অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पराया

पराया

पराया

(करवती, खरोटा, पोई; हिं. सिहौरा; क. मित्तलगिड; सं. शाखोटक; लॅ. स्ट्रेब्लस अँस्पर; कुल-मोरेसी).हा सु. ७.५० - १०.५० मी. उंच व एक मी. घेर असलेला लहान सदापर्णी वृक्ष भारतातील सर्व जंगलांत सामान्यपणे आढळतो; शिवाय तो श्रीलंका, मलेशिया, थायलंड व व्हिएटनाम येथेही सापडतो. साल मऊ आणि करडी असून सर्वच भागांवर राठ केस असतात. पाने साधी, २.५ - १० X २.५ - ५ सेंमी., लंबवर्तुळाकृती अगर अंडाकृती , साधारण दातेरी व खरबरीत असतात. पुं. -पुष्पबंध (फुलोरा) कक्षास्थ (बगलेत) गोलाकार गुच्छ असून कक्षास्थ स्त्री-पुष्पबंधावर १-२ फुले असतात.फुले जानेवारी 20 ते मार्चमध्ये येतात; पुं-पुष्पे व स्त्री - पुष्पे वेगवेगळ्या झाडांवर असतात. अश्मगर्भी (आठळी फळ) वाटाण्याएवढे, पिवळे, एकबीजी व पिवळट परिदलांनी वेढलेले असते. इतर सामान्य लक्षणे ⇨ मोरेसी कुलात (वट कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वृक्षाचे लाकूड कठीण असून गाड्यांची चाके व जू यांकरिता विशेषकरून वापरतात. खरबरीत पाने, लाकूड, हस्तिदंत, शिंगाच्या वस्तू इत्यादींना झिलई करण्यास वापरतात. फळे खाद्य आहेत. या वृक्षाची साल कडू व तीव्र विषारी असते; तिचा काढा ज्वर, आमांश व अतिसार यांमध्ये देतात. मुळाचा लेप व्रणावर लावतात. चीक जंतुनाशक व स्तंभक (आकुंचन करणारा) असून दूध नासविण्यास उपयुक्त असतो; हातापायाच्या भेगांवर तो लावतात. थायलंडमध्ये साल कागद बनविण्यास व लहान फांद्या दंतधावनाकरिता उपयोगात आहेत. गुरांना पाला खाऊ घालतात.


 

लेखक -ज्ञानसागर, वि. रा.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate