक्लावर पडावेत अशा अनेक योजना फार करून आढळतात. पहिल्या प्रकारास स्वपरागण व दुसऱ्यास परपरागण म्हणतात.

परपरागण

यामध्ये दोन प्रकार आहेत; एका फुलातील परागकण त्याच झाडावरच्या दुसऱ्या फुलातील किंजल्कावर (किंवा बीजकावर) येणे, याला आसन्नयुती म्हणतात व ते पराग त्याच जातीतील दुसऱ्या झाडावरच्या फुलातील किंजल्कावर (किंवा बीजकावर) पडणे, याला दूरस्थयूती म्हणतात. या दोन्हीपैकी दुसरी पद्धत अधिक हितकारक असल्याचे आढळले आहे. परपरागणाचे (परफलनाचे) अधिक फायदे अनुभवसिद्ध आहेत : (१) त्यापासून बनलेली बीजे संख्येने, आकारमानाने व गुणाने सरस असतात; (२) ह्या बीजांपासून झालेली संतती अधिक भेद (विविधता) दर्शविते व त्यामुळे जीवनार्थ कलहात (स्पर्धेत) ती अधिक यशस्वी होते; (३) एकंदरीने अशा पद्धतीने उत्पन्न झालेल्या वनस्पती अधिक जोमदार व भरपूर पानाफुलांनी बहरलेल्या असतात. अशा निश्चित फायद्यांमुळे शक्य तो परपरागण घडवून आणण्याकरिता फुलांमध्ये अनेक योजना आढळतात व त्या असणे हे त्या वनस्पतींच्या जातींच्या वंशांचे किंवा कुलांचे प्रगत लक्षण समजले जाते (उदा., ऑर्किडेसी, ग्रॅमिनी, कंपॉझिटी, लेग्युमिनोजी इ. कुले). परपरागण हे तत्वतः एकाच प्रकारातील वा जातीतील भिन्न वनस्पतींत घडून येत असले, तरी कधी दोन भिन्न जातींतील किंवा वंशातील वनस्पतींतही घडून येऊन 'संकरज' (मिश्र प्रजा) निर्माण होतात व त्यामुळे नवीन लक्षणे असणाऱ्या वनस्पतींची भर पडते. सृष्टीमध्ये आजपर्यंत अशा प्रक्रियेने कित्येक नवीन प्रकार व जाती उत्पन्न झाल्या असाव्यात अशी साधार समजूत आहे. स्वपरागण सहजसाध्य असते कारण एका फुलातील परागकोश तेथील बीजकाजवळ (किंवा किंजपुटाजवळ) असतात; परंतु परपरागणामध्ये मात्र पराग एका फुलातून दुसऱ्यात नेण्यास एखाद्या 'मध्यस्था'ची जरूरी लागते. वारा, प्राणी व पाणी हे मध्यस्थ सामान्यपणे येथे उपयोगात आणले जातात आणि परपरागणाचे महत्त्वाचे व नाजूक कार्य त्यांच्याकडून कुशलतेने करविले जाते. ह्या मध्यस्थांच्या सोयीप्रमाणे जरूर ते फरक फुलांत आढळतात आणि त्याप्रमाणे 'वायुपरागित', 'प्राणिपरागित', 'जलपरागित' असे फुलांचे वर्गीकरण केले जाते.

आ. १. परागण : (अ) स्वपरागण; (आ) परपरागण.

वायुपरागित फुले

या फुलांतील परागकणांची भुकटी वाऱ्याने इतस्ततः व संभवानेच (योगायोगानेच) किंजल्कावर उधळली जाते. परागणाचा हा एक फार साधा व सोपा प्रकार असून तो बहुधा प्रारंभिक वा -हसित (-हास पावलेल्या) व अप्रगत वनस्पतींत आढळतो. केव्हा जोराच्या किंवा सोसाट्याच्या वाऱ्याने परागकण कित्येक किमी. दूर नेले जातात. या प्रक्रियेत फारच थोडे कण इष्ट स्थळी म्हणजे योग्य त्या फुलाच्या किंजल्कावर पडतात, त्यांची फारच मोठी संख्या इमारती , टेकड्या, तळी, नद्या अथवा समुद्र व वाळवंटे अशा ठिकाणी पडून फुकट जाते. साहजिकच अशा फुलात (उदा., लव्हाळे, गवते, केतकी, ओक, पाइन, सायकस इ.) परागकण असंख्य बनतात. ते लहान, हलके व कोरडे असून त्यांचे बाह्यावरण गुळगुळीत [→पराग] असते. पाइनच्या प्रत्येक परागकणास हवेने भरलेले दोन फुगे असतात, त्यामुळे ते हवेत तरंगत राहणे व दूरवर नेले जाणे सहजसाध्य होते. परागकण खाली पडताना त्यांना धरून ठेवणे सोयीचे व्हावे म्हणून फुलातील किंजले व किंजल्के लांब, केसाळ व झुबकेदार असतात (उदा.,मका) ⇨ सायकसच्या बीजकातून येणारा चिकट द्राव परागकण धरून ठेवण्यास उपयोगी पडतो. कित्येक वनस्पतींचे फुलोरे पानांच्या वरच्या पातळीवर असतात. त्यामुळे पराग नेणे किंवा किंजल्कावर येणे सोपे जाते. अनेकदा पाने नसण्याच्या ऋतूत फुलांना बहर येतो त्यामुळे परागांना पानांचा अडथळा होत नाही (उदा., एल्म, हॅझेल इ.); अनेक प्रकटबीज वनस्पतींचे शंकू उघड्या भागावर विखुरलेले असतात. वायुपरागित फुले आकारमानाने लहान; पण संख्येने अधिक असून रंग, रुप, वास आणि मधुरस यांचा तेथे पूर्ण अभाव असतो. फुलांतील परिदले असल्यास फक्त संरक्षणाचे कार्य करतात व नसल्यास फक्त लहान किंवा मोठी छदे अथवा तुसे (उदा.,गवते) ते काम करतात. कित्येकदा यांचे फुलोरे लोंबत्या कणसाप्रमाणे असतात. (उदा., ओक, बर्च, पॉप्लर).

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate