অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पळस

(परस; हिं. ढाक, पलस; गु. खाकरो; क. मुत्तुल; सं. पलाश, त्रिपत्रक, याज्ञिक, किंशुक, पुरुष; इं. पॅरट ट्री, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, बेंगॉल कीनो ट्री, बॅस्टर्ड टीक; लॅ. ब्युटिया मोनोस्पर्माब्यु. फ्रॉन्डोसा कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). फुलझाडांपैकी [®वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. १२-१५ मी. उंच वाढणाऱ्या ह्या मध्यम आकारमानाच्या पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात (१,२४० मी. उंचीपर्यंत) फआर रूक्ष प्रदेशांखेरीज सर्वत्र आढळतो. महाराष्ट्रात तो पानझडी जंगलांत सामान्यपणे दिसतो; शिवाय ब्रह्मदेश, श्रीलंका (१,२०० मी. उंचीपर्यंत) व पाकिस्तान येथेही आढळतो. उघड्या गवताळ रानात त्याचे शुद्ध समूह आढळतात, काही ठिकाणी पळसाबरोबर शालवृक्षही [⟶ साल-२] असून त्यांचे मिश्रवन आढळते.

पळसाच्या वंशात (ब्युटिया) एकूण तीस जाती असून त्यांपैकी भारतात फक्त तीनच आढळतात; त्यांपैकी एक वेल आहे. त्यांचा पुढे क्रमाने विचार केला आहे.

वृक्षवर्णन

पळसाच्या खोडाचा घेर सु. १.५-१.८ मी. असतो, त्यावरची साल राखी, निळसर, करडी वा फिकट तपकिरी व धागेदार असून तिच्या लहानमोठ्या ढलप्या सोलून जातात. सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांतून लाल रस पाझरतो व सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो, त्याला इंग्रजीत ‘ब्युटिया गम’ किंवा ‘बेंगॉल कीनो’ म्हणतात.

कोवळे भाग लवदार असतात. पाने संयुक्त, एकाआड एक, उपपर्णयुक्त, मोठी, त्रिदली [ त्यावरून ‘त्रिपत्रक’ हे संस्कृत नाव मराठीतील ‘पळसाला पाने तीन’ ही म्हण पडली आहे; वास्तविक शास्त्रीय दृष्ट्या दले तीन (त्रिदली) हे बरोबर ठरते] आणि लांब देठाची असून दले मोठी, चिवट, कठीण, वरून काहीशी चकचकीत आणि खालून पांढरट लवदार असतात; बाजूची दले तिरकस अंडाकृती, फार लहान देठाची व टोकाचे दल लांब देठाचे, गोलसर व टोकाशी गोलसर किंवा विशालकोनी असते. थंडीत पाने गळतात आणि नवी पालवी एप्रिलमध्ये किंवा एप्रिल अखेर येते.

पळसाची फुले मोठी, नारिंगी लाल व बिनवासाची असून फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत सु. १५ सेंमी. लांब मंजरीवर फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात. पर्णहीन फांद्यांवर अनेक भडकरंगी फुलोऱ्यामुळे ‘वनाग्नि किंवा वन ज्योत’ या अर्थाचे वर दिलेले ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ हे इंग्रजी नाव सार्थ वाटते.

या भडक रंगाने आकर्षित झालेले अनेक पक्षी फुलातील मध लुटण्याकरिता झाडावर गर्दी करतात, त्यामुळे ðपरागणास (परागकण दुसऱ्या फुलात नेण्यास) साहाय्य होते. कळ्या अर्धचंद्राकृती असतात. फुलाची संरचना पतंगरूप [पतंगासारखी; ⟶ अगस्ता; गोकर्ण-२; लेग्युमिनोजी] असते; केसरदले ९+१; शिंबा (शेंगा) लोंबत्या, ६-८X३-५ सेंमी., लवदार व पिंगट असून जून-जुलैमध्ये येतात; त्या न तडकणाऱ्या, सपाट व सपक्ष असतात.

बी एकच, लंबगोल, चपटे (२.५ X १.९ सेंमी.), तपकिरी रंगाचे व शिंबेच्या खालच्या टोकास असते; क्वचित दोन बिया आढळतात; एका बीजावरून लॅटिन जातिवाचक संज्ञा (मोनोस्पर्मा) दिली गेली आहे. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी (शिंबावंत) कुलात (पॅपिलिऑनेटी उपकुलात) दिल्याप्रमाणे असतात.

सामान्य उपयोग

पळसाच्या सालीच्या आतील भागापासून धागे काढतात व त्यांचा उपयोग वन्य जमाती दोराकरिता करतात, कागदनिर्मितीस व गलबतांच्या भेगा बुजविण्यास या धाग्यांचा उपयोग करतात. सुक्या फुलांपासून पिवळा रंग मिळतो, फुले उकळून किंवा थंड पाण्यात भिजत ठेवून रंग काढता येतो. तो साड्या रंगविण्यास वापरतात. तुरटी, चुना किंवा क्षार (अल्कली) मिसळून तो पक्का नारिंगी करतात. गुलाल व अबीर बनविण्यास तो उपयुक्त आहे.

कातडी कमाविण्यास व रंगाकरिता वर उल्लेख केलेला डिंक (बेंगॉल कीनो) वापरतात; तो गर्द लाल असून स्वच्छ करून ठेवल्यावर पुढे ठिसूळ व अपारदर्शक होतो. त्यामध्ये भरपूर टॅनीन आणि श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्य असते. शुष्क प्रकारच्या ऊर्ध्वपातनाने (बाष्परूपाने मिळवून मग थंड करण्याच्या क्रियेने) त्यापासून ‘पायरोकॅटेचीन’ मिळते; ते जुन्या (हट्टी) अतिसारावर पोटात देतात. पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण जेवणाकरिता वापरण्याची जुनी पद्धत आहे. पाला गुरांना व हत्तींना खाऊ घालतात. बंगालमध्ये पळसाची पाने बिड्या बांधण्यास वापरतात.

पळसाचे लाकूड करडे किंवा भुरे, नरम व हलके असून पाण्यात चांगले टिकते पण जमिनीवर फार टिकत नाही; तथापि खोकी, खेळणी, फळ्या, बंदुकीच्या दारूचा कोळसा इत्यादींसाठी वापरतात. त्याचे ओंडके लांब नसतात. कारण झाडाचे खोड वेडेवाकडे असते. शोभेसाठी ही झाडे बागेत लावतात. वनसंवर्धनाच्या दृष्टीने (भूमिउद्धार) त्याला महत्त्व आहे. इतर कित्येक वृक्ष वाढणार नाहीत अशा खाऱ्या व निचरा नसलेल्या जमिनीत पळस वाढतो. बोर व पळस एकत्र वाढतात तेथे जमिनीत पाणी आढळेल, असे बृहत्संहितेत सांगितले आहे.

औषधी गुण

पळसाची पाने स्तंभक (आकुंचन करविणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी), शक्तिवर्धक, वाजीकर (कोमेत्तेजक) असून ती अतिसार, कफक्षय, उदरवायू, शूळ (वेदना), रक्ती मूळव्याध व कृमी यांवर देतात. त्यांचा सौम्य काढा पडसे व खोकला यावर गुणकारी असतो. पानांचे गरम पोटीस (उपनाह) गळवे, मुरूम, गुल्म, सूज इत्यादींवर बांधतात. साल खडीसाखरेबरोबर चघळली असता तहान भागते. फुलेही पानासारखीच औषधी (स्तंभक, मूत्रल, वाजीकर इ. ) असतात.

पळसाच्या बिया कृमिनाशक (जंत व पट्टकृमींचा नाश करणाऱ्या) असून त्यांचा लेप नायट्यावर लावतात व जखमेतील किडे मारण्यास व दाहावर (आगीवर) गुणकारी असतात. बियांचे तेल (पिवळे, रुचिहीन व १८%), चूर्ण व अल्कोहॉलमधील अर्क यांचा अंकुशकृमीवर परिणाम होत नाही, असे आढळले आहे. बिया लिंबाच्या रसात कुटून लावल्यास मानेवरची खाज (नायट्यामुळे किंवा संपर्काने झालेल्या गजकर्णासारख्या चर्मरोगामुळे आलेली) कमी होते.

डिंक जहाल व स्तंभक असल्याने अतिसार व आमांश झालेल्या लहान मुलांना व नाजूक स्त्रियांना उपयुक्त असून आमाशयातून व मूत्राशयातून होणाऱ्या रक्तस्त्रावावरही देतात. नायटे, खरचटणे इत्यादींवर तो पाण्यात विरघळून लावतात. जुन्या आयुर्वेदीय ग्रंथांत पळसाचे अनेक उपयोग सांगितले आहेत.

विशिष्ट उपयोग व लागवड

लाखेचे किडे वाढविण्यास पळसाचे झाड फाड चांगले असते म्हणून त्या वृक्षांची लागवडही करतात. पळसाचे मळे सुक्या (रुक्ष) जागी पाणभरत्या जागी पिकविता येतात. पावसापूर्वी शिंबा गोळा करून त्या चऱ्यांमध्ये ३-३.५ मी. अंतर ठेवून पेरतात. शेंगेतील ताजे बीज त्वरित रुजते; लाखेकरिता लावलेली झाडे सु. ६ मी. अंतरावर लावतात. मुळापासून निघणाऱ्या फुटव्यामुळे शाकीय उत्पादन (अभिवृद्धी) होते.

भारतात लाखेचे किडे पोसण्यासाठी लावण्यात येणाऱ्या झाडांमध्ये ⇨ कोशिंबाच्या खालोखाल पळसाचा क्रमांक लागतो, पळसावर वाढणाऱ्या किड्यांपासून मिळणाऱ्या लाखेची प्रत कमी असते, तथापि लाखेचे प्रमाण अधिक असते. याकरिता मेमध्ये वृक्षांची बुंध्याच्या वर छाटणी करून नंतर नवीन मांसल प्ररोह (कोंब) येऊ देतात; त्यांवर किडे पोसले गेल्यावर सर्वच नवीन फूट एकदम कापून घेता येते.

बहुधा ऑक्टोबर-नोव्हेंबरात लाखेचा पिलावा (अळ्या) झाडावर सोडतात. एप्रिल-मेमध्ये दोन तृतीयांश प्ररोह नैसर्गिक रीत्या जुलैमध्ये कीटोत्पादन होण्यास ठेवतात; त्यानंतर पुढच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपूर्ण नवीन वाढ काढतात. पळसावरचा किड्यांचा पिलावा बोरीवर सोडता येतो; पण तो कोशिंबावर सोडत नाहीत [⟶ लाख-१].

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate